मंगळवार, 24 डिसेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By

धनंजय मुंडे प्रकरणावरून शरद पवारांचा महिला आयोगावर निशाणा

पंकजा मुंडे यांच्याविषयी धनंजय मुंडे यांनी केलेल्या कथित वक्तव्याची दखल घेत राज्य महिला आयोगानं त्यांच्यावर कारवाईचे संकेत दिले आहेत.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी महिला आयोगाच्या या कृतीवर उपरोधिक वक्तव्य केलं आहे.
 
"महिला आयोग हा स्वतंत्र आयोग आहे. त्याला घटनात्मक महत्त्व आहे. या पदावर असताना आपण भाजपचे प्रतिनिधी आहोत, हे दाखवलंच पाहिजे असं नाही," असं शरद पवार यांनी म्हटल आहे.
 
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर आहेत, ज्या भाजपच्या महिला मोर्चाच्या राष्ट्रीय अध्यक्षाही आहेत.
 
धनंजय मुंडे यांच्या वक्तव्यानंतर राज्य महिला आयोगाने ट्वीट केलं होतं की, "मंत्री व परळीमधील उमेदवार पंकजा मुंडे यांच्याबद्दल त्यांचे प्रतिस्पर्धी धनंजय मुंडे यांचे विधान धक्कादायक व अशोभनीय आहे. महिला आयोग या विधानाची स्वतःहून दखल घेणार आहे. मुंडे यांचे हे विधान महिलांनाच लज्जा उत्पन्न निर्माण करणारे आहे, असे आयोगाचे सकृतदर्शनी मत बनले आहे.
 
"महिलांच्या प्रतिष्ठेला बाधा येणारी विधाने राजकीय नेत्यांनी करू नयेत. यापूर्वीही महिला आयोगाने अनुचित विधाने केल्याबद्दल राम कदम, प्रशांत परिचारक यांच्याविरुद्ध कारवाई केली होती. तसेच प्रियांका गांधी, उर्मिला मातोंडकर यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह टिप्पणीप्रकरणी कारवाई केलेली होती," असं महिला आयोगाने म्हटलं आहे.