रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (17:03 IST)

राजे चार्ल्स यांच्या भेटीनंतर ऋषी सुनक अधिकृतपणे युकेचे पंतप्रधान

कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचे संसदेतील सदस्य ऋषी सुनक हे युकेचे नवे पंतप्रधान होणार आहेत. ऋषी सुनक हे भारतीय वंशाचे पहिले युकेचे पंतप्रधान असतील.
 
ऋषी सुनक अधिकृतरित्या मंगळवार (26 ऑक्टोबर) पासून पंतप्रधानपदाची सूत्रं हाती घेऊ शकतात.
 
ऋषी सुनक यांनी पंतप्रधानपदासाठी निवड निश्चित झाल्यानंतर पहिल्यांदाच राजे चार्ल्स यांची भेट घेतली. राजे चार्ल्स यांनी सुनक यांना सरकार स्थापनेसाठी भेटीचे आमंत्रण दिले.
 
ऋषी सुनक हे युकेचे 57 वे पंतप्रधान म्हणून निवडले गेले आहेत. सुनक यांचा युकेचे आजवरचे सर्वात तरूण पंतप्रधान म्हणून डाऊनिंग स्ट्रीटवर प्रवेश होईल.
 
सुनक यांच्या भाषणातले ठळक मुद्दे :
पंतप्रधानपदाची सूत्रं हातात घेतल्यानंतर ऋषी सुनक यांनी जनतेला उद्देशून भाषण केलं. त्यांच्या भाषणातले हे काही ठळक मुद्दे.
 
एकत्र येऊन आपण भव्यदिव्य गोष्टी मिळवू शकतो.
ते म्हणाले की मी जनतेच्या हिताला प्राधान्य देईन आणि माझ्या सरकारमध्ये माझ्या पक्षातले सर्वोत्तम नेते असतील.
जनतेचा विश्वास परत मिळवू
ब्रिटनच्या नव्या पंतप्रधानांनी म्हटलं की देशात जे काही घडलं आहे, त्यानंतर आता जनतेचाय सरकारवरचा विश्वास उडाला आहे. तो पूर्ववत करण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करू.
कोणताही दबाव नाही - सुनक
सुनक यांनी म्हटलं की, यापदावर खूप जबाबदाऱ्या आहेत आणि जनतेच्या अपेक्षा मी पूर्ण करू शकेन अशी मला आशा आहे. ते असंही म्हणाले कोव्हीड आणि युक्रेन युद्धामुळे परिस्थिती किती बिकट झाली आहे याची मला पूर्ण कल्पना आहे.
 
कन्झर्वेटिव्ह पक्षाला 2019 साली जे बहुमत मिळालं होतं ते कोणा एका व्यक्तीच्या मालकीचं नाहीये याची मला पूर्ण कल्पना आहे असंही सुनक म्हणाले.
 
नॅशनल हेल्थ सिस्टिम (युकेमधली सरकारी आरोग्ययंत्रणा) मजबूत करणं, लोकांना सुरक्षित वातावरण देणं, आपल्या देशाच्या सीमांचं रक्षण करणं, आपल्या सैन्याला पाठिंबा देणं यासाठी मी कटिबद्ध आहे असंही ते म्हणाले.
 
त्यांनी सर्वांत आधी माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांचे आभार मानले. "देश आणि जग अडचणीच्या परिस्थितीत असताना केलेल्या नेतृत्वाबद्दल" त्यांनी लिझ ट्रस यांचे आभार मानले.
 
सुनक यांनी म्हटलं की, खासदारांच्या समर्थानानंतर आपला गौरव झाल्यासारखं वाटत आहे.
 
त्यांनी पुढे म्हटलं, "माझं ज्या पक्षावर प्रेम आहे, त्याची सेवा करणं आणि आपल्या देशाचं ऋण परत करणं हा माझ्या आयुष्यातला सर्वांत मोठा गौरव आहे."
 
मी दिवस-रात्र देशातल्या लोकांसाठी काम करत राहीन, असं आश्वासनही त्यांनी दिलं.
 
लिझ ट्रस यांचा राजीनामा
याआधी युकेच्या माजी पंतप्रधान लिझ ट्रस यांनी राजीनामा दिला आहे. त्या फक्त 44 दिवस पदावर होत्या. त्यांची नवी कर प्रणाली वादात सापडल्यानंतर त्यांना त्यांच्याच पक्षातून विरोध सहन करावा लागला होता. त्यांनी सत्तेत येताच नवी कर प्रणाली आणत करांमध्ये मोठी कपात केली होती. ज्यानंतर त्यांना सर्वच स्तरातून मोठ्या टीकेला सामोरं जावं लागलं होतं.
 
विरोधक आणि त्यांच्याच पक्षातल्या खासदारांनी त्यांच्या या कर प्रणालीला विरोध केला होता. त्यामुळे त्यांना ती मागे घेण्याची नामुष्की ओढावली होती.
 
कर प्रणाली मागे घेताच त्यांच्या अर्थमंत्र्यांनीसुद्धा राजीनामा दिला. त्यांच्या जागी जेरेमी हंट यांची नियुक्ती करण्यात आली होती.
 
ज्या कामासाठी पक्षानं माझी नियुक्ती केली होती, ते मला करता आलेलं नाही. म्हणून मी राजीनामा देत आहे, असं लिझ ट्रस यांनी राजीनामा देताना म्हटलं आहे.
 
लिझ यांच्या राजीनाम्यानंतर एका आठवड्यात आम्ही पुढचा नेता निवडू असं हुजूर पक्षानं स्पष्ट केलं आहे.
 
लिझ ट्रस या आतापर्यंतच्या सर्वांत कमी काळ रहिलेल्या पंतप्रधान ठरवल्या आहेत. त्यांचा कार्यकाळ फक्त 44 दिवसांचा होता.
 
या यादीत दुसरं नाव पंतप्रधान जॉर्ज कॅनिंग यांचं आहे. त्यांचा पंतप्रधानपदाचा कार्यकाळ केवळ 119 दिवसांचा होता.
 
सध्याचे अर्थमंत्री जेरेमी हंट यांनी ते पुढचे पंतप्रधान होण्यासाठी इच्छुक नसल्याचं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ऋषी सुनक यांच्याकडे लागल्या आहेत. ऋषी सुनक यांनी हुजूर पक्षाच्या नेतेपदासाठी लिझ ट्रस यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती.
 
युकेचे पंतप्रधान कसे निवडले जातात?
जगातली एक महत्त्वाची अर्थव्यवस्था आणि भारताशी असलेलं ऐतिहासिक-सांस्कृतिक नातं यांमुळे युकेमधल्या निवडणुकांविषयी भारतातही एरवी उत्सुकता असते. पण युकेचा पंतप्रधान होण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत?
 
भारतात जसं लिखित राज्यघटना किंवा संविधान आहे, तसं युकेमध्ये नाही. पण तिथेही पंतप्रधान होण्यासाठी आधी तुम्ही खासदार असणं आवश्यक असतं. युकेमध्ये खासदारकीसाठी निवडणूक कोण लढवू शकतं? याविषयीची माहिती त्यांच्या संसदेच्या वेबसाईटवर दिली आहे.
 
त्यानुसार, खासदारकीसाठी पात्रता अशी ठरते:
 
उमेदवाराचं वय 18 वर्षं पूर्ण असायला हवं.
 
तो किंवा ती ब्रिटिश नागरिक असायला हवा म्हणजे इंग्लड-स्कॉटलंड-वेल्स-नॉर्दन आयर्लंडचा नागरिक असायला हवा.
 
रिपब्लिक ऑफ आयर्लंड तसंच कॉमनवेल्थ देशांचे नागरिक असलेली व्यक्तीही ब्रिटनच्या खासदारकीची निवडणूक लढवू शकते. पण त्यांच्याकडे युकेमध्ये अनिश्चित काळासाठी राहण्याची परवानगी असायला हवी.
 
या व्यक्तीचा जन्म युके किंवा कॉमनवेल्थमध्येच झालेला असावा, अशी सक्ती मात्र नाही.
 
ऋषी सुनक कोण आहेत?
ऋषी सुनक यांचा जन्म इंग्लंजच्या साऊदम्पटनमध्ये झाला होता. त्यांच्या रूपानं पहिल्यांदाच एक भारतीय आणि दक्षिण आशियाई वंशाचा खासदार युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहे.
 
सुनक यांचे वडील यशवीर केनियातून तर आई उषा टांझानियातून ब्रिटनला येऊन स्थायिक झाली होती. पण ते मूळचे ब्रिटिशकालीन भारतातल्या पंजाब प्रांतातले आहेत. यशवीर डॉक्टर होते आणि उषा फार्मसी चालवायच्या. पण ऋषी सुनक फायनान्स आणि गुंतवणूक क्षेत्राकडे वळले.
 
त्यांनी विंचेस्टर कॉलेज या खाजगी शाळेतून शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर ऑक्सफोर्ड विद्यापीठातून तत्त्वज्ञान (फिलॉसॉफी), राजकारण (पॉलिटिक्स) आणि अर्थशास्त्रात (इकॉनॉमिक्स) उच्च शिक्षण घेतलं. त्यांनी स्टॅनफोर्ड विद्यापीठातून एमबीएचं शिक्षण घेतलं.
 
सुनक यांनी गोल्डमन सॅक्स या इन्व्हेस्टमेंट बँकेसाठी विश्लेषक म्हणून कामही केलं होतं. त्यानंतर स्वतःच्या गुंतवणूक कंपन्याही काढल्या.
 
ऋषी सुनक यांच्या वेबसाईटनुसार फिट राहण्यासोबतच त्यांना क्रिकेट, फुटबॉल आणि सिनेमे बघायला आवडतं.
 
राजकारणात त्यांचा प्रवेश तसा अलीकडचाच. 2014 साली ते रिचमंड (यॉर्क्स) मतदारसंघातून संसंदेवर निवडून गेले. 2017 आणि 2019 सालच्या निवडणुकांमध्येही त्यांनी ही जागा यशस्वीपणे लढवली आणि वेगानं अर्थमंत्री (चॅन्सेलर ऑफ एक्सचेकर) पदापर्यंत प्रवास केला.
 
अर्थ मंत्रीपद हे ब्रिटिश सरकारमध्ये दुसरं महत्त्वाचं पद मानलं जातं. ऋषी सुनक अशा महत्त्वाच्या पदी पोचणारे पहिले भारतीय वंशाचे राजकारणी आहेत.
 
ऋषी सुनक यांनी युरोपीय महासंघातून बाहेर पडण्याच्या बाजूने प्रचार केला होता. कॉन्झर्व्हेटिव्ह पक्षाचे उदयोन्मुख नेते म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं.
 
कोणत्या वादांमुळे सुनक चर्चेत आले होते?
कोव्हिडच्या साथीच्या सुरुवातीला सुनक यांच्या लोकप्रियतेचा आलेख चढता राहिला. पण काहीवेळा त्यांच्या धोरणांवर टीकाही झाली. सुनक यांचं नाव वादातही सापडलं होतं.
 
स्टॅनफर्ड विद्यापीठात शिकत असताना सुनक यांची अक्षता मूर्ती यांच्याशी ओळख झाली. अक्षता ही भारतीय उद्योगपती नारायण मूर्ती आणि सुधा मूर्ती यांची कन्या आहे. अक्षता यांनी लग्नानंतर आपलं नागरिकत्व बदललेलं नाही आणि त्या युकेच्या कायमस्वरूपी रहिवासी नाहीत. टॅक्स चुकवण्यासाठी त्यांनी असं केलं असल्याची टीका झाली, पण अक्षता यांनी त्यानंतर कर भरण्यास सहमती देत त्या वादावर पडदा टाकला.
 
सुनक अर्थमंत्री पदावर असताना काही काळ त्यांच्याकडे ग्रीनकार्डही म्हणजे अमेरिकेतला स्थायी रहिवासी दाखला होता असंही समोर आलं, ज्यावर काहींनी आक्षेप घेतला होता.

Published By -Smita Joshi