अबुझमदच्या जंगलात झालेल्या चकमकीत 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले
Chhattisgarh news : छत्तीसगडमधील अबुझमदच्या जंगलात झालेल्या चकमकीत आतापर्यंत 5 नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहे. या चकमकीत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार छत्तीसगडमधील अबुझमद भागात शनिवारी नक्षलवाद्यांशी चकमक झाल्याची घटना समोर आली आहे. यानंतर सुरक्षा दलांनी सोमवारी आणखी एका नक्षलवाद्याचा मृतदेह ताब्यात घेतला. त्यामुळे या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या पाच झाली असल्याचे पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले. या घटनेत सुरक्षा दलाचा एक जवान शहीद झाला असून परिसरात अजूनही शोधमोहीम सुरू आहे. शोध मोहिमेदरम्यान परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या चकमकीत ठार झालेल्या नक्षलवाद्यांची संख्या पाच झाली असून त्यात दोन महिलांचाही समावेश असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, शुक्रवारी सुरू झालेल्या या कारवाईत नारायणपूर, बस्तर, कोंडागाव आणि दंतेवाडा या चार जिल्ह्यांतील जिल्हा राखीव रक्षक (DRG) आणि विशेष टास्क फोर्स (STF) जवान सहभागी झाले होते. ठार झालेल्या नक्षलवाद्यांची अद्याप ओळख पटलेली नाही.