बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 25 डिसेंबर 2019 (08:37 IST)

अटलबिहारी वाजपेयी यांचा परिचय जेव्हा नेहरूंनी भावी पंतप्रधान म्हणून करून दिला होता...

रेहान फजल
माजी लोकसभा अध्यक्ष अनंतशायम अय्यंगार यांनी एकदा सांगितलं होतं की, लोकसभेत इंग्रजीत हिरेन मुखर्जी आणि हिंदीत अटलबिहारी वाजपेयी यांच्यासारखा उत्तम वक्ता शोधून सापडणार नाही.
 
वाजपेयींचे जवळचे मित्र अप्पा घटाटे यांनी जेव्हा त्यांना हे सांगितलं तेव्हा ते जोरात हसले आणि म्हणाले की, "असं असेल तर मग त्यांना बोलू का दिलं जात नाही?"
 
तेव्हा वाजपेयी संसदेत 'बॅक बेंचर' होते, पण तरी वाजपेयींनी उपस्थित केलेले मुद्दे नेहरू अगदी कान देऊन ऐकायचे.
 
किंगशुक नागा त्यांच्या 'Atal Bihari Vajpayee: A Man for All Seasons' या पुस्तकात लिहितात की, एकदा भारत दौऱ्यावर आलेल्या ब्रिटिश पंतप्रधानांची वाजपेयी यांच्याशी भेट घालून देतांना नेहरू म्हणाले, "हे विरोधी पक्षातलं उगवतं नेतृत्व आहे. माझ्यावर नेहमी टीका करतात पण यांचं भविष्य उज्ज्वल आहे."
 
नेहरूंचा फोटो गायब
एकदा एका परदेशी पाहुण्यांसमोर वाजपेयींचा परिचय नेहरूंनी भावी पंतप्रधान असा करून दिला. वाजपेयी यांच्या मनात नेहरूंबद्दल अतिशय आदर होता.
 
1977 साली परराष्ट्र मंत्री म्हणून वाजपेयी पदभार स्वीकारण्यासाठी साऊथ ब्लॉक येथील कार्यालयात गेले तेव्हा त्यांना असं लक्षात आलं की भिंतीवरचा नेहरूंचा फोटो गायब आहे.
 
किंगशुक नाग सांगतात की, त्यांनी सचिवांना विचारलं, नेहरूंचा इथे असलेला फोटो कुठे आहे. खरंतर वाजपेयी तो फोटो पाहून नाखूश होतील असा विचार करून अधिकाऱ्यांनी तो फोटो तिथून काढून टाकला होता. वाजपेयी यांनी तो फोटो पुन्हा मूळ जागी लावण्याचा आदेश दिला.
प्रत्यक्षदर्शी सांगतात की, नेहरू ज्या खुर्चीवर बसायचे त्या खुर्चीवर जेव्हा वाजपेयी बसले तेव्हा त्यांनी म्हटलं, "कधी स्वप्नात सुद्धा या खोलीत बसेन असं वाटलं नव्हतं." परराष्ट्र मंत्री झाल्यावर त्यांनी नेहरूंच्या परराष्ट्र धोरणात फारसा बदल केला नव्हता हे उल्लेखनीय.
 
शक्ती सिन्हा यांनी वाजपेयी यांचे खासगी सचिव म्हणून काम बघितलं होतं. ते सांगतात की, सार्वजनिक भाषणांच्या वेळी वाजपेयी फारशी तयारी करत नसत, पण लोकसभेतल्या भाषणासाठी मात्र ते कसून अभ्यास करत.
 
सिन्हा सांगतात,"वाजपेयी संसदेच्या ग्रंथालयातून पुस्तकं, मासिकं, आणि वर्तमानपत्र मागवून घेत आणि आपल्या भाषणावर काम करत. ते मुद्दे काढत आणि त्यावर विचार करत. ते कधीच आपलं पूर्ण भाषण लिहित नसत, पण दुसऱ्या दिवशी लोकसभेतल्या भाषणाचा आराखडा त्यांच्या डोक्यात असायचा."
 
अडवाणी यांना न्यूनगंड होता
मी शक्ती सिन्हा यांना विचारलं की, मंचावर इतकं सुंदर भाषण करणारे वाजपेयी 15 ऑगस्टचं लाल किल्ल्यावरचं भाषण का वाचायचे? सिन्हा यांनी सांगितलं की, लाल किल्ल्यावरून त्यांना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. त्या मंचासाठी त्यांच्या मनात एक प्रकारचा पवित्र भाव होता.
 
"आम्ही त्यांना सांगायचो की, तुम्ही जसं नेहमी बोलता तसंच तुम्ही बोला पण ते आमचं ऐकायचे नाहीत. ते लोकांनी दिलेलं भाषण वाचायचे नाहीत. आम्ही लोक त्यांना माहिती पुरवण्याचं काम करत असू. पण त्याची काटछाट करून आपल्या मुद्द्यांचा त्यात ते समावेश करत."
 
अटलबिहारी वाजपेयी यांचे निकटवर्तीय असलेल्या अडवाणी यांनी एकदा बीबीसीला सांगितलं होतं की, अटलजींच्या भाषणामुळे त्यांना न्यूनगंड वाटायचा.
 
अडवाणी यांनी सांगितलं होतं, "जेव्हा अटलजींनी चार वर्षं भारतीय जनसंघांचं अध्यक्षपद भूषवलं तेव्हा मला तुमच्यासारखं भाषण करता येत नाही हे सांगून मी नकार दिला."
 
"त्यांनी मला सांगितलं की, तुम्ही संसदेत उत्तम बोलता. मी म्हटलं, संसदेत बोलणं वेगळं असतं आणि हजारो लोकांच्या समोर बोलणं वेगळं असतं. मी जेव्हा पक्षाचा अध्यक्ष झालो तेव्हा मला आयुष्यभर न्यूनगंड होता की, मी त्यांच्यासारखं भाषण कधीच देऊ शकलो नाही."
 
पण आश्चर्याची गोष्ट ही आहे की, लोकांना आपल्या भाषणानं मंत्रमुग्ध करणारे वाजपेयी आपल्या खाजगी आयुष्यात अतिशय अंतर्मुख आणि लाजाळू होते.
 
त्यांचे खासगी सचिव शक्ती सिन्हा सांगतात की, जर चार पाच लोक त्यांच्या आसपास गोळा झाले तर त्यांच्या तोंडून शब्द फुटायचा नाही. पण ते इतरांच्या गोष्टी अत्यंत बारकाईनं ऐकत आणि अतिशय विचारपूर्वक प्रतिक्रिया देत.
 
मणिशंकर अय्यर आठवण सांगतात की, जेव्हा वाजपेयी पहिल्यांदा परराष्ट्र मंत्री म्हणून पाकिस्तानला गेले तेव्हा सरकारी स्नेहभोजनाला त्यांनी अस्खलित उर्दूत भाषण केलं. पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री आगा शाही यांचा जन्म चेन्नईला झाला होता. त्यांनासु्द्दा वाजपेयींचं उर्दू समजलं नाही.
 
नवाज यांनी वाजपेयींना सांगितलं...
शक्ती सिन्हा सांगतात की, एकदा न्यूयॉर्कमध्ये पंतप्रधान नवाज शरीफ यांच्याशी वाजपेयी बातचीत करत होते. थोड्याच वेळानं त्यांना संयुक्त राष्ट्राच्या महासभेला संबोधित करायचं होतं.
 
त्यांना एक चिठ्ठी पाठवून वार्तालाप संपवण्यास सांगितलं. तेव्हा नवाज शरीफ यांनी वाजपेयींना म्हटलं, "इजाज़त है..." (त्यांनी उर्दूत चला निघावं असं म्हटलं) पण हे बोलताना त्यांनी स्वत:ला थांबवलं आणि हिंदीत म्हणाले, "आज्ञा है.." त्यावर वाजपेयी हसून त्यांच्या हिंदीत बोलण्याला थांबवत म्हणाले, "इजाजत है"
 
वाजपेयींचा स्वभाव सरळ आणि अघळपघळ होता. किंगशुक यांच्या पुस्तकात उल्लेख आहे की, एकदा प्रसिद्ध पत्रकार एच. के. दुआ एका पत्रकार परिषदेचं वार्तांकन करण्यासाठी प्रेस क्लबला जात होते.
 
रस्त्यात त्यांनी बघितलं की, वाजपेयी ऑटोरिक्षा थांबवण्याचा प्रयत्न करत होते. दुआ यांनी आपल्या स्कुटरचा वेग कमी केला आणि वाजपेयींना ऑटो थांबवण्याचं कारण विचारलं. त्यांनी सांगितलं की, त्यांची कार खराब झाली आहे. दुआंनी म्हटलं, तुमची इच्छा असेल तर तुम्ही माझ्या स्कूटरवर प्रेस क्लबला येऊ शकता. वाजपेयी हे दुआ यांच्याबरोबर प्रेस क्लबला पोहोचले. त्या पत्रकार परिषदेला वाजपेयी स्वत: संबोधित करणार होते.
शिवकुमार यांनी 47 वर्षं वाजपेयींबरोबर काम केलं आहे. त्यांच्या शब्दात सांगायचं झालं तर ते एकाच वेळी वाजपेयी यांचे चपराशी, स्वयंपाकी, अंगरक्षक, सचिव, मतदारसंघाचा व्यवस्थापक अशा अनेक भूमिका निभावत होते.
 
जेव्हा मी त्यांना विचारलं वाजपेयींना कधी राग येतो का, तेव्हा त्यांनी एक किस्सा सांगितला, "मी त्यांच्याबरोबर 1-फिरोजशाह रोडवर रहात होतो. ते बेंगळुरूहून दिल्लीला परत येत होते. मला त्यांना घ्यायला विमानतळावर जायचं होतं. जनसंघाचे एक नेते जे. पी. माथूर यांनी मला म्हटलं की, चला रीगलमध्ये इंगजी चित्रपट पाहू. छोटासाच पिक्चर आहे, लवकर संपेल, त्या दिवसांत बेंगळुरूहून येणाऱ्या विमानाला उशीर व्हायचा. मी माथूर यांच्याबरोबर पिक्चर बघायला गेलो."
 
शिवकुमार यांनी पुढे सांगितलं, "त्या दिवशी नेमका पिक्चर लांबला आणि बेंगळुरूचं विमानसुद्धा वेळेवर उतरलं. मी जेव्हा विमानतळावर पोहोचलो तेव्हा कळलं की, विमान आधीच उतरलं आहे."
 
"घराची चावीसुद्धा माझ्याकडेच होती. मी आपला देवाची प्रार्थना करत 1-फिरोजशाह रोडला पोहोचलो. वाजपेयी आपली सुटकेस पकडून लॉनमध्ये फिरत होते. मला विचारलं कुठे गेला होता? मी बिचकत सांगितलं की, पिक्चर बघायला गेलो होतो. वाजपेयी हसत म्हणाले मला पण घेऊन जायला हवं होतं. उद्या जाऊ. ते माझ्यावर रागावू शकत होते. पण त्यांनी निष्काळजीपणाकडे हसून दुर्लक्ष केलं."
 
वाजपेयींना खायला आणि स्वयंपाक करायला खूप आवडायचं. गोड पदार्थ त्यांना खूप आवडतात. रबडी, मालपुआ आणि खीर त्यांना खूप आवडते. आणीबाणीच्या वेळी जेव्हा ते अडवाणी, श्यामनंद मिश्र आणि मधू दंडवते यांच्यासाठी स्वत: जेवण बनवत.
 
शक्ती सिन्हा सांगतात की, जेव्हा ते पंतप्रधान होते तेव्हा सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत त्यांना भेटायला येणाऱ्यांची रीघ असायची.
 
शक्ती सिन्हा पुढे सांगतात, "आलेल्या लोकांना रसगुल्ले, समोसे वगैरै दिले जायचे. जे पदार्थ आणून देत त्यांना आम्ही समोसे आणि रसगुल्ले हे पदार्थ त्यांच्यासमोर ठेवू नका असा स्पष्ट सूचना द्यायचो. सुरुवातीला ते शाकाहारी होते. मग ते मांसाहारसुद्धा करत. त्यांना चायनीज खायला खूप आवडतं. ते आपल्यासारखेच एक सामान्य व्यक्ती आहेत. मी तर सांगेन, ते संतपण नाहीत आणि सीनर म्हणजे पापी पण नाहीत. ते एक सामान्य आणि मृदू व्यक्ती आहेत."
 
शेरशाह सुरी यांच्यानंतर अटल यांनी बनवले रस्ते
अटलबिहारी वाजपेयी यांचे सूर्यकांत त्रिपाठी निराला, हरिवंशराय बच्चन, शिवमंगल सिंह सुमन आणि फैज अहमद फैज हे आवडते कवी आहेत.
 
त्यांना शास्त्रीय संगीत अतिशय आवडायचं. भीमसेन जोशी, अमजद अली खाँ आणि कुमार गंधर्व यांना ऐकण्याची कोणतीही संधी ते सोडत नसत.
 
किंगशुक नाग मानतात की, वाजपेयींचा रस परराष्ट्र धोरणात असला तरी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळात त्यांनी सगळ्यात जास्त काम आर्थिक क्षेत्रात केलं.
 
ते सांगतात, "दूरसंचार आणि रस्ते या दोन क्षेत्रात त्यांचं योगदान कधीही विसरता येणार नाही. भारतात महामार्गांचं जे जाळं पसरलं आहे. त्यामागे वाजपेयी यांचा विचार आहे. मी तर म्हणेन की, शेरशाह सुरी यांच्यानंतर भारतात त्यांनी सगळ्यांत जास्त प्रमाणात रस्ते तयार केले आहेत."
 
रॉ (RAW) चे माजी प्रमुख ए. एस. दुलत आपल्या 'द वाजपेयी इयर्स' या पुस्तकात लिहितात की, त्यांच्या कार्यकाळात गुजरात दंगल ही सगळ्यात मोठी चूक होती असं मानलं होतं.
 
या प्रकरणी ते कायम अस्वस्थ असत. या मुद्दयावर गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा अशी त्यांची इच्छा होती.
 
नाग सांगतात, "यावेळी राज्यपाल सुंदरसिंह भंडारी यांच्या एका निकटवर्तीयानं सांगितलं होतं की, मोदींचा राजीनामा घेण्याची त्यांनी तयारी केली होती, पण गोवा राष्ट्रीय संमेलन जवळ येताच पक्षाचे ज्येष्ठ नेते वाजपेयीचं मत बदलण्यात यशस्वी ठरले."