आम्हाला लोकसभेचे उपाध्यक्षपद द्या - शिवसेना
लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नेतृत्वात 353 खासदार निवडून आले असून, फक्त भाजपानंच बहुमताचा आकडा पार केला आणि 303 खासदार निवडून आले आहेत.
नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाची शपथ घेत त्यांच्या 57 सहकाऱ्यांनाही मंत्रिपदाची दिली. तर दुसरीकडे युतीमधील शिवसेनेचे 18 खासदार असूनही त्यांच्या वाट्याला फक्त एकच कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले आहे. त्यामुळे शिवसेना नाराज आहे.
शिवसेनेच्या वाट्याला कायम दुय्यम दर्जाचं अवजड उद्योग खातं दिलं जात असल्यानं शिवसेनेमध्येही नाराजी पसरली आहे. आता शिवसेनेनं लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर दावा केला असून, एनडीएमध्ये भाजपानंतर सर्वाधिक खासदार हे शिवसेनेचे निवडून आलेले आहेत. त्यामुळे साहजिकच लोकसभेच्या उपाध्यक्षपदावर शिवसेनेनं दावा केला आहे.
शिवसेने नुसार ही आमची मागणी नाही, तर तो आमचा नैसर्गिक अधिकार आहे असे म्हटले आहे. लोकसभेचे उपाध्यक्षपद हे आम्हालाच मिळालं पाहिजे, असं शिवसेना नेते खासदार संजय राऊतांनी सांगितलं आहे. तर दुसरीकडे हे पद शिवसेनेच्या वाट्याला आल्यास भावना गवळींना मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. भावना गवळी या शिवसेनेच्या अनुभवी खासदार आहेत. त्यामुळे आता भाजप शिवसेनेला पुन्हा पद देते की बोळवण करते हे लवकरच उघड होईल.