रविवार, 2 एप्रिल 2023
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:56 IST)

सचिन वझे यांची मुकेश अंबानींच्या घराबाहेर सापडलेल्या स्फोटकं प्रकरणात भूमिका काय?

मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया या निवासस्थानाच्या बाहेर सापडलेल्या स्फोटकांनी भरलेल्या गाडीप्रकरणी देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर आरोप केले आहेत.
 
या प्रकरणाशी सचिन वझे यांचे काही संबंध आहेत की हा फक्त योगायोग आहे, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांनी विचारला आहे.
 
अर्थसंकल्पीय अधिवेशनात देवेंद्र फडणवीस बोलत होते.
 
ते म्हणाले, "26 तारखेला जिलेटीनने भरलेली गाडी अंबानींच्या घराजवळ सापडली. त्यांची सुरक्षा महत्वाची आहे. ठाण्याच्या एका व्यक्तीची ती स्कॉर्पिओ कार होती. 'अगली बार पुरी फॅमिली को उडाएंगे.. ऐसीही गाडीसे आएंगे' असं पत्र सापडलं. 'जय शूल हिंद' ने जबाबदारी स्वीकारली असं पोलिसांनी सांगितलं. प्रसारमाध्यमांनीही चालवलं. पण दुसर्‍या दिवशी 'जय शूल हिंद' ने ही चुकीची बातमी असल्याबाबत पत्रक काढलं."
 
"सचिन वझे यांना IO म्हणून याप्रकरणी नेमलं. पण तीन दिवसांपूर्वी त्यांना काढलं आणि दुसरी नेमणूक केली. त्यांना का बदललं? ज्या माणसाने स्कॉर्पिओ गाडी बंद पडल्याची तक्रार केली. तो माणूस ola मध्ये बसून क्रॉफर्ड मार्केटला गेला. मग तो तिथं कोणाला भेटला," असा सवाल देवेंद्र फडणवीस यांनी केला.
 
"काही दिवसांपासून तक्रारदार आणि एका नंबरवर संवाद झालाय. ज्यांच्याशी संवाद झाला तो नंबर सचिन वझेंचा आहे. जेव्हा ही घटना घडली तेव्हा सर्वांत आधी सचिन वझे तिथं पोहोचले. ते ही ठाण्यात राहतात. तो तक्रारदारही ठाण्यात राहतो. धमकीचं पत्रही वझेंना सापडलं. हा योगायोग आहे की आणखी काही? हा तपास एनआयएकडे देण्यात यावा," अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
 
नेमकं काय घडलं होतं?
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत गुरूवारी (25 फेब्रुवारी) स्फोटकं सापडली. जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या या गाडीत सापडल्याची माहिती महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
 
हा परिसर गावदेवी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येतो. या घटनेची माहिती मिळताच संबंधित पथकं घटनास्थळी दाखल झाली. तिथे तपास केल्यानंतर जिलेटीनच्या 20 कांड्या स्कॉर्पिओ गाडीत सापडल्या.
 
महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या माहितीनुसार, "उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील घराच्या काही अंतरावर एका स्कॉर्पिओ गाडीमध्ये जिलेटीन स्फोटकाच्या 20 कांड्या सापडल्या आहेत."
 
"या घटनेची संपूर्ण चौकशी मुंबई गुन्हे शाखेचे पोलीस करीत असून चौकशीतून लवकरच सत्य समोर येईल," असंही अनिल देशमुख म्हणाले.

मुंबईतील पेडर रोडवर अँटिलिया हे मुकेश अंबानी यांचे निवासस्थान आहे. हा मुंबईतील उच्चभ्रू परिसर मानला जातो.

स्फोटकांचं नागपूर कनेक्शन
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या कार मधील जिलेटीनच्या कांड्या नागपूर येथील इकॉनोमिक एक्सप्लोझिव्ह कंपनीत तयार झाल्याची माहिती मिळाली आहे.
 
सोलर एक्स्प्लोझिव्ह ही जगातील चौथी मोठी स्फोटक तयार करणारी कंपनी आहे. विहीर खोदणे आणि खाण कामासाठी ही स्फोटकं प्रामुख्याने पुरविली जातात.
 
सोलर इंडस्ट्रीजचे चेअरमन सत्यनारायण नुवाल याविषयी बीबीसी मराठीला अधिक माहिती दिली.
 
ते म्हणाले, "मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रांचच्या अधिका-यांचा आम्हाला फोन आला होता. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर पार्क करून ठेवलेल्या कारमध्ये सापडलेल्या जिलेटीनच्या कांड्या सोलर एक्सप्लोझिव्ह मध्ये तयार झाल्या आहेत. अशी माहिती या अधिकाऱ्यांनी आम्हाला दिली."
 
"आम्ही प्रत्येक बॉक्सवर बार कोड लावतो त्याद्वारे जिलेटीन कुणी केले घेतले त्याचा कसा प्रवास झाला याची माहिती आमच्याकडे आणि Petroleum and explosive safety Organisation या संस्थेकडे कडे असते. मात्र, नुसत्या जिलेटीनच्या कांड्या पाहून त्यानुसार ते आले कुठून सांगता येणार नाही कारण त्यावर बारकोड नसतो," असं ते पुढे म्हणाले.
 
मुकेश अंबानी यांच्या घराजवळील वाहनात सापडलेलं जिलेटिन सुटं होतं. सोलर एक्सप्लोझिव्ह कंपनी सुट्या एक्स्पोजिव्ह कांड्या विकत नाही. येथील एक्स्प्लोझिव्ह कंपनी पॅकिंग बॉक्समध्येच त्यावर संबधित कारखानदार किंवा अन्य कोळसा उत्खनन करणाऱ्या कंपनी संचालकांचे कोड टाकून जिलेटीनचे बॉक्स विकतात. वाहनात आढळलेल्या जिलेटीनच्या कांड्या कुठल्या डब्यातील आहे याचा शोध घेतला तर अधिक माहिती मिळू शकते, असंही त्यांनी म्हटलं.
 
नवीन स्टॅंपपेपरचा घोटाळा
काही वर्षांपूर्वी तेलगीचा स्टँपपेपर घोटाळा समोर आला आहे. आता नवीन स्टँपपेपर घोटाळा समोर येतोय. बनावट खरेदीखताद्वारे त्यावर सत्यप्रत म्हणून स्टँप मारून घेतला जातोय. त्यातून अनेक जमिन व्यवहार केले जातात. एक मोठा तेलगी घोटाळा पुन्हा समोर येत आहे, असं फडणवीस म्हणाले. तसंच महाराष्ट्रात खासगी रेती घाट अवैध पध्दतीने चालवले जात असल्याचा आरोपही देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.