पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह अर्थातच 'भेडाघाट'
मध्य प्रदेशातील सातपुडा पर्वताच्या अंगाखांद्यावरून हिंदोळे घेत नर्मदा नदी प्रवास करत आहे. नर्मदेवर असलेल्या घाटामध्ये 'भेडाघाट' त्याच्या अद्वितीय लावण्यामुळे डोळे दिपवून टाकतो. चहुबाजुंनी उभे असलेले पांढरे शुभ्र डोंगर आणि नर्मदेचा शांत निळा प्रवाह आजही पर्यटकांना खुणावतो आहे.
सरत्या हिवाळ्यात नर्मदा उत्सव साजरा केला जातो तर उन्हाळ्याच्या प्रारंभी येणार्या पोर्णिमेला धमाल असते. त्यावेळी तर भेडाघाटवर मुंगीला देखील 'एन्ट्री' मिळत नाही इतकी गर्दी असते. नर्मदा नदी अमरकंटक येथून धावत येते आणि या ठिकाणी जवळपास 50 ते 60 फुटांवरून उडी घेते. येथे निर्माण झालेला दुधाळ धबधबा पर्यटकांचा प्रवासातील शीण क्षणात नाहीसा करतो. उंचावरून उडी घेऊन दम भरलेली नर्मदा पंचवटी येथे पुन्हा शांत होते. तेथील संगमरवरी अलौंकिक सौंदर्य पर्यटकांना दाखविण्यासाठी जुन्या बनावटीच्या होड्या सज्ज असतात. मात्र, नाविक पर्यटकांना होडीत बसवून प्रत्येक ठिकाणाची वैशिष्टयपूर्ण अशी माहिती देतात..
गिर्यारोहकांसाठी तर अदभूत सौंदर्याचा नजारा निसर्गाने येथे पेश केला आहे. अलिकडच्या काळात भेडाघाटचा मोठ्या प्रमाणात विकास झाला असल्याने तेथील उंच उंच पर्वतरांगा 'रोप वे' ने जोडण्यात आल्या आहेत. भेडाघाड परिसरात अनेक देवीदेवतांची मंदिरे आहेत. ही सगळी मंदिरे प्राचीन असून मंदिरातील मूर्ती संगमरवरी आहेत.
येथे प्राचीन चौसष्ठ योगिनी मंदिर गोलाकार असून प्राकृतिक सौंदर्याने नटलेले आहे. मातेचे दर्शन घेण्यासाठी कमरेत वाकून जावे लागते. मंदिर परिसरात असलेल्या पहाडावर प्राचीन कोरलेल्या मुर्ती आहेत तर भलीमोठी शंकराची पिंड आहे.
कसे पोहोचाल?
हवाई मार्ग-
'भेडाघाट' पासून जबलपूर विमानतळ सगळ्यात जवळचे आहे. भोपाळ व दिल्ली येथे जाण्यासाठी येथून नियमित सेवा सुरु आहे.
रेल्वे मार्ग-
व्हाया इलाहबाद मुंबई-हावडा मुख्य रेल्वे मार्गावर जबलपूर हे मोठे रेल्वे स्थानक आहे. सर्व एक्सप्रेस व पॅसेंजर गाड्यांना येथे थांबा आहे.
महामार्ग-
भेडाघाट हे जबलपूरपासून अवघ्या 23 किलोमीटरवर आहे. जबलपूरहून बस व खाजगी वाहन भेडाघाटला जाण्यासाठी सहज मिळतात.