य्वेत्ते टॅन
डिस्नेच्या अॅनिमेशनपटातील पहिली आग्नेय आशियाई नायिका गुरुवारी (4 मार्च) पडद्यावर अवतरली. पण हे घडायला तब्बल 90 वर्षं लागली आहेत.
'राया अँड द लास्ट ड्रॅगन' या अॅनिमेशनपटातील राया ही नायिका. आपल्या प्रांतामध्ये सर्व प्रवास करून लोकांना एकत्र आणणारी आणि या प्रवासादरम्यान जगाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी ही नायिका आहे.
मानवतेच्या संरक्षणाची जबाबदारी तिच्या खांद्यावर आहे, पण त्यापलीकडे आणखीही एक जबाबदारी ती वागवताना दिसते. आग्नेय आशियामध्ये 11 देश आहेत आणि इथली लोकसंख्या 67 कोटी 30 लाख इतकी आहे.
या प्रदेशात कित्येक डझन, किंबहुना शेकड्याने विभिन्न संस्कृती आहेत. या पार्श्वभूमीवर आग्नेय आशियाई अस्मिता अशी नक्की काही ओळख सांगता येते का? आणि डिझ्नेची नवीन नायिका या अस्मितेचं मूर्त रूप मानता येईल का? असे काही प्रश्न उपस्थित होता.
सिलाट आणि सालाकोट
या चित्रपटाचं कथानक कुमन्द्रा या प्रदेशात घडतं- पाच जमातींचा हा एक काल्पनिक प्रदेश दाखवलेला आहे. यातील प्रत्येक जमातीची स्वतःची वेगळी संस्कृती असते. या संस्कृती वास्तवातील आग्नेय आशियामधल्या विभिन्न ठिकाणांवरून प्रेरणा घेऊन रंगवलेल्या आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉन हॉल बीबीसीशी बोलताना म्हणाले की, या चित्रपटाचं चित्रीकरण करण्यापूर्वी चित्रपटाशी निगडीत विविध मंडळी आग्नेय आशियाचा प्रवास करू आली.
याचं कथानक आजच्या काळात घडत नाही, किंबहुना हजारो वर्षांपूर्वी हा प्रदेश कसा दिसत असेल, याची कल्पना करून चित्रपटातील प्रदेश रंगवला आहे.
आग्नेय आशियाचे संदर्भ चित्रपटात विविध ठिकाणी विखुरल्याचं स्पष्टपणे दिसतं.
राया घालते ती टोपी फिलिपिन्समधल्या पारंपरिक 'सालाकोट' या हॅटसदृश टोपीसारखी आहे.
तिचा घनिष्ठ सहकारी आणि तिचं वाहन यांचं नामकरण टुक टुक असं करण्यात आलं आहे- आग्नेय आशियातील रिक्शा या लोकप्रिय वाहनाचा हा संदर्भ आहे.
रायाचं लढण्याचं तंत्र सिलाटपासून प्रेरित आहे- मलेशिया व इंडोनेशियामधील सिलाट हा पारंपरिक मार्शल आर्टचा प्रकार आहे.
निर्माते उस्नात श्युरर म्हणाले, "आम्ही तिथल्या सामायिक अंतःस्थ संकल्पनांचा विचार केला... सामुदायिक भावना आणि एकत्र काम करणं, ही सर्वांत महत्त्वाची संकल्पना आहे, असं आम्हाला वाटलं."
आग्नेय आशियाई अस्मिता म्हणजे काय?
या चित्रपटामध्ये आग्नेय आशियाई प्रांतातील विभिन्न संस्कृतींमधून काही तुरळक संदर्भ सोयीने उचलून एका चित्रपटात कोंबण्यात आले आहेत, अशी तक्रार इंटरनेटवर केली जाते आहे.
पण मलेशियात जन्मलेल्या व या चित्रपटाच्या सह-पटकथालेखिका अॅडेली लिम म्हणतात की, हा चित्रपट 'याहून खोलवर जाणारा आहे'.
"सांस्कृतिक स्फूर्तीविषयी बोलताना त्यात केवळ 'आपण अमुकअसे दिसतो, मग असं करूया' एवढंच नसतं. त्याहून खोलवर जाणाऱ्या गोष्टीही असतात," असं त्या म्हणतात.
"उदाहरणार्थ, रायाचे वडील सार करत असतानाचा एक प्रसंग चित्रपटात आहे- आग्नेय आशियामध्ये अन्नपदार्थांमधून किती प्रेम व्यक्त केलं जातं, हे आपण जाणतो... तर या अशा गोष्टी मनाला स्पर्शून जाणाऱ्या आहेत."
परंतु, इंडोनेशियातील एका ट्विटर-सदस्याने बीबीसीला सांगितलं की, संपूर्ण आग्नेय आशियाचं प्रतिनिधित्व एका चित्रपटात करणं 'अशक्य' आहे. या चित्रपटाने एखाद्या 'विशिष्ट संस्कृतीवर लक्ष केंद्रित करायला हवं होतं.'
पण मुळात हा चित्रपट केवळ आग्नेय आशियाई प्रदेशाच्या संदर्भात 'स्फूर्ती' घेणारा आहे, त्यात कधीच एखाद्या संस्कृतीवर किंवा देशावर लक्ष केंद्रित करण्याचा हेतू नाही.
"नाट्यमय युरोपीय कथनांवरून आर्थरियन दंतकथा तयार झाल्या, तसाच हा प्रकार आहे. त्या दंतकथांमध्ये अमुक फ्रेंच आहे, अमुक इंग्रजी आहे, असं दाखवणं शक्य होतं," असं व्हिएतनामी-अमेरिकी सह-पटकथालेखक क्वुई न्गुयेन म्हणतात.
"पूर्णतः नवीन कथा निर्माण करण्याची ही संधी होती, पण त्याचा डीएनए कुठेतरी वास्तवात असणं गरजेचं होतं. वाईट लोक थायलंडचे आहेत आणि चांगले लोक मलेशियाचे आहेत, असली काही कथा आम्हाला सांगायची नव्हती. त्यामुळे हे आता अशा रितीने अवतरलं आहे."
ओपन युनिव्हर्सिटी, मलेशिया इथले सहायक प्राध्यापक डेव्हिड लिम बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आग्नेय आशियाई अस्मिता म्हणजे काय, या प्रश्नावर अजून आग्नेय आशियाई लोकांमध्येच वादचर्चा सुरू आहे"
या प्रदेशाचा इतिहास वासाहतिक असल्यामुळेदेखील प्रत्येक देशाच्या सांस्कृतिक दृष्टिकोनांनी वेगळा आकार घेतला आहे. उदाहरणार्थ, व्हिएतनाम ही फ्रेंच वसाहत होती, तर इंडोनेशियावर डच लोकांनी राज्य केलं होतं.
"मला वाटतं, वासाहतिक इतिहासाने काहीएका प्रमाणात आपल्या स्वतःकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाला आकार दिला आहे, शिवाय आपल्याला कोणत्या संस्कृतींसारखं व्हायचं आहे, आपल्याला कोणाशी जवळीक वाटते, यालाही वासाहतिक संदर्भ आहेत," असं ते म्हणाले.
"आग्नेय आशियातील अनेकांना या प्रदेशातील इतर रहिवाशांपेक्षा त्यांच्या देशातील वासाहतिक लोकांबद्दल अधिक माहिती असेल, असं मला वाटतं. उदाहरणार्थ, व्हिएतनाममधील लोकांना थायलंडपेक्षा फ्रान्सची माहिती जास्त असेल."
युरोपातील लोक स्वतःला जसं "युरोपीय" मानतात, तशा अर्थाने आग्नेय आशियातील अनेक लोक स्वतःला "आग्नेय आशियाई" मानत नाहीत, असंही त्यांनी नमूद केलं.
त्यांनी या संदर्भात एक उदाहरणही दिलं- आग्नेय आसियातील देश विविध अन्नपदार्थ मुळात आपलेच आहेत, हे सिद्ध करण्यासाठी स्पर्धा करत असतात.
"या प्रदेशातील राष्ट्रवादासंदर्भात हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायला हवा. इथे एक राष्ट्रीय स्पर्धा सुरू आहे," असं प्राध्यापक लिम म्हणाले.
एक संपूर्ण प्रदेश एका चित्रपटात अचूकरित्या उतरावा, असं ओझं टाकणंही 'अवाजवी' आहे, असं प्राध्यापक लिम म्हणतात.
"संपूर्ण आग्नेय आशियाचं प्रातिनिधिक चित्रण करायचं... तर हे ओझं कोण वाहून नेऊ शकेल? एका चित्रपटात अनेक संकल्पनांचा भार वाढवत नेला, तर ते अवाजवी होईल, असं मला वाटतं," ते म्हणाले.
"त्याऐवजी आग्नेय आशियाबद्दल चर्चा करणअसाठी या चित्रपटाकडे निमित्त म्हणून पाहावं," असं ते म्हणतात.
अनेक जण अर्थातच हा पर्याय स्वीकारताना दिसत आहे. हा चित्रपट परिपूर्ण नसला, तरी योग्य दिशेने टाकलेलं हे पाऊल आहे, असं मत व्यक्त होतं आहे.
"यातलं चित्रण परिपूर्ण नाही, पण तरी एक पाऊल पुढे पडलेलं आहे," असं एकाने ट्विटरवर लिहिलं होतं.