शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: गुरूवार, 18 मार्च 2021 (17:41 IST)

तीरथ सिंह रावत : फाटकी जीन्स घालणारी महिला मुलांना काय संस्कार देणार?

उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत सतत चर्चेत येत आहे. आधी अचानकपणे मुख्यमंत्रिपदी निवड झाली म्हणून त्यांची नावाची चर्चा होती. आता मात्र महिलांविषयी केलेल्या एका वक्तव्यामुळे ते चर्चेत आले आहेत.
 
आजकाल महिला फाटकी जीन्स घालत आहे, हे संस्कार आहेत काय, असं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
 
देहरादून येथील बाल अधिकार संरक्षण आयोगाच्या एका कार्यशाळेचं तीरथ सिंह रावत यांच्या हस्ते उद्घाटन झालं. यादरम्यान त्यांनी म्हटलं की, लहान मुलांमध्ये कसे संस्कार यावेत, हे त्यांच्या पालकांवर अवलंबून असतं. एनडीटीव्हीने हे वृत्त दिलं आहे
 
यादरम्यान बोलताना रावत यांनी एक किस्सा सांगितला.
ते म्हणाले, "मी एकदा विमानातून जात असताना पाहिलं की एक महिला तिच्या दोन लहान मुलांसह एकदम जवळ बसली होती. तिनं फाटकी जीन्स घातलेली होती. मी त्या महिलेला विचारलं की, ताई कुठे जायचं? तर दिल्लीला जायचं असं त्यांनी सांगितलं. तिचे पती जेएनयूमध्ये प्राध्यापक आहेत आणि ती महिला एक एनजीओ चालवते."
"त्यानंतर माझ्या मनात विचार आला की, जी महिला एक स्वयंसेवी संस्था चालवते आणि जिने स्वत: फाटकी जीन्स घातली आहे, ती महिला समाजात कोणते संस्कार पसरवेल? आम्ही जेव्हा शाळेत शिकत होतो, तेव्हा असं काही नव्हतं," असंही रावत म्हणाले.
 
रावत पुढे म्हणाले, "आजकालच्या मुलांमध्ये व्यसनाधीनता वाढत आहे. यापासून मुलांना वाचवायचं असेल तर त्यांना संस्कार दिले पाहिजेत. तसंच आपण पाश्चिमात्य गोष्टींनी प्रेरित व्हायला नको. चांगले संस्कार झालेली मुलं कोणत्याच क्षेत्रात अयशस्वी होऊ शकत नाही."
 
काँग्रेसची टीका
तीरथ सिंह रावत यांच्या या वक्तव्यावर काँग्रसेनं टीका केली आहे.
काँग्रेस नेते संजय झा यांनी ट्वीट करत म्हटलंय, "फाटकी जीन्स घातल्यामुळे आपली संस्कृती धोक्यात येते. त्यामुळे महिलांनी ते टाळायला हवं, असं उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. भाजप, हे तुमचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत आहेत. तुम्ही याचं समर्थन करता का?," असा सवाल झा यांनी उपस्थित केला आहे.
"ज्या आधुनिक भारताकडे आपण वाटचाल करत आहोत, त्यातल्या मुख्यमंत्र्यांची ही मानसिकता आहे का," असा सवाल युवक काँग्रेसनं उपस्थित केला आहे.