शनिवार, 11 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (18:07 IST)

परमबीर सिंगांना हटवून उद्धव सरकारची सुटका होईल का?

मयुरेश कोण्णूर
सचिन वाझे प्रकरणात अखेरी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना जावं लागलं आहे. परमबीर सिंग यांची बदली झाली आहे आणि हेमंत नगराळे नवे मुंबई पोलीस आयुक्त असतील.
 
सुरुवातीला या सगळ्या प्रकरणाबाबत काहीही मान्य करण्याच्या परिस्थितीत नसलेलं राज्य सरकार, आता जबाबदारी निश्चित करण्याच्या आणि 'फेस सेव्हिंग'च्या प्रयत्नात आहे. पण राजकीयदृष्ट्या पुरत्या अडकलेल्या या प्रकरणातून केवळ परमबीर यांच्या गच्छंतीमुळे सरकारची सुटका होईल का?
 
शिवसेनेच्या आणि आघाडीच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सरकारनं कशी कारवाई केली आणि जे हवं ते सगळं केलं असा सूर लावणाऱ्या आहेत.
 
पण दुसरीकडे 'महाविकास आघाडी' सरकारला खिंडीत पकडलेली भाजप केवळ परमबीर सिंगांच्या बदलीवर हे प्रकरण शांत होऊ देण्याच्या मूडमध्ये नाही. देंवेंद्र फडणवीसांसहित किरिट सोमय्यांपर्यंत आलेल्या सगळ्या प्रतिक्रिया ठाकरे सरकारसमोरच्या कठीण काळाचं सूतोवाच करतात.
 
'पोलीस दलाची परंपरा महान आहे'
या प्रकरणातून आणि राजकीय कोंडीतून बाहेर पडण्याची या सरकारची इच्छा एवढी प्रबळ आहे की सिंग यांच्या बदलीची बातमी प्रथम गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: ट्विट करुन दिली.
 
सरकारनं महत्वाचे निर्णय घेतले आहेत हे त्यांना सांगावं लागलं. अन्यथा अधिकाऱ्यांच्या बदलीची माहिती गृहमंत्र्यांनी ट्वीट करुन देणं हे अपवादात्मक म्हणून नोंदलं जाईल.
 
जे आरोप केले गेले होते, त्याची जबाबदारी निश्चिती केली गेली आहे, असं त्यातून सूचित होत होतं. पण हे आरोप झेलणाऱ्या गृहमंत्रालयाची जबाबदारीतून मुक्तता होईल का?
दुसरीकडे संजय राऊत यांनीही ट्विट करून मुंबई पोलीस दलाला कसं नवं नेतृत्व मिळालं आहे हे सांगून दलाच्या महान परंपरेची आठवण करुन दिली.
 
"एखाद्या वावटळीत पोलीस दलाची पडझड होईल या भ्रमात कोणी राहू नये. खाकी वर्दीचा मान आणि शान यापुढील काळात अधिक हिमतीने आणि सचोटीने राखला जाईल हीच अपेक्षा," असंही राऊत या ट्विटमध्ये लिहितात.
 
सत्ताधारी वर्गाकडून आता जी कारवाई होणं अपेक्षित होतं ती झाली आहे असं सुचवलं जात आहे. राऊतांनी या सगळ्याला 'वावटळ' असं संबोधलं आहे. पण ही इथंच थांबणारी वावटळ राहील की या वादळात अजूनही कोणाच्या खुर्च्या डगमगणार आहेत हा महाराष्ट्रात सध्या कुतुहलाचा विषय आहे.
 
'राजकीय बॉसेस पण शोधायला हवेत'
परमबीर सिंगांची बदली करून सुटकेचा निश्वास सोडणाऱ्या सरकारवर या निर्णयानंतर अवध्या काही मिनिटातच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी दबाव वाढवला.
 
फडणवीसांनी दिल्लीत भाजप मुख्यालयात पत्रकार परिषद घेतली आणि स्फोटकांसोबतच मनसुख हिरेन यांच्या हत्याप्रकरणाचा तपासही NIA ने हाती घेतला पाहिजे अशी मागणी केली.
 
"परमबीर सिंग आणि सचिन वाझे ही या प्रकरणातली छोटी नावं आहेत. त्यांच्या मागे कोण उभं होतं ते शोधायला हवं. जे त्यांच्या आडून सगळं काम करत होते ते आजही या सरकारचा भाग आहेत. त्यांची चौकशी झाली पाहिजे. हे प्रकरण केवळ परमबीर सिंग यांच्यापर्यंत थांबणारं नाही, तर यामागचे राजकीय बॉसेसही शोधायला पाहिजेत," असं फडणवीस म्हणाले.

फडणवीस यांचा रोख कोणाकडे आहे असं पत्रकार त्यांना वारंवार म्हणत असतांना पुराव्यांशिवाय अधिक बोलणार नाही असं ते म्हणाले, पण एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी ते मुख्यमंत्री असतांना वाझे यांना पुन्हा सेवेत घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी फोन केल्याचं आणि सेनेचे मंत्री येऊन भेटल्याचं सांगितलं.
 
दुसरीकडे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. "राजकीय आशीर्वादामुळे एक पोलीस अधिकारी सरकारी यंत्रणा वापरून गुन्हे करत असल्याचं चित्रं निर्माण झालं आहे. सरकारने या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारुन गृहमंत्री अनिल देशमुख यांचा राजीनामा मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे," असं पाटील यांनी म्हटलं आहे.
 
पाटील यांच्यासोबतच किरिट सोमैय्या, आशिष शेलार हे भाजपचे नेतेही सरकारवर तुटून पडले आहेत. भाजप आता अधिक दबाव सरकारवर वाढवत नेणार हे निश्चित आहे.
 
'प्यादं गेलं, वजीर जाईल आणि राजा अडचणीत येईल'
वाझे यांचं निलंबन आणि परमबीर यांची बदली हे निर्णय उशीरा का होईना राज्य सरकारनं घेतले. त्यासाठी अनेक तासांच्या बैठकांचं सत्र चालू राहिलं.
 
पण त्याने सरकारसमोरची समस्या लगेचच संपण्याचं चिन्हं नाही आहे. या प्रकरणात NIA अजून काही अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करण्याची शक्यता आहे. त्यासाठीच NIA चे महासंचालक दर्जाचे अधिकारी दिल्लीतून चौकशीसाठी आल्याचं म्हटलं जातं आहे. त्यातून काही नवी माहिती समोर आली आणि कारवाई झाली तर सरकारपुढे अधिक नामुष्कीची वेळ येईल.
 
"सचिन वाझेंच्या चौकशीत पुढे काय काय येतंय यावर बरचं अवलंबून आहे. पण इतक्यात हे प्रकरण थंड होईल असं वाटत नाही," असं ज्येष्ठ राजकीय पत्रकार अभय देशपांडे म्हणतात.
"भाजपने एकेक टप्पा पार करत नेला आहे. अगोदर वाझे, मग परमबीर. आता फडणवीस दिल्लीत म्हणाले की यांचे पॉलिटिकल बॉसेस पण समोर आले पहिजेत. त्यांचा रोख शिवसेनेकडे आहे कारण उद्धव यांनी आपल्याला वाझेंसाठी फोन केला होता हे त्यांनी जाहीर केलं आहे. त्यामुळे भाजप दबाव वाढवत जाणार हे स्पष्ट आहे. मुख्यमंत्री फायरिंग लाईनमध्ये आहेत. पण राष्ट्रवादी आपल्या गृहमंत्र्याला आता काही होऊ देईल असं वाटत नाही," असं देशपांडे म्हणतात.
 
"गेल्या वर्षभरात पोलिसांचं राजकीयिकरण मोठ्या प्रमाणात झालं. सगळ्या नियुक्त्या या राजकीय झाल्या. परमबीर हे महासंचालक अगोदरच व्हायला हवे होते पण ते मुंबई पोलीस आयुक्तच राहिले. आता NIA चौकशीला बोलवू शकतं म्हणून त्यांची नाईलाजानं बदली केली गेली. पण तपास NIA कडे आहे आणि वाझे या चौकशीतलं केवळ प्यादं आहे. अगोदर प्यादं गेलं, मग वजीर जाईल आणि मग राजाला अडचणीत आणण्याचा प्रयत्न होईल. हे प्रकरण केवळ इथपर्यंत या सरकारसाठी थांबणार नाही," असं राजकीय पत्रकार आशिष जाधव म्हणतात.