1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Updated : सोमवार, 5 ऑक्टोबर 2020 (15:08 IST)

संजय राऊत यांची मुलाखत घेतील ते कुणाल कामरा कोण आहेत?

'सामना'चे कार्यकारी संपादक या नात्याने नेहमी मुलाखतकाराच्या भूमिकेत दिसणारे खासदार संजय राऊत मुलाखत घेताना नाही, तर देताना दिसू शकतील.
 
स्डँडअप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्यानंतर 'Shut Up Ya Kunal' या कार्यक्रमात संजय राऊत कुणाल कामरांना मुलाखत देणार असल्याबद्दल चर्चा सुरू झाली.
 
कुणाल कामरा यांचा 'Shut Up Ya Kunal' कार्यक्रम नेटिझन्समध्ये चांगलाच लोकप्रिय आहे. या कार्यक्रमात कामरा हे अनेक राजकीय नेत्यांसोबत अनौपचारिक गप्पा मारताना दिसतात. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या सीझनबद्दल जेव्हा चर्चा सुरू झाली, तेव्हा स्वतः कुणाल कामरा यांनी एक ट्वीट केलं.
 
'Shut Up Ya Kunal' च्या दुसऱ्या सीझनचे पहिले पाहुणे म्हणून येण्यासाठी संजय राऊत तयार झाले तरच मी हा कार्यक्रम सुरू करेन, अन्यथा नाही, असं कामरा यांनी या ट्वीटमध्ये म्हटलं होतं.

या ट्वीटला संजय राऊत यांनी प्रतिसाद दिल्यानंतर कुणाल कामरा यांनी खासदार संजय राऊत यांची भेट घेतली. स्वतः संजय राऊत यांनी या भेटीचा फोटो ट्वीट केला. त्यामुळे कामरा यांच्यासोबत राऊत यांच्या अनौपचारिक गप्पा कशा रंगणार याची उत्सुकता वाढली आहे.
 
कोण आहेत कुणाल कामरा?
मूळचे मुंबईचे असलेले कुणाल कामरा यांना आज आपण स्टँडअप कॉमेडियन म्हणून ओळखत असलो, तरी त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ही अॅड एजन्सीमध्ये प्रॉडक्शन असिस्टंट म्हणून झाली.
 
अॅडव्हर्टायजिंग इंडस्ट्रीमध्ये अकरा वर्षे काम केल्यानंतर कुणाल कामरा यांनी स्टँडअप कॉमेडियन म्हणून करिअरला सुरूवात केली. 2013 मध्ये त्यांनी आपला पहिला शो सादर केला.
 
2017 साली त्यांनी रमित वर्मा यांच्या साथीने 'Shut Up Ya Kunal' हे युट्यूब पॉडकास्ट सुरू केलं. या कार्यक्रमात राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि अन्य क्षेत्रातील प्रसिद्ध व्यक्तींसोबत कुणाल कामरा अनौपचारिक शैलीत गप्पा मारतात.
 
'Shut Up Ya Kunal' च्या पहिल्या सीझनची सुरूवात भाजपच्या युथ विंगचे तत्कालिन उपाध्यक्ष मधुकिश्वर देसाई यांच्या मुलाखतीने झाली होती.
 
पहिल्या सीझनमध्ये पत्रकार रवीश कुमार, लेखक आणि गीतकार जावेद अख्तर, असदुद्दीन ओवैसी, अरविंद केजरीवाल, मनीष सिसोदिया, मिलिंद देवरा आणि सचिन पायलट, प्रियांका चतुर्वेदी, कन्हैया कुमार आणि उमर खालिद सहभागी झाले होते.
 
दुसऱ्या सीझनसाठी संजय राऊत यांना निमंत्रित करण्यापूर्वी कुणाल कामरा यांनी राज ठाकरेंनाही या कार्यक्रमात सहभागी होण्याचं आमंत्रण दिलं होतं.
 
"मी बरंच संशोधन केलं. तुम्ही मुंबईतील कीर्ती वडापावचे मोठे चाहते असल्याचं लक्षात आलं. मी तुम्हाला तुमचा आवडता पदार्थ लाच म्हणून देतो आहे, जेणेकरुन तुम्ही माझ्या 'शट अप या कुणाल' या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी वेळ द्याल." असं काही महिन्यांपूर्वी कुणाल कामरांनी म्हटलं होतं.
 
राजकीय भूमिकांमुळे चर्चेत
कामरा हे आपल्या राजकीय भूमिकांमुळेही अनेकदा चर्चेत राहतात. सोशल मीडियावरच्या त्यांच्या काही पोस्टमुळे वादही निर्माण झाले होते.
 
2018 मध्ये त्यांनी आपलं ट्वीटर अकाउंटच डिलीट केलं होतं. मुस्लिम, शीख आणि मदर तेरेसा यांच्याबद्दलचे काही ट्वीटस व्हायरल झाल्यानंतर कामरा यांनी आपले ट्विटर अकाउंट डिलीट केलं होतं. याच काळात त्यांना मुंबईमधली आपलं घरंही सोडावं लागलं होतं.
 
2019 मध्ये कामरा यांना त्यांचे दोन शो कॅन्सल करावे लागले होते. काही लोकांनी कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन कार्यक्रम उधळण्याची धमकी दिली होती.
 
कुणाल कामरा विरुद्ध अर्णब गोस्वामी वाद
हे प्रकरण याच वर्षी जानेवारी महिन्यात घडलं होतं. कुणाल कामरा आणि पत्रकार अर्णब गोस्वामी एकाच विमानातून प्रवास करत होते. प्रवासादरम्यान कुणाल कामरा यांनी अर्णब गोस्वामींना काही प्रश्न विचारले. मात्र, त्यांनी त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष करत लॅपटॉपमध्ये आपलं काम करत राहिले. या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायल झाला.
 
या व्हीडिओमध्ये कुणाल यांनी अर्णब गोस्वामींना भित्रट पत्रकार म्हणून संबोधलं.
 
"मी अर्णब गोस्वामींना त्यांच्या पत्रकारितेबद्दल काही प्रश्न विचारत आहे. पण त्यांनी तेच केलं, ज्याची मला अपेक्षा होती. ते माझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ इच्छित नाहीत. अर्णब गोस्वामी भित्रे आहेत की राष्ट्रवादी हे आज प्रेक्षकांना जाणून घ्यायचंय."
 
स्वतः कुणाल यांनी ट्विटरवरून हा व्हीडिओ शेअर करत म्हटलं, की हे मी माझ्या हिरोसाठी रोहित वेमुलासाठी केलं.
 
या व्हीडिओवर सोशल मीडियावर उलट सुलट प्रतिक्रिया आल्या.
 
या सगळ्या प्रकारानंतर कुणाल कामरा यांच्यावर इंडिगो एअरलाइन्सने सहा महिन्यांची बंदी घातली.
 
त्यापाठोपाठ सरकारी विमान कंपनी एअर इंडिया तसंच खासगी कंपनी स्पाईसजेटनेही कुणाल यांच्यावर प्रवासबंदी घातली.
 
शशी थरुरांना दिले कॉमेडीचे धडे
2019 मध्ये कुणाल कामरांनी काँग्रेस नेते शशी थरूर यांना स्टँड अप कॉमेडीचे धडे दिले. अॅमेझॉन प्राइम व्हीडिओच्या वन माइक स्टँड कार्यक्रमासाठी स्टँड कॉमेडी करण्यासाठीच्या टिप्स दिल्या होत्या.
 
या कार्यक्रमात अभिनेत्री तापसी पन्नू आणि रिचा चढ्ढाही सहभागी झाल्या होत्या.