झिम्बाब्वेतल्या हवांगे नॅशनल पार्कमधील सुमारे 55 हत्तींचा दुष्काळामुळे मृत्यू झालाय. गेल्या दोन महिन्यांपासून या भागत भीषण दुष्काळ आहे.
"परिस्थिती खूप भयंकर आहे," अशी चिंता झिमपार्क्सचे प्रवक्ते तिनाशे फाराओ यांनी व्यक्त केली. झिम पार्क्स ही झिम्बाब्वेमधील उद्यानं आणि वन्यजीव व्यवस्थापनासंदर्भातील प्राधिकरण आहे.
हत्तींचा उपासमारीनं मृत्यू होतोय आणि हीच मोठी समस्या असल्याचे फाराओ यांनी सांगितलं.
झिम्बाब्वेतील शेतीलाही दुष्काळाची मोठी झळ बसलीय. झिम्बाब्वेतल्या पीक उत्पादनात मोठी घट झाल्याची नोंद झालीय. झिम्बाब्वेत सध्या आर्थिक संकटही कोसळळंय. त्यामुळं देशाच्या सुमारे एक तृतियांश लोकांना अन्नाची गरज आहे.
वर्ल्ड फूड प्रोग्रामच्या अहवालानुसार, झिम्बाब्वेतील 20 लाख लोक उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत.
अनेक हत्ती तलावापासून 50 मीटरच्या अंतरावर मृत्युमुखी पडले. ते पाण्याच्या शोधात निघाले असातनाच त्यांचा बळी गेल्याचा अंदाज वर्तवला जातोय.
हत्तींनी या पार्कमधील वनस्पतींचं मोठ्या प्रमाणात नुकसानही केलंय. या पार्कमध्ये 15 हजार हत्ती राहण्याची क्षमता आहे. मात्र इथं 50 हजारांहून अधिक हत्ती आहेत, असं फाराओ यांनी सांगितलं.
या पार्कला झिम्बाब्वे सरकारकडून मदतनिधी मिळत नाही. त्यामुळं पार्क प्रशासन विहिरी खोदण्याचा प्रयत्न करतंय, मात्र पैशांचीही चणचण भासू लागलीय, असंही फाराओंनी सांगितलं.
बीबीसीचे प्रतिनिधी अँड्र्यू हार्डिंग यांचं विश्लेषण
सुकं खटखटीत पडलेल्या तलावात हत्तींचे मृतदेह सापडले. गेल्या दोन महिन्यात सुमारे 55 हत्तींचा मृत्यू झालाय. भीषण दुष्काळाची झळ आता वनस्पती आणि माणसांनाही बसण्याची भीती आहे.
झिम्बाब्वेतलं या सर्वात मोठ्या हवांगे नॅशनल पार्कमध्ये केवळ पावसाची कमतरता असल्यानं पाणी नाही, हीच एक समस्या नाहीय, तर इथे प्रमाणापेक्षा अधिक हत्ती आहेत. त्यामुळं तिथं त्यांना पुरेसं अन्न मिळत नाही आणि पर्यायानं ते जंगलाच्या बाहेर निघतात. यातून जवळपासच्या गावांमधील 22 लोकांचा आजवर या हत्तींना जीव घेतलाय.
झिम्बाब्वेत आर्थिक संकट असल्यानं सरकारनेही या पार्क्सना पैसे देण्यास नकार दिलाय, कारण वन्यजीवांच्या संरक्षणासाठी सरकारच्या तिजोरीत पैसे उपलब्ध नाहीत.
या हत्तींची परदेशात विक्री करणं हा एक उपाय आहे, मात्र या उपायावर वन्यजीव तज्ज्ञांनी तीव्र आक्षेप घेतलाय. त्यांचं म्हणणं आहे की, चिनी प्राणीसंग्रहालयात पाठवण्यात आलेल्या हत्तींना त्यांच्या कळपापासून तोडण्यात आलं, त्यामुळं त्यांच्यावर आघात झाल्याचं दिसून आलं होतं.