शनिवार, 25 जानेवारी 2025
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 22 एप्रिल 2022 (08:36 IST)

अमोल मिटकरी यांचं 'ब्रह्मास्त्र' भाजपवर पडणार की राष्ट्रवादीवर उलटणार?

amol mitkari
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विधान परिषद आमदार अमोल मिटकरी बुधवारी इस्लामपूरमध्ये होते. निमित्त होतं राष्ट्रवादी काँग्रेस परिवार संवाद सभेचं.
 
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचं मूळ गाव असल्याने अर्थातच ते स्वतः या सभेला आवर्जून उपस्थित होते. त्यांच्यासोबतच या कार्यक्रमात सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचीसुद्धा प्रमुख हजेरी होती.
 
सभेदरम्यान मिटकरींनी त्यांच्या नेहमीच्या शैलीत आक्रमक भाषण केलं. भाजपवाल्यांनी आम्हाला धर्म शिकवू नये, असं म्हणत व्यासपीठावरुन हनुमान चालीसा म्हटली.
 
भाषण रंगात आलं असतानाच मिटकरी यांनी आणखी एक वक्तव्य केलं. याच वक्तव्यावरून राजकीय वातावरण पेटल्याचं गुरुवारी दिसून आलं.
 
पण मिटकरी यांच्या या वक्तव्यामुळे भाजपची कोंडी होणार की हे वक्तव्य राष्ट्रवादीवरच उलटणार हा प्रमुख प्रश्न यामुळे निर्माण होतो.
 
अमोल मिटकरी नेमकं काय म्हणाले?
हे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी आपल्याला अमोल मिटकरी यांनी नेमकं काय म्हटलं ते समजून घेणं महत्त्वाचं आहे.
 
इस्लामपुरच्या सभेत बोलताना मिटकरी म्हणाले, "मी एका ठिकाणी गेलो होतो. मुलीचा बाप म्हणे, बसा कन्यादान आहे. अन्नदान ऐकलं, नेत्रदान ऐकलं, रक्तदान ऐकलं. पण कन्या काय दान करण्याचा विषय असतो का? ते म्हणाले, हो, हो असतो ना. आम्हाला शिकवलंय असं.
 
"तिथं महाराज नवऱ्या मुलाला म्हणाले, तुमचा आणि तुमच्या मुलीचा हात माझ्या हातात द्या. म्हणा, 'मम भार्या समर्पयामी'. तेव्हा मी त्या नवरदेवाच्या कानात म्हटलं, अरे येड्या, 'मम' म्हणजे माझी, 'भार्या' म्हणजे बायको, 'समर्पयामी' म्हणजे घेऊन जा, असं ते महाराज म्हणत आहेत."
मिटकरी यांच्या भाषणादरम्यान व्यासपीठावर जोरदार हशा पिकला होता. जयंत पाटील आणि धनंजय मुंडे यादम्यान खदखदून हसत होते. अखेर, पुढे आणखी मान्यवरांची भाषणे होणार असल्याने वेळेअभावी मिटकरी यांना भाषण थांबवण्यास सांगण्यात आलं.
 
भाषण सांगलीत, पडसाद पुण्यात
मिटकरी यांचं भाषण सांगलीत झालं असलं तरी त्यांच्या भाषणाचे पडसाद मात्र पुण्यात उमटल्याचं दिसून आलं. मिटकरी यांच्या वक्तव्याविरोधात ब्राह्मण महासंघ आक्रमक झाला.
 
पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयासमोर त्यांच्याकडून आंदोलन करण्यात आलं. ब्राह्मण महासंघाचे कार्यकर्ते येणार असल्याचं कळाल्यानंतर पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्ते जमा झाले होते. यादरम्यान तणाव वाढून दोन्ही बाजूंमध्ये धक्काबुक्कीचा प्रकारही घडल्याचं दिसून आलं.
 
मिटकरींनी पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. तसंच या प्रकरणी मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
यावर प्रतिक्रिया देताना मिटकरींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. "मी कुठल्याही समाजाचा उल्लेख करत भाष्य केलं नाही. कुठलंही चुकीचं विधान केलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
वक्तव्यामागे राजकीय डावपेच?
पुण्यातील आंदोलन हे कोणत्याही पक्षातर्फे नसून ब्राह्मण महासंघ या संघटनेमार्फत करण्यात आलं होतं. भाजपकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया सुरुवातीला आली नाही.
 
त्यामुळे, 'हे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेलं जाळं आहे, त्याच्यात आपण अडकू नये, यासाठी भाजपने याबाबत मौन बाळगलं आहे का,' अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू झाली.
 
तज्ज्ञांच्या मते, याचं प्रमुख कारण म्हणजे, 'भाजपच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत झालेले प्रमुख बदल होय.'
 
मिटकरींनी पुरोहित वर्गाची आणि ब्राह्मण समाजाची खिल्ली उडवल्याचा आरोप ब्राह्मण महासंघाने केला. तसंच या प्रकरणी मिटकरींनी माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली.
 
यावर प्रतिक्रिया देताना मिटकरींनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले. "मी कुठल्याही समाजाचा उल्लेख करत भाष्य केलं नाही. कुठलंही चुकीचं विधान केलं नसल्याने माफी मागण्याचा प्रश्न नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
 
वक्तव्यामागे राजकीय डावपेच?
पुण्यातील आंदोलन हे कोणत्याही पक्षातर्फे नसून ब्राह्मण महासंघ या संघटनेमार्फत करण्यात आलं होतं. भाजपकडून यासंदर्भात कोणतीही प्रतिक्रिया सुरुवातीला आली नाही.
 
त्यामुळे, 'हे राष्ट्रवादी काँग्रेसने लावलेलं जाळं आहे, त्याच्यात आपण अडकू नये, यासाठी भाजपने याबाबत मौन बाळगलं आहे का,' अशी चर्चा राजकीय तज्ज्ञांमध्ये सुरू झाली.
 
तज्ज्ञांच्या मते, याचं प्रमुख कारण म्हणजे, 'भाजपच्या राजकारणात गेल्या काही वर्षांत झालेले प्रमुख बदल होय.'
 
भाजप हा शेटजी-भटजींचा पक्ष आहे, अशी टीका पूर्वीच्या काळी भाजपवर केली जायची. भाजपमध्ये केवळ उच्चवर्णीय नेत्यांची गर्दी आहे. उच्चवर्णीयांचेच प्रश्न भाजप हाती घेतो, असा आरोप केला जायचा. पण पुढे जनमानसातील आपली प्रतिमा बदलण्यासाठी भाजपने माधव म्हणजे माळी, धनगर आणि वंजारी हा फॉर्म्युला हाती घेतला.
 
त्यानंतर फडणवीसांच्या काळात अनेक मराठा नेते भाजपमध्ये सहभागी झाले. त्यामुळे गेल्या काही वर्षांत भाजपला बहुजन चेहरामोहरा देण्याचा प्रयत्न नेत्यांकडून सुरू आहे.
 
अशा स्थितीत वर्षानुवर्षे आपल्या वर्चस्वाखाली असलेले बहुजन - विशेषतः मराठा मतदार भाजपकडे जाऊ नयेत, यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रयत्न सुरू असतात. त्याच प्रयत्नांचा हा भाग असू शकतो.
 
या पार्श्वभूमीवर भाजप ब्राह्मणांची बाजू मांडण्यास पुढे आला तर त्यांची कोंडी करता येऊ शकेल, असा विचार राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांनी केला आहे, अशी शक्यता राजकीय तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात होती.
पण, भाजपने काही वेळाने काही होईना, यावर आक्रमक प्रतिक्रिया दिली. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष तुषार भोसले मिटकरींवर टीका करताना म्हणाले, "पवित्र हिंदू संस्कृतीची खिल्ली उडवणारा अमोल मिटकरी 'शकुनी' मामा आहे. हिंदू समाज या बांडगुळांना आणि शकूनी मामाच्या फौजेला योग्य उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही."
 
राष्ट्रवादी काँग्रेसकडून डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न
या वक्तव्यानंतर वातावरण तापत असल्याचं पाहून जयंत पाटलांसह धनंजय मुंडे यांनी डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला.
 
ज्या वक्तव्यावर सभेदरम्यान खळखळून हसत होते, ते वक्तव्य अमोल मिटकरी यांचं वैयक्तिक मत असून त्याच्याशी पक्षाचा काहीएक संबंध नसल्याचं स्पष्टीकरण दोन्ही नेत्यांकडून देण्यात आलं.
 
 
जयंत पाटील याविषयी प्रतिक्रिया देताना म्हणाले, "अमोल मिटकरी यांच्या भाषणात बरेच विनोद होते. त्यामुळे सर्व जण पोट धरून हसत होते. त्यांनी लग्नप्रक्रियेतील मंत्रांचा उल्लेख केला आणि त्यानंतर वक्तव्य केलं. या वक्तव्यानंतर मी त्यांना भाषण थांबवण्याची सूचना दिली. ते वक्तव्य त्यांचं वैयक्तिक मत आहे."
 
"महाराष्ट्रात फिरताना ब्राह्मण समाजाने आमचं स्वागत केलेलं आहे. त्यामुळे ब्राह्मण समाजाला दुखावण्याचा कोणताही हेतू त्या सभेचा नव्हता. पण अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे जर ब्राह्मण समाजाच्या भावना दुखावल्या असतील तर ती आमची भूमिका नव्हती. त्याबाबत मलाही खेद वाटतोय. त्यांचं वक्तव्य तपासलं तर ब्राह्मण समाजाचा उल्लेख कुठेही नाही. पण जे मंत्रपठण आहे, त्यामुळे समाजाची एक भावना तयार झाली आहे. आम्हाला ब्राह्मण समाजाबद्दल आपुलकी आहे."
 
"मिटकरी यांनी केलेले वक्तव्य हे एका लग्नाच्या संदर्भात होते. यात कोणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर ते खेदजनक आहे. मिटकरी यांचं ते व्यक्तिगत भाष्य होतं. राष्ट्रवादी म्हणून तो विषय बोलले नव्हते. त्यांनी त्यांचा एक स्वतःचा अनुभव सांगितला," अशी प्रतिक्रिया धनंजय मुंडे यांनी याबाबत दिली.
 
राष्ट्रवादीची तुकडे तुकडे गँग आवरावी - चंद्रकांत पाटील
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सायंकाळी एक निवेदन प्रसिद्धीमाध्यमांना दिलं. राष्ट्रवादीची तुकडे-तुकडे गँग शरद पवारांनी आवरावी, अशी मागणी त्यांनी यामार्फत केली आहे.
 
या प्रसिद्धीपत्रकात चंद्रकांत पाटील म्हणतात, "राष्ट्रवादी काँग्रेस नेते अमोल मिटकरी यांनी जाहीर सभेत हिंदू पुरोहितांची टिंगल केल्यामुळे असंतोष निर्माण झाला आहे. समाजातील एकेका घटकाला टार्गेट करून विविध समाज घटकांमध्ये विसंवाद निर्माण करत समाजाचे तुकडे करण्याचं काम राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे. राष्ट्रवादीची ही तुकडे-तुकडे गँग शरद पवारांनी आवरावी."
 
याविषयी बीबीसी मराठीने भाजप प्रवक्ते माधव भांडारी यांच्याशीही चर्चा केली. ते म्हणाले, "समाजा-समाजात फूट पाडणारी विधाने करणं हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अजेंडा आहे, हे लपून राहिलेलं नाही. भाजपवर शेटजी-भटजींचा पक्ष म्हणून टीका करणारे आता कुठे गेले आणि सर्वांना सोबत घेऊन राजकारण करणारा भाजप सध्या कुठे आहे, हे एकदा तपासून घ्या."
 
छोट्या-छोट्या समाजगटांचीही पक्षाला गरज
राष्ट्रवादी काँग्रेस नेत्यांकडून अशा प्रकारची वक्तव्ये होणं, हे त्यांच्याच पक्षासाठी अपायकारक आहे, अशी प्रतिक्रिया यासंदर्भात राजकीय तज्ज्ञांनी बीबीसीशी बोलताना दिली.
 
ज्येष्ठ पत्रकार अद्वैत मेहता याबाबत म्हणाले, "मुस्लीम आपले मतदार नाहीत, असं मानून भाजप अनेकवेळा मुस्लीम विरोधी भूमिका घेतो. त्याच पद्धतीने ब्राह्मण हे भाजपचे परंपरागत मतदार आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसचे ते मतदार नाहीत, या विचारातून मिटकरी यांच्याकडून टीका झालेली असू शकते."
 
 
"पण भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे, तर राष्ट्रवादी काँग्रेस हा प्रादेशिक पक्ष आहे. दोन्ही पक्षांचं राजकारण वेगळं आहे. प्रादेशिक पक्षांना छोट्या-छोट्या समाजगटांची जास्त गरज भासते. त्यामुळे पक्षाला हे परवडणारं नाही, हे लक्षात येताच प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या प्रकरणातून अंग काढून घेतलेलं आहे," असं अद्वैत मेहता यांना वाटतं.
 
'मिटकरींचं वक्तव्य गंभीरपणे घेऊ नये'
याच मुद्दयाविषयी अधिक सविस्तर बोलताना ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई म्हणतात, "नवोदित नेते आपल्या पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांचं लक्ष वेधून घेण्यासाठी, त्यांच्या नजरेत राहण्यासाठी अशा प्रकारची वक्तव्ये, भाषणे करत असतात. आपलं काम दाखवण्याचा प्रयत्न करतात. पण कधीकधी पक्षालाच त्याचा फटका बसतो की काय अशी वेळ येते."
 
"पण मिटकरींनी विचारपूर्वक सापळा रचून हे वक्तव्य नक्कीच केलेलं नाही, भाषणाच्या उत्स्फूर्ततेनेच त्यांचं ते विधान आलं आहे. अन्यधा पक्षाने या प्रकरणातून अंग काढून घेतलं नसतं," याकडेही देसाई यांनी लक्ष वेधलं.
 
तर, अमोल मिटकरी हे पक्षात आपल्या भाषणांमुळे प्रसिद्ध असले तरी त्यांच्या वक्तव्यांना गंभीरपणे घेऊ नये, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार विजय चोरमारे यांनी दिली.
 
त्यांच्या मते, "अमोल मिटकरी भाषणांमुळे प्रसिद्ध असले तरी त्यांची भूमिका हीच पक्षाची भूमिका असं म्हणणं योग्य ठरणार नाही. मिटकरी हे खालच्या फळीतील नेते आहेत. त्यामुळे त्यांच्या म्हणण्याला पक्षाचं म्हणणं समजावं, इतकं महत्व त्यांना अद्याप तरी नाही. त्यामुळे त्यांचं वक्तव्य गंभीरपणे घेण्याची गरज नाही."