मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

महिलांवरील वाईट टिप्पणीनंतरही राजकारण्यांना माफी का मिळते? - दृष्टिकोन

-दिव्या आर्य
खूप खूप अभिनंदन. देशातल्या सगळ्या महिला खासदार, महिला संघटना, सामान्य महिला, तुमचं आणि माझंसुद्धा खूप खूप अभिनंदन. कारण समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांनी माफी मागितली आहे. संसदेत डेप्युटी स्पीकरच्या पदावरील रमादेवी यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवरील टिप्पणी केल्यानंतर आझम खान लोकसभेतून बाहेर पडले होते.
 
महिला खासदारांनी या प्रकारावर भयंकर नाराजी व्यक्त केली, ज्यामुळे आझम खान यांनी 10 सेकंदांची का होईना पण माफी मागितली. नाहीतर पुन्हा एकदा एका महिला राजकारण्याला एका पुरुषाच्या वाईट टिप्पणीला विनोद समजून दूर सारावं लागलं असतं.
 
तो पुरुष जो महिलांना त्यांच्या पदामुळे नाही तर चेहरा, सौंदर्यामुळे आदर देण्याची भाषा बोलतो आणि तिच्यावर हसत सुटतो. जसं की महिलांच्या घटनात्मक पदावर असण्याला काहीच महत्त्व नाही. शेवटी सगळं काही ती एक महिला आहे इथवरच येऊन थांबतं. किती कष्ट करून ती या पदावर पोहोचली आहे, याला काही अर्थ उरत नाही. माफ करा, पण हा विनोद नाहीये. याला चुकीचं वर्तन करणं म्हणतात.
 
अशी वर्तणूक पुरुष महिलांसोबत करतात ते महिलांना कमी लेखण्यासाठीच. महिला असल्यामुळे तिच्या प्रगतीमागे सौंदर्याचा हात असेल, असं या पुरुषांना यातून सांगायचं असतं. महिला असल्यामुळे त्यांना विशेष भाव देण्यात येतो, एक वरिष्ठ असल्यामुळे नव्हे तर शारीरिक सौंदर्यामुळे त्यांची मतं टाळता येत नाहीत, असं या पुरुषांना वाटतं.
 
सामाजिक स्वीकृती
एखाद्या पुरुष राजकारण्यावर कुणी अशी टिपण्णी करताना तुम्ही कुणाला पाहिलं आहे?
 
आपण असा विचार तरी करू शकतो का की, एखादा पुरुष पंतप्रधान, गृहमंत्री अथवा सभापती या पदावर आहे आणि एखादा खासदार त्यांना म्हणेल की, तुमचं सौंदर्य मला इतकं आवडतं की, कायमस्वरूपी मला तुमच्याकडे बघायला आवडेल.
 
किती वाईट आहे हे. पण आपल्याकडे हे चालतं, त्यामुळे हे प्रकार सर्रास होतात. कधी संसदेत, तर कधी बाहेर. मग मोठ्याप्रमाणात चर्चा होते, टीका होते, टाव्हीवर चर्चा होते, लेख लिहले जातात. वेळेसोबत ही चर्चा मागे पडते. नशिबात असेल तर 10 सेकंदांची माफी मिळते.
 
अशी माफी, ज्यात म्हटलं जातं, "कुणी खासदार अशा नजरेतून स्पीकरकडे बघू शकत नाही. पण तसं वाटत असल्यास मी माफी मागतो." याचा अर्थ चुकी महिलेचीच आहे. तिला विनोद समजून घेता आला नाही. विनाकारणच तिला वाईट वाटलं. आझम खान यांच्या माफीवर रमा देवी म्हणतात, "मला माफी नकोय. तुमच्या वर्तणुकीत सुधारणा होईल, यासाठी पावलं उचलायला हवीत." पण, संसदेत सर्वांच्या संमतीनं माफीनामा मंजूर करत पुढच्या विधेयकावर चर्चा सुरू होते.
 
शिस्तीच्या कारवाईची रमादेवी यांची मागणी कुठेतरी विरून जाते. महिलांच्या समान अधिकाराच्या मागणीला संसद मात्र खोटं ठरवते, असं इथं दिसून येतं. कारण हे सगळ्यांना मंजूर आहे. ही वागणूक एखादा पक्ष अथवा व्यक्तीची नव्हे, तर सामान्य वागणुकीचा भाग आहे. महिला खासदारांच्या शरीरावर टिप्पणी करणं, मुलं मुलींचं लैंगिक शोषण करत असेल तर त्याला फक्त एक चूक म्हणणं, महिलांच्या कामाला दिखावा संबोधणं, महिलांच्या कामगिरीला सौंदर्यामुळे मिळालेलं यश सांगणं, हे सगळं वेळोवेळी समोर येतं.
 
याप्रकारच्या वागणुकीबाबत पुरुष राजकारण्यांमध्ये एक प्रकारची सहमती आहे. याप्रकाराबाबत सामान्य जनतेमध्येही सहमती आहे.