पुण्यात पाच नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा
पुणे शहराचा झपाट्याने वाढ होत आहे. यासोबतच लोकसंख्या आणि गुन्हेगारींमध्ये होणाऱ्या वाढला लक्षात घेता कायदा- सुव्यस्था सक्षम ठेवण्यासाठी पुण्यात पाच नवीन पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात येणार असून एक हजार पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. अशी घोषणा शिवाजीनगर येथे पोलीस मुख्यालयात शुक्रवारी पुणे पोलीस आयुक्तालयातील विविध विकासकामांचे उद्घाटन करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केली.
या उदघाटन सोहळ्याच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील, विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, अप्पर मुख्य सचिव इक्बालसिंह चहल, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, अर्चना त्यागी, पोलीस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी-चिंचवडचे पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा आदी उपस्थित होते.
पुण्याचा विकास झपाट्याने होत आहे. त्यामुळे पोलिस दलातही आधुनिकता आणि कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. यापूर्वी सात नव्या पोलीस ठाण्यांना मंजुरी देण्यात आली होती आणि सध्या ती कार्यरत आहे. राज्यात एकाच वेळी सात पोलीस ठाणे मंजूर होण्याची पहिलीच वेळ असून आता पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नऱ्हे, लोहगाव, मांजरी, लक्ष्मीनगर आणि कोंढवा या परिसरात पाच नव्या पोलीस ठाण्याच्या मंजुरीचा प्रस्ताव पाठविण्यात आला असून प्रस्ताव लवकरच मंजूर करण्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.
तसेच पुणे शहरात दोन नवीन पोलीसउपायुक्त नियुक्त करण्याची मागणी करण्यात आली आहे. या साठी पोलीस दलाच्या नव्याने आकृतिबंध तयार करण्यात आला आहे. हा भविष्यातील सुरक्षेच्या गर्ह ध्यानात घेऊन तयार करण्यात आला आहे.
मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी पुण्यातील अत्याधुनिक सीसीटीव्ही कॅमेरा प्रणालीचेही कौतुक केले. “दहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या या योजनेचा आता आधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण असा नवीन टप्पा सुरू करण्यात आला आहे. एआय सक्षम कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतूक नियंत्रणासह गुन्हे प्रतिबंधन व तपास अधिक प्रभावी होणार आहे,” असे ते म्हणाले.
पुणे ही फ्युचर सिटी असून, माहिती तंत्रज्ञान, उद्योग आणि शिक्षण यांसारख्या क्षेत्रांत आघाडी घेतलेल्या या शहराच्या पायाभूत सुविधांचा विस्तार करण्यावर पुढील दहा वर्षांत भर दिला जाणार आहे.
यासाठी पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पीएमआरडीए यासारख्या यंत्रणांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहनही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले आहे.
Edited By - Priya Dixit