मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 19 मार्च 2021 (18:01 IST)

रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'ला कोव्हिड-19 वरचे औषध म्हणून मान्यता नाही - सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर

रामदेव बाबांच्या 'कोरोनिल'ला कोव्हिड-19 विरोधात उपचार म्हणून मान्यता देण्यात आली नसल्याचं सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर सुशांत सरकार यांनी स्पष्ट केलंय.
इंडियन मेडिकल असोसिएशनने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाऱ्यातल्या याचिकाला उत्तर देताना ही माहिती देण्यात आलीय.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉ. जयेश लेले यांनी दाखल केलेल्या RTI ला सहाय्यक ड्रग्ज कंट्रोलर सुशांत सरकार यांनी उत्तर दिलंय.
आपल्या कार्यालयाने कोव्हिड 19वरचा उपचार म्हणून कोरोनिलला मान्यता दिली नसल्याचं त्यांनी म्हटलंय. कोरोनिलला फक्त एक औषधी उत्पादन (Pharmaceutical product) म्हणून नियमांनुसार मान्यता देण्यात आल्याचं त्यांनी म्हटलंय.
रामदेव बाबा यांच्या पतंजली या आयुर्वेदिक उत्पादक कंपनीने बनवलेल्या कोरोनिल औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली आहे.
 
कोरोनिलबाबत काय वाद आहे?
कोरोनिल हे औषध कोरोना व्हायरसवर प्रभावी असल्याचा दावा पतंजलीने केला होता. पण त्याला WHO, IMA सारख्या संस्थांची परवानगी नसल्याचं सांगत या औषधावर महाराष्ट्रात बंदी घालण्यात आली होती.
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी याविषयी ट्विट केलं होतं.
आपल्या ट्विटमध्ये अनिल देशमुख म्हणाले, "IMA ने कोरोनिलच्या कथित वैद्यकीय चाचण्यांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) सुद्धा पतंजलीच्या कोव्हिड उपचाराच्या परिणामकारकतेला प्रमाणित केल्याबाबतचा दावाही फेटाळून लावला आहे.
WHO, IMA तसंच इतर संस्थांकडून प्रमाणित न झालेल्या कोरोनिलची विक्री महाराष्ट्रात करता येणार नाही, असंही गृहमंत्री देशमुख म्हणाले होते.
कोव्हिड-19 विरोधात 'कोरोनिल' प्रभावी असून, याला जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) मान्यता दिल्याचा दावा पतंजलीकडून करण्यात आल्यानंतर हा वाद सुरू झाला होता.
यावर जागतिक आरोग्य संघटनेने तातडीने स्पष्टीकरण देत बाबा रामदेव आणि पतंजलीचा दावा फेटाळून लावला.
दुसरीकडे, 'कोरोनिल'च्या लॉंचला केंद्रीय आरोग्यमंत्री उपस्थित राहिल्याने देशभरातील खासगी डॉक्टर नाराज झाले. "तुम्ही आरोग्यमंत्री आहात. मग, देशासमोर असे खोटे दावे करणं किती योग्य आहे?", असा सवाल डॉक्टरांनी आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांना केला होता.
 
WHO ने फेटाळला दावा
पतंजलीने केलेला दावा नंतर WHO ने फेटाळून लावला. जागतिक आरोग्य संघटनेच्या दक्षिण-पूर्व आशिया विभागाच्या ट्विटरवरून सांगण्यात आलं,
"जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाविरोधातील कोणत्याही पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या औषधाला तपासलेलं नाही किंवा मान्यता दिलेली नाही"
कोरोनिलला देण्यात आलेलं 'सर्टिफिकेट ऑफ फार्मास्युटिकल प्रॉडक्ट' हे WHO नाही तर DCGI ने दिलं असल्याचं स्पष्टीकरण यानंतर पतंजली आयुर्वेद लिमिटेडचे कार्यकारी संचालक आचार्य बालकृष्ण यांनी ट्वीट करत दिलं.