शनिवार, 30 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (18:14 IST)

MPSC ची परीक्षा देत असाल तर या 5 गोष्टी तुमच्यासाठी आहेत

रोहन नामजोशी
मोठ्या प्रतिक्षेनंतर येत्या रविवारी 21 तारखेला महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे घेतली जाणारी राज्य सेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यात आयोगाने ओळखपत्र जारी केले आहेत.
कोव्हिड काळातील ही पहिलीच परीक्षा आहे. त्यामुळे परीक्षा देतानाची मार्गदर्शक तत्त्वंही बदलली आहेत. आयोगाने जारी केलेल्या ओळखपत्रात त्यांचा उल्लेख आहेच. मात्र उल्लेख नसलेल्या बाबी सुद्धा लक्षात घेणं तितकंच गरजेचं आहे.
 
केंद्रावर जाताना
केंद्रावर जाताना एकाच वाहनाने शक्यतो जावं. स्वत:ची गाडी असल्यास उत्तम. कॅबने जात असल्यास वेगवेगळ्या लोकांबरोबर जाणं टाळावं. म्हणजे जाताना एक गट आणि येताना वेगळा गट असं करू नये. एकटं गेल्यास उत्तम. साधारणत: परीक्षेच्या आदल्या दिवशी परीक्षा केंद्र पाहून यावं असा संकेत असतो. मात्र सध्या तसं करू नये.
 
गुगल मॅपचा आधार घेऊन साधारण अंदाज घ्यावा आणि तसं नियोजन करावं. केंद्रावर जाताना बाहेरचं खाणं आणि पिणं शक्यतो टाळावं. सध्या अनेक भागात निर्बंध आहेत. त्यामुळे पोलिसांनी अडवल्यास त्यांना नम्रपणे परिस्थितीची जाणीव करून द्या. त्यांच्याशी हुज्जत घालू नका.

केंद्रावर पोहोचल्यावर
केंद्रावर गेल्यावर परिस्थितीचा आढावा घ्या. घोळक्यात जाणं अर्थातच टाळावं. आपले जुने अगदी जिवाभावाचे मित्र मैत्रिणी भेटल्यावर त्यांना अलिंगन देणं टाळा. त्यांच्याशी अंतर ठेवून बोला. कमी बोललं तर अगदीच उत्तम (मास्कच्या आड ते दिसण्याची शक्यता कमी आहे.)
 
आपला वर्ग कुठे आहे, याची नोंद उमेदवार घेतातच. सोशल डिस्टन्सिंगचं पालन कटाक्षाने करावं. तिथलं वॉशरुम वापरताना काळजी घ्यावी. आयोगाने सांगितल्याप्रमाणे आरोग्य सेतू अॅप फोनवर असू द्या.

परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर...
परीक्षा हॉलमध्ये गेल्यावर आपल्या जागेवर सॅनिटायझरचा फवारा मारा. मगच बसा. आपल्या हॉलमध्ये योग्य सुविधा आहेत किवा नाही याची काळजी घ्या. नसल्यास लक्षात आणून द्या.
मास्क सतत तोंडावर असू द्या. आयोगाने ग्लोव्हज घालणं अनिवार्य केलं आहे. ते उपलब्ध करून देणार असल्याचंही आयोगाने म्हटलं आहे. सध्या उन्हाळा आहे. तसंच परीक्षेचा ताण असतो. त्यामुळे हाताला घाम येणं स्वाभाविक आहे. तेव्हा ग्लोव्हज ओला होण्याची शक्यता आहे. तेव्हा एक अतिरिक्त ग्लोव्ह्ज असल्यास उत्तम, तसं पर्यवेक्षकांना लक्षात आणून द्या.
एकदा पेपर सुरू झाला की कोव्हिडचा फारसा विचार करू नका. कारण तुमच्यासारखी सगळ्यांनाच ती काळजी आहे. फक्त प्रश्नांवर लक्ष केंद्रित करा. एखादा शिंकला किंवा खोकलला तर त्याच्याकडे जळजळीत कटाक्ष टाकणं, मास्क लावण्याच्या सूचना करणे हे प्रकार टाळावेत.
 
दोन पेपरच्या मध्ये...
परीक्षेत दोन पेपर असतात आणि दोन पेपरमध्ये ब्रेक असतो. त्या कालावधीत एकमेकांच्या डब्यातून खाणं, पाणी पिणं कटाक्षाने टाळावं.परीक्षा केंद्राच्या बाहेर अजिबात जाऊ नये. स्वत:भोवती एक प्रकारचा बायोबबल तयार करावा. आपला डबा आणणं शक्य नसल्यास आजूबाजूच्या स्वच्छ आणि सुरक्षित हॉटेलमध्ये जावं.
प्रश्नपत्रिकेची चर्चा करायची कितीही इच्छा झाली तरी ती टाळावी. नंतर फोनवर ती अखंड करता येईल. आपल्या मित्र मैत्रिणींशी प्रत्यक्षात कमी संवाद झाला तरी हरकत नाही. ते तुमचे खरे मित्र मैत्रिणी असतील तर ते नक्कीच समजून घेतील.

परीक्षा संपल्यानंतर
चारवेळा परीक्षा पुढे गेल्यानंतर ती पार पडल्याचा आनंद वेगळा असेल हे मान्यच. मात्र परीक्षा संपल्यानंतर थेट घरचा रस्ता पकडावा. कारण हा पहिलाच टप्पा आहे.
पुढच्या टप्प्यांसाठी सुदृढ राहणंही तितकंच आवश्यक आहे. एवढी मोठी परीक्षा झाल्यानंतर मन सैल सुटण्याची ग्वाही देत असतं. मात्र मनावर ताबा मिळवा. गेल्या एक वर्षात तो तसाही आपण मिळवलेला आहेच.
त्यामुळे परीक्षा संपली म्हणजे कोव्हिड संपला या भ्रमात राहू नका. सध्या महाराष्ट्रात रुग्णसंख्या वेगाने वाढतेय. आपल्या घरी जाण्याची इच्छा सगळ्यांनाच असते. मात्र आपल्या गावातली आणि शहरातली परिस्थिती पाहून योग्य तो निर्णय घ्यावा.
सरतेशेवटी ही परीक्षा झाल्यानंतर मुख्य परीक्षेच्या वेळी सुद्धा कोव्हिड असेल किंवा नसेल. मात्र विद्यार्थ्यांनी सहकार्य केलं तर प्रशासनव्यवस्थेवरही त्याचा ताण येणार नाही.
मुख्य परीक्षेच्या वेळी परीक्षांच्या नियोजनात सरकारला आणखी मदत होईल. त्यामुळे पर्यवेक्षकांना आणि प्रशासनाच्या प्रतिनिधींना वेळोवेळी सहकार्य करावं. म्हणजे मुख्य परीक्षा लांबणीवर पडण्याची वेळ येणार नाही.