कामदागिरी पर्वत अर्थातच चित्रकूट पर्वत
हिंदू जनमानसात अतिशय श्रद्धेचे स्थान असलेल्या राम सीता आणि लक्ष्मणाने त्यांच्या वनवास काळातील साडेअकरा वर्षांचा काळ चित्रकूट भागात व्यतीत केला असल्याचे मानले जाते. घनदाट अरणे, चित्रविचित्र आणि विपुल वृक्षसंपदा, तर्हे तर्हेची फुले फळे यामुळे नटलेला हा भाग कुणालाही सहज भुरळ घालेल यात नवल नाही. सती अनुसुया, अत्री ऋषी, दत्तात्रेय, महर्षी मार्कंडेय अशा अनेक साधूसंतांनी येथे साधना करून अलौकीकत्व प्राप्त केले अशी श्रद्धा आहे. ब्रह्मा विष्णू महेशाचा अवतार येथेच झाला. वाल्मिकी रामायणात याचे संदर्भ सापडतात तसेच महाकवी कालिदासाच्या रघुवंशात येथील सुंदर नैसर्गिक सौंदर्यस्थळाचे वर्णन सापडते. यक्षाचे एकांतस्थळ म्हणून याचे वर्णन कालिदासाने केले आहे. मात्र चित्रकूट ऐवजी रामगिरी असे नाव या स्थळाला त्याने मेघदूतात दिले आहे. संत तुळशीदासाला रामदर्शनाचा लभ याच ठिकाणी झाला होता.
राम वनवासात गेल्यानंतर त्याला परत आणण्यासाठी गेलेले भरत आणि ज्या ठिकाणाहून त्याने रामाच्या पादुका नेऊन अयोध्येच्या सिहासनावर ठेवून कारभार केला ते ठिकाण हेच. मात्र भरत भेटीनंतर रामाने हे ठिकाणी सोडून दंडकारण्यात प्रवेश केला असे रामायण सांगते. भरत मिलाप येथे या चार दशरथ पुत्रांची झालेली भेट इतकी हृदयस्पर्शी होती की तेथील खडकही ती भेट पाहून वितळले. या खडकात उमटलेली राम सीतेची पावले आजही पाहायला मिळतात. जवळच असलेले जानकी कुंड म्हणजे सीतेच्या स्नानाची जागा. मंदाकिनी नदीच्या काठावर असलेला रामघाट आवर्जून पाहावा असाच याठिकाणी अनेक साधूसंतांनी साधना केली आहे. रात्रीची आरती फारच मनोहारी असते. येथेच रामाने तुळशीदासाला दर्शन दिले अशी भाविकांची श्रद्धा आहे.
कामदागिरी पर्वत म्हणजे खरा चित्रकूट. घनदाट जंगलाने वेढलेली ही टेकडी तेथे अनेक मंदिरे आहेत. येथून 16 किमीवर असलेला सती अनुसुया आश्रम म्हणेज खरा वनविहार. येथे अनेक प्रकारचे पक्ष पाहायला मिळतात. अत्री मुनीच्या साधनेने पावन झालेले हे स्थान. याची कथा अशी सांगतात की या भागात दहा वर्षे पाऊसच पडला नाही. मग सती अनुसुयेने कडक तप आरंभिले. शेवटी तिच्या तपाचे फळ म्हणून स्वर्गातून मंदाकिनी नदी खाली आली आणि हा परिसर तृप्त झाला.
रामानेही या ठिकाणी भेट दिली होती. येथेच त्याने सतीचे महत्व सीतेला कथन केले. येथून दंडकारण्याचा आरंभ होतो. दंडकारण्य हे रावणाचे अरण्य.