गुरूवार, 28 नोव्हेंबर 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020 (16:46 IST)

'मला वाटलं आता मी मरेन', मृत्यूच्या दाढेतून परतलेल्या चिमुकल्याचा थरारक अनुभव

रवी सैनी हा 10-वर्षांचा मुलगा आई-वडिलांसोबत समुद्रकिनारी फिरायला गेला होता. पण अचानक समुद्राच्या लाटांनी त्याला वेढून टाकलं आणि समुद्रात ओढलं.
 
त्यावेळी त्याच्या मनात आलेल्या भावना व्यक्त करताना रवी सैनी म्हणतो, "मला वाटलं, आता मी मरणार."
 
इंग्लंडमधल्या लीड्स या ठिकणी राहणारा रवी आपल्या कुटुंबासोबत, म्हणजेच आई पुष्पा देवी, वडील नथू राम आणि बहीण मुस्कान यांच्यासोबत काही महिन्यांपूर्वी साऊथ बे बीचवर फिरायला गेला होता.
 
बहीण आणि वडील यांच्याबरोबर तो पाण्यात खेळत होता, एवढ्यात पाण्याची पातळी अचानक वाढली आणि जोरदार लाटांच्या माऱ्याने तो समुद्रात ओढला गेला. पण त्या आणीबाणीच्या परिस्थितीही त्या चिमुकल्याने जे धैर्य दाखवलं त्याबद्दल त्याचं सर्वत्र कौतुक होतंय.
 
मी एवढ्या मोठ्या लाटा कधीच पाहिल्या नव्हत्या, असं रवी सांगतो. आपल्या डोळ्यांदेखत आपला मुलगा पाण्यात ओढला गेल्याचा प्रसंग किती भयानक होता हे व्यवसायाने शेफ असलेले रवीचे वडील राम सांगतात.
 
"माझ्याही नाकातोंडात पाणी जायला लागलं होतं. माझा स्वतःच्या शरीरावरचा ताबा सुटला होता. कितीही प्रयत्न केला तरी मी त्याच्यापर्यंत पोहोचू शकत नव्हतो. हळूहळू तो लांब जायला लागला होता. लाटा त्याला ओढून नेत होत्या, मला त्याचा चेहरा एक-दोनदाच दिसला आणि नंतर तो दिसेनासा झाला. माझ्या डोळ्यांदेखत माझा मुलगा मृत्यूच्या दाढेत ओढला जात होता."
 
पण रवीच्या प्रसंगावधानाने त्याचा जीव वाचला.
 
दोन्ही हात आणि पाय पसरून, पाठीवर तरंगत तो बचावपथकाची वाट पाहत होता. बुडण्यापासून वाचण्याचा हा मोठा मूलमंत्र आहे. बचावपथकाला तो तब्बल 1 तासाच्या शोधानंतर सापडला. लाटांचा जोर इतका होता की रवी बुडण्याची शक्यता अधिक होती. बचावपथकालाही तीच धास्ती होती, पण रवीने प्रसंगावधान राखून स्वतःचा जीव वाचवला.
 
"पाण्यात ओढलो गेलो तेव्हा माझे वडील मला वाचवण्यासाठी धावले. पण पाण्याची पातळी त्यांच्या उंचीपेक्षा खूपच जास्त होती. मी प्रचंड घाबरलो होतो आणि माझं आयुष्य इथेच संपलं असं वाटत होतं." पण तासाभराने, जो काळ रवीच्या दृष्टीने त्याच्या आयुष्यातला सगळ्यात कठीण काळ होता, लाईफबोटीचा आवाज येऊ लागला.
 
रवीने तेवढा काळ आपला जीव वाचवण्यासाठी 'जगण्यासाठी तरंगत राहा' या मूलमंत्राचा वापर केला. पाण्यात बुडण्याचा धोका असेल तेव्हा काय कराल हे सांगणारी बीबीसीची 'सेव्हिंग लाईव्हज् अॅट सी' या डॉक्युमेंट्रीतला सल्ला ऐकल्याचं तो सांगतो.
 
"या डॉक्युमेंट्रीतच हा सल्ला दिला होता की, जास्त ताकद वापरून लाटांशी लढू नका, अशाने पाणी नाका-तोंडात जाऊन बुडण्याचा धोका वाढतो. शांत रहा, तरंगत राहा, बचावपथक तुमच्यापर्यंत पोहचेल. मी तसंच केलं. हातपाय पसरले आणि पाठीवर पडून स्टारफिशसारखा तरंगत राहिलो," रवी सांगतो. या घटनेनंतर जणूकाही आपला पुर्नजन्मच झाल्याचं रवी म्हणतो. आपला जीव वाचवणाऱ्या बचावपथकाचेही तो आभार मानतो.
 
रवीला वाचवणाऱ्या बचावपथकाचे सदस्य रूंडी बरमॅन यांनी रवीचं कौतुक 'अत्यंत हुशार चिमुकला' अशा शब्दांत केलं आहे.
 
'जगण्यासाठी तरंगत राहा' हा मंत्र सांगतो की, जेव्हा तुम्ही पाण्यात पडता आणि बुडण्याचा धोका असतो, तेव्हा हातपाय मारण्याची किंवा जीवाच्या आकांताने पोहण्याची उर्मी टाळा. आपल्या पाठीवर पडा, हातपाय पसरा आणि तरंगत राहा. तरंगत राहिल्याने बचावपथक तुमच्यापर्यंत पोहचेपर्यंत तुमचा जीव वाचू शकतो.