रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 26 ऑक्टोबर 2022 (10:37 IST)

ऋषी सुनक यांच्या हिंदू असण्यावरून परदेशी माध्यमांमध्ये इतकी चर्चा का आहे?

rishi sunak
ऋषी सुनक यूकेचे नवे पंतप्रधान बनले आहेत. ते हिंदू आहेत आणि हिंदुंच्याच महत्त्वाच्या सणाच्या दिवशी, दिवाळीच्या दिवशी कॉन्झर्वेटिव्ह पक्षाने त्यांच्या पंतप्रधान बनण्यावर शिक्कामोर्तब केलं आहे.
 
याच वर्षी 6 जुलैला ऋषी सुनक यांनी बोरिस जॉन्सन यांच्या सरकारमधून अर्थमंत्री या पदावरून राजीनामा दिला होता.
 
त्यांच्या राजीनाम्यानंतर अनेक इतर मंत्र्यांनी राजीनामा दिला आणि शेवटी पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना आपल्या राजीनाम्याची घोषणा करावी लागली.
 
ऋषी सुनक यांचा जन्म 12 मे 1980 साली इंग्लंडच्या साऊथहॅम्पटममध्ये झाला होता. सुनक यांचे वडील यशवीर डॉक्टर होते तर त्यांची आई उषा फार्मसिस्ट. यशवीर आणि उषा दोघंही 60 च्या दशकात ब्रिटनमध्ये पोचले होते, पण त्यांची मुळं पंजाबात आहेत.
 
ऋषी सुनक यांच्या हिंदू असण्याची पाश्चिमात्य माध्यमांमध्ये खूप चर्चा होतेय. ब्रिटिश न्यूज वेबसाईट द इंडिपेंडेंटने ऋषी सुनक यांच्या पंतप्रधान बनण्याच्या बातमीचा मथळा दिलाय - 'ऋषी सुनक ब्रिटनचे पहिले हिंदू पंतप्रधान'.
 
ब्रिटनच्या कॉन्झर्वेटिव्ह पक्षाचं कौतुक होतंय की कशा प्रकारे त्यांनी एका बिगर श्वेतवर्णीय आणि धार्मिकदृष्ट्या अल्पसंख्यांक व्यक्तीला देशाचं सर्वांत मोठं पद देण्याचा निर्णय घेतला. भारतातही सोशल मीडियावर लोकांचा आनंद ओसांडून वाहतोय. भारत जगातला सर्वांत मोठा हिंदुबहुल देश आहे.
 
ब्रिटिश वर्तमानपत्र द गार्डियनशी बोलताना ब्रिटिश फ्युचर थिंकटँकच्या सुंदर कटवाला यांनी म्हटलं की, "हा एक ऐतिहासिक क्षण आहे. दोन दशकांपूर्वी हे शक्यच नव्हतं. यातून सिद्ध होतं की ब्रिटनचं सर्वोच्च पद सगळ्या धर्मांच्या आणि वंशाच्या लोकांसाठी खुलं आहे. बहुसंख्य एशियन ब्रिटिश नागरिकांसाठी हा गौरवाचा क्षण असेल. अगदी त्यांच्यासाठीही ज्यांना ऋषी सुनक यांच्या पक्षाची धोरणं पसंत नाहीत."
 
गार्डियनने आपल्या बातमीत म्हटलं की, "ऋषी सुनक धर्मपरायण हिंदू आहेत, पण ते सार्वजनिकरित्या कधी आपल्या धर्माबदद्ल बोलत नाहीत. ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांच्या नावाची घोषणा दिवाळीच्या दिवशी झाली. प्रकाशाचा हा उत्सव जगभरातले कोट्यवधी हिंदू, शीख आणि जैन लोक साजरा करतात."
 
द गार्डियनशी बोलताना यूनिव्हर्सिटी ऑफ ब्रिस्टॉलमध्ये सामाजिक शास्त्र, राज्यशास्त्र आणि पब्लिक पॉलिसीचे प्राध्यापक असणाऱ्या तारिक मोदूद यांनी म्हटलं की, "ऋषी सुनक यांची राजकीय विचारधारा आणि धोरणं काहीही असोत, पण त्यांनी पंतप्रधान बनणं हे बहुसांस्कृतिकता आणि वांशिक समानतेच्या दृष्टीने ऐतिहासिक आहे. त्यामानाने ही गोष्ट फारच लवकर घडली. आम्हाला याची अपेक्षा नव्हती आणि कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाकडून हे होईल असं तर अजिबात वाटलं नव्हतं."
 
यूनिव्हर्सिटी ऑफ नॉटिंहममध्ये ब्रिटिश राजकारणाच्या प्राध्यापक प्रा नीमा बेगम यांनी द गार्डियनशी बोलताना म्हटलं की, "डेव्हिड कॅमरुन यांनी कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाला आधुनिक बनवलं. यानंतर पक्षात धार्मिक अल्पसंख्यांक लोकांचं प्रतिनिधित्व वेगानं वाढलं. अर्थात अजूनही धार्मिक अल्पसंख्यांक लोक लेबर पक्षालाच मत देतात. त्यामुळे सगळ्यांच अल्पसंख्यांक लोकांना ऋषी सुनक पंतप्रधान झाले याचा आनंद झाला असेल असं वाटत नाही."
 
गार्डियनने लिहिलं आहे की, "डेव्हिड लॉईड जॉर्ज यांच्यानंतर ऋषी सुनक पहिले पंतप्रधान असतील जे दारू पित नाहीत. हिंदू धर्मात दारू पिण्यावर बंदी आहे, असं स्पष्टपणे कुठे म्हटलं गेलेलं नाही. पण बरेचसे हिंदू दारू पित नाहीत."
 
अमेरिकन न्यूज वेबसाईट सीएनएनने आपल्या बातमीत म्हटलं आहे की सुनक यांनी 2015 साली बिझनेस स्टँडर्डला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं होतं की, "ब्रिटिश भारतीय जनगणनेच्या वेळेस एका चौकटीत चिन्ह उमटवतात. मी पूर्णपणे ब्रिटिश आहे. हाच माझा देश आणि घर आहे. पण माझा धार्मिक आणि सांस्कृतिक वारसा भारतीय आहे. माझी पत्नी भारतीय आहे. मी हिंदू आहे आणि यात कोणतीही लपवण्यासारखी गोष्ट नाहीये."
 
न्यूयॉर्क टाईम्सने आपल्या बातमीत म्हटलंय की, "त्यांनी म्हटलं की ते आपल्या दोन्ही ओळखींमध्ये एक संतुलन साधतात. ते अशा पिढीतून येतात ज्यांचा जन्म तर ब्रिटनमध्ये झाला आहे पण त्यांची मुळं बाहेर कुठेतरी आहेत. बीबीसीशी बोलताना त्यांनी म्हटलं होतं की लहानपणी त्यांचे शनिवार-रविवार हिंदू मंदिरं आणि साऊथहॅम्पटनचा स्थानिक फुटबॉल क्लब द सेंट्सच्या मॅचेस यातच जायचे."
 
त्यांनी म्हटलं होतं की, "तुम्ही सगळं करता. तुम्ही दोन्ही बाजूंना सारखंच महत्त्व देता."
 
भारतात प्रतिक्रिया
ऋषी इन्फोसिसचे संस्थापक नारायण मूर्ती यांचे जावई आहेत. ऋषी यांनी 2009 साली अक्षरा मूर्ती यांच्याशी लग्न केलं होतं. त्यामुळे त्यांनी ब्रिटनचे पंतप्रधान बनणं भारतीयांसाठी खास आहे.
 
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऋषी सुनक यांचं अभिनंदन करताना म्हटलं की, "अभिनंदन ऋषी सुनक. मी तुमच्यासोबत जागतिक मुद्द्यांवर काम करण्याबरोबरच रोडमॅप 2030 लाही अमलात आणू इच्छितो. आता आपण आपल्या देशांच्या ऐतिहासिक संबंधांना आधुनिक सहकार्यात बदलूया. या प्रसंगी ब्रिटश भारतीयांना दिवाळीच्या शुभेच्छा."
 
ज्यांनी ज्यांनी ऋषी सुनक यांचं अभिनंदन केलं त्यांनाही त्यांचं हिंदू असणं अधोरेखित केलं.
 
माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांनी ट्वीट केलं, "आधी कमला हॅरिस आणि आता ऋषी सुनक. अमेरिका आणि ब्रिटनने आपल्या देशातल्या अल्पसंख्यांक लोकांना देशांच्या सर्वोच्च पदांवर निवडण्याचं काम केलं आहे. मला वाटतं भारतात बहुसंख्यकवादाचं राजकारण करणाऱ्या लोकांसाठी ही शिकण्यासारखी गोष्ट आहे."
 
चिदंबरम यांच्या ट्वीटवर पाकिस्तानात जन्मलेले पण आता कॅनडात असलेले सतत चर्चेत असणारे लेखक तारेक फतह यांनी उत्तर दिलं आहे.
 
त्यांनी लिहिलं, "ऋषी आणि कमला एकमेकांच्या अगदीच विरुद्ध आहेत. कमला यांना आपल्या हिंदू आणि भारतीय असण्याची लाज वाटायची तर ऋषी सुनक यांनी आपलं हिंदू असणं कधी लपवलं नाही. दोघांची तुलना जरा कमीच करा."
 
सेंटर फॉर पॉलिसी रिसर्चमध्ये सीनियर फेलो असणाऱ्या सुशांत सिंह यांनी ऋषी सुनक यांचा हवाला देत भारताच्या राजकारणावर प्रश्नचिन्ह उभं केलं आहे.
 
ते लिहितात, "भारताचं सरकार आणि सत्ताधारी पक्षात देशाच्या सर्वात मोठ्या अल्पसंख्यांक समुहातून कोणी मंत्री आहे ना कोणी खासदार. दुसरीकडे ऋषी सुनक यांची सर्वोच्चपदी निवड झाली त्याबद्दल लोकांचा आनंद गगनात मावत नाहीये."
 
शशि थरूर यांनीही ब्रिटनचा निकाल येण्याआधी म्हटलं होतं की जर ऋषी सुनक निवडले गेले तर ही फार मोठी गोष्ट ठरेल. त्यांनी लिहिलं होतं, "जर ब्रिटिश लोकांनी ऋषी यांना आपला पंतप्रधान बनवलं तर जगासाठी ही एक दुर्मिळ घटना ठरेल कारण एखाद्या देशात सर्वोच्चपदी बसणारी व्यक्ती अल्पसंख्यांक असेल. आता आपण ऋषी यांच्या भारतीय असण्यावर खूश होतोय तर प्रामाणिकपणे स्वतःला विचारूयात की भारतात हे शक्य आहे का?"
 
उजवी विचारसरणी असणारे चित्रपट निर्माते रंजन अग्निहोत्री यांनी शशि थरूर यांना उत्तर दिलं. ते म्हणतात, "10 वर्षं एक शीख भारताचे पंतप्रधान होते. ज्या पक्षाचा पंतप्रधान होते त्याच्या अध्यक्षा ख्रिश्चन होत्या आणि तुम्हाला ज्यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीत हरवलं ते दलित आहेत."
 
जम्मू काश्मीरच्या माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांनी ट्वीट करून म्हटलं की, "ऋषी सुनक ब्रिटनचे भारतीय वंशाचे पहिले पंतप्रधान असतील. भारतात याचा आनंदोत्सव साजरा होणं साहाजिक आहे, पण आपण हेही लक्षात ठेवलं पाहिजे की ब्रिटनमध्ये एक अल्पसंख्यांक समुदायाचा माणूस पंतप्रधान होतोय तर आपण मात्र अजूनही भेदभाव करणाऱ्या सीएए आणि एनआरसीसारख्या कायद्यांमध्ये अडकलो आहोत."
 
ऋषी सुनक आणि हिंदू ओळख
आपलं हिंदू असणं ऋषी सुनक यांनी कधी लपवून ठेवलं नाही. ते अनेकदा मंदिरात जातात आणि धार्मिक समारंभांमध्ये सहभागी होतात.
 
2020 साली जेव्हा त्यांनी अर्थमंत्रीपदाची शपथ घेतली होती, तेव्हा त्यांनी गीतेवर हात ठेवून शपथ घेतली होती.
 
असे बरेच व्हीडिओ आहेत ज्यात तुम्ही त्यांना गायीची पूजा करताना पाहू शकता. 2020 साली दिवाळीत घराबाहेर दिवे उजळवणाऱ्या ऋषी सुनक यांचा एक व्हीडिओ इंटरनेटवर आहे.
 
ऋषी सुनक स्वतःला 'प्राऊड हिंदू' म्हणतात अशा स्वरूपाच्या बातम्या अजूनही मीडियात येत आहेत.
 
ऋषी सुनक यांचं बालपण ब्रिटनच्या साऊथहॅम्पटनमध्ये गेलं. बीबीसी प्रतिनिधी झुबेर अहमद यांनी काही महिन्यांपूर्वी या भागाचा दौरा केला होता.
 
वैदिक सोसायटी टेम्पल, साऊथहॅम्पटनमध्ये हिंदुंचं एक भव्य मंदीर आहे. या मंदिराच्या संस्थापकांमध्ये ऋषी सुनक यांच्या कुटुंबातले लोकही आहेत.
 
ऋषी यांचं बालपण याच मंदिराच्या आसपास गेलं, इथेच त्यांनी हिंदू धर्माचं शिक्षण मिळवलं.
 
इथले 75 वर्षांचे नरेश सोनचाटला ऋषी सुनक यांना लहानपणापासून ओळखतात. ते म्हणतात, "ऋषी जेव्हा लहानसे होते तेव्हापासून त्यांचे आईवडील, आजीआजोबा यांच्यासह या मंदिरात येतात."
 
ऋषी यांचे वडील यशवीर सुनक एक डॉक्टर आहे आणि त्यांच्या आई उषा सुनक आतापर्यंत एक औषधांचं दुकान चालवत होत्या. ते दोघेही अजून इथेच राहातात. ऋषी एक हिंदू धर्माचं आचरण करणारे हिंदू आहेत."

Published By -Smita Joshi