रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: रविवार, 31 डिसेंबर 2023 (14:56 IST)

घोस्ट टुरिझम : काळ्या आणि अंधाऱ्या जगाची सफर जिथे ‘भुतं’ तुमची पाठ सोडत नाहीत

Scotland
माझ्या आयुष्यात एवढे पैसे असावेत की मी मनात येईल तेव्हा एडिंबराला जाऊ शकेन आणि तिकडे मनसोक्त राहू शकेन असं माझं स्वप्न आहे.
अर्थात हे स्वप्न नव्यानेच यादीत अॅड झालंय. त्याच झालं असं की काही महिन्यांपूर्वी मी स्कॉटलंडची ट्रीप केली, लंडनहून ग्लासगोला जाताना मध्ये रस्त्यात हलका पाऊस, छोट्या टेकड्यास वळणदार रस्ते असं सगळं लागत होतं. रील्समध्ये पाहून तुमचा जीव जळतो ना, ते हेच स्कॉटलंड.
 
पण आपण भारतीय अतिशय विचित्र प्राणी आहोत. रिल्समध्ये बघून जळायचं, मग पैसे साठवून ट्रीप करायची आणि फायनली तिथे गेल्यावर म्हणायचं. “अरे, यापेक्षा तर इंडियाचं छान आहे.”
 
मीही असंच केलं. पहिल्या दिवशी थोडं फिरल्यावर तिथेच स्थायिक असणाऱ्या बहिणीला, “काय स्कॉटलंड, जव्हारसारखं तर आहे. पाऊस, घाट, ग्रीनरी. जव्हार तर नाशिकपासून जवळपण आहे” असा मेसेज करून तिला एक्झिस्टेंनशिअल क्रायसिस दिला होता.
 
पण ज्यादिवशी एडिंबरामध्ये पाऊल ठेवलं तेव्हा त्या शहराच्या प्रेमात पडले. आपल्याला इथेच राहायचं असं ठरवून टाकलं. मग बँक अकाऊंट नको म्हणालं.
 
पण तो विषय नाही.
 
नितांतसुंदर शहर. स्कॉटलंडची राजधानी. काव्य,शास्त्र, कलेने समृद्ध.
 
पोहोचले त्याच दिवशी एडिंबराच्या कॅसलमध्ये फिरत होते. प्रसिद्ध असा किल्ला. उंच टेकडीवर वसलेल्या या किल्ल्यात प्रवेश केला की उजव्या बाजूला तटबंदी आहे. तिथून एडिंबरा शहर, आणि दूरवरच्या आयरिश समुद्राचा काय कमाल व्ह्यू दिसतो.
 
पाऊस भुरभुरत होता, (तो स्कॉटलंडमध्ये असतोच). माझ्या बाजूला एक आजी-आजोबा भली भोठी छत्री घेऊन समोरचं दृश्य पाहात होतो. मी मूळ भारतीय स्वभावाप्रमाणे त्यांच्या छत्रीत घुसता येतं का ते पाहात होते.
 
मग ते मला सरळच म्हणाले, "ये बाई तू छत्रीत." मी आपलं हीही केलं.
 
मला एक यूकेत फिरताना कुठेही गेलं की आजोबा किंवा आजी भेटायचे आणि ते माझ्याइतकेच रिकामे असल्याने माझ्याशी गप्पा मारायला त्यांना वेळ असायचा.
 
ते इंग्लंडमधल्या ब्रिस्टॉलचे राहाणारे होते. छत्रीत घ्यायच्या आधी त्यांनी प्रश्न विचारला, तू ब्रिस्टॉलला गेली आहेस का? आता तेही सुंदर शहर आहे, पण त्यावेळी परवडत नसल्याने माझ्या फिरण्याच्या यादीत नव्हतं. आता नाही म्हटलं तर छत्री जाण्याचा धोका. मग म्हणाले, हो मला जायचं आहे, आता योग येईल तेव्हा पाहू.
 
मग मीच गाडी एडिंबराकडे वळवली. म्हटलं की किती सुंदर शहर आहे. तुम्हाला इथलं काय आवडतं?
 
ते म्हणाले, “भुतं.”
 
आता मला एक्झिस्टेंनशिअल क्रायसिस आला.
 
पण ते म्हणाले, “एडिंबरा युरोपची घोस्ट कॅपिटल आहे. लोक खास त्यासाठी इथे येतात. तू इथली घोस्ट टूर बुक केलीस की नाही.”
 
गुगलवर सर्च केलं तर एडिंबराच्या सुप्रसिद्ध भुतांच्या कहाण्या यायला लागल्या.
 
ते पुढे म्हणाले, “तू ज्या कॅसलमध्ये आली आहेत, इथेही भुतं आहेत.”
 
समोरून चायनीज पर्यटकांचा एक मोठा गट जात होता, आणि त्यांनी एक गाईड केला होता. दुसऱ्याने गाईड केला असला की त्याच्या मागे मागे रेंगाळणं आपल्याला चांगलं जमतं, माहिती पण मिळते आणि पैसे पण द्यावे लागत नाही.
 
भीती एकच होती की हा चायनीज भाषेत बोलत असला तर, पण तो 6 फुट उंचीचा स्कॉट होता. त्याला चायनिज यायची शक्यता कमीच होती.
 
त्या ग्रुपच्या मागे लक्षात येणार नाही, पण तो काय सांगतोय हे ऐकू येईल अशा अंतरावर रेंगाळल्याने माहिती मिळाली ती अशी...
 
हा किल्ला ज्या टेकडीवर आहे तिला कॅसलरॉक असं म्हणतात. ज्वालामुखीच्या उत्खननातून ही टेकडी तयार झाली आहे आणि इथे प्राचीन काळापासून मानवी वस्ती आहे.
 
मग साधारण अकराव्या शतकाच्या सुमारास इथे किल्ला आणि राजवाडा बांधला गेला.
 
स्कॉटलंडच्या इतिहासात खूप महत्त्वाची वास्तू असल्याने अर्थातच या किल्ल्यावर अनेकदा आक्रमणं झाली. असं म्हणतात की हा किल्ला युरोपातला सर्वाधिक वेळा हल्ला झालेला किल्ला आहे.
 
अनेकदा तो उद्ध्वस्त केला गेला आणि अनेकदा पुन्हा बांधला गेला.
 
म्हणूनच कदाचित या किल्ल्याखाली गुप्त भुयारांचं जाळं आहे. हे जाळं रॉयल माईलपासून हॉलीरॉड प्लेसपर्यंत पसरलेलं आहे.
 
काही शतकांपूर्वी या गुप्त भुयारांच्या जाळ्याचा शोध लागला.
 
पण तेव्हा अधिकाऱ्यांना कळत नव्हतं की ही भुयारं नक्की कुठून कुठे जातात. मग त्यांनी बॅगपाईप वाजवणाऱ्या एका तरुणाला पकडलं.
 
लहानसाच होता हा तरुण. त्याला या भुयारांमध्ये खाली उतरवलं. तो बॅगपाईप वाजवत पुढे निघाला, आणि वरती त्याच्या आवाजाचा कानोसा घेत मागेमागे जात अधिकारी भुयारांचा नकाशा तयार करत होते.
 
पण अचानक आवाज येणं बंद झालं. त्याला शोधण्यासाठी बचावपथक पाठवण्यात आलं, सगळी भुयारं शोधण्यात आली पण हा तरुण सापडला नाही आणि त्याचा मृत्यू झाला म्हणावं तर त्याचा मृतदेहही सापडला नाही. त्यानंतर पुढच्या काही शे वर्षांसाठी ही भुयारं बंद करून टाकली.
 
“ज्या दिवशी वारा नसतो, इथे टुरिस्टांची गर्दी नसते, आणि बाहेरच्या रस्त्यावरचा ट्रॅफिक आवाज करत नसतो, तेव्हा जमिनीतून अस्पष्ट असा बॅगपाईपचा आवाज आजही येतो. जणूकाही तो तरुण म्हणतोय माझी सुटका करा,” तो गाईड म्हणाला.
 
हवेतल्या गारठ्यामुळे असेल किंवा आणखी कशाने पण एक शिरशिरी जाणवून गेली.
 
भुतांच्या कथा कोणाला आवडत नाही? भले कितीही भीती वाटली तर भुतांच्या रंजक गोष्टी सगळ्यांनाच ऐकायच्या असतात. त्याला पर्यटक तरी कसे अपवाद असतील.
 
म्हणूनच आता एडिंबराच्या पर्यटन व्यवसायात भुतं फार महत्त्वाची ठरली आहेत.
 
एकातून एक अशा अनेक कथा तयार झाल्या आहेत.
 
याच एडिंबरा कॅसलमध्ये आणखी एक भूत आहे म्हणे. हे भूतही वाद्य वाजवणाऱ्याचंच आहे. हा ड्रमर आहे. कधी कधी पर्यटकांना दिसतो.
 
1650 मध्ये याच किल्ल्यात चार्ल्स पहिल्याचं शिर धडावेगळं केलं होतं. त्यानंतर इथे घोड्यावर बसलेली शिर धडावर नसलेली एक आकृती दिसते म्हणे. कधी कधी ही आकृती ड्रम वाजवत असते.
या किल्ल्यात एक तुरुंग आहे. तिथे युद्धकैद्यांना अत्यंत भयानक परिस्थितीत ठेवलं जात असे. काही लोक तिथेच मरून पडत तरी कित्येक दिवस त्यांचे मृतदेह कोणी बाजूला करत नसे.
 
कधी कधी महिनोंमहिने त्या कैद्यांना जेवण दिलं जात नसे, मग त्यांच्यावर या मरून पडलेल्या कैद्यांचं मांस खाण्याची वेळ येई.
 
आता त्याच कैद्यांची भुतं इथे फिरतात असं म्हणतात.
 
2003 साली इथे काही मजूर दुरुस्तीचं काम करत होते. कैद्यांची भुतं त्यांच्या मागे लागून त्यांना त्रास देत होती असा या मजुरांचा दावा आहे.
 
त्यांनी म्हणे या भुतांचे फोटोही काढले तर त्याल निळसर रंगाचे फुगे या मजुरांच्या डोक्यावर तरंगताना दिसत आहेत. हीच ती भुतं असं यांचं म्हणणं आहे.
 
आता तर अनेक जण या किल्ल्यात रात्रीच्या वेळी किंवा दिवसाही एकटं काम करायला नाही म्हणतात.
 
या भुतांची कीर्ती एवढी आहे की काही संशोधकांनीही अभ्यास करून इथे घडणाऱ्या विचित्र गोष्टींचा सुगावा लावण्याचा प्रयत्न केला आहे.
 
22 वर्षांपूर्वी इथल्या भुमिगत भुयारांमध्ये 10 दिवसांची शोध मोहीम चालवली होती. डॉ वाईसमन या मोहिमेचं नेतृत्व करत होते.
 
ते बीबीसीशी बोलताना म्हणाले होते, “भुतं आहेत की नाही यापेक्षा लोकांना भुतांचे अनुभव कसे आणि का येतात हे शोधून काढण्यात मला रस आहे. अनेकांचा दावा आहे त्यांच्या फोटोत कुठे ना कुठे भुतांचं अस्तित्व दिसतं. या फोटोंमध्ये गडबड कशी होते हे आम्ही शोधून काढणार आहोत.”
त्याच्या टीमकडे अत्याधुनिक रेकॉर्डिंगची साधनं होती. काही अमानवी हालचाली होत आहेत का हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
त्यांनी काही स्वयंसेवकांना या भुयारांमध्ये पाठवलं.
 
त्यापैकी ज्या भुयारात भुतं आहेत असं म्हटलं जातं तिथे गेलेल्या 51 टक्के लोकांना काहीतरी अमानवी जाणवलं तर जिथे भुतं नाही असा समज आहे तिथे गेलेल्या 35 टक्के लोकांना अमानवी हालचाली जाणवल्या.
 
वाईसमन म्हणतात की, “लोकांना प्रकाश आणि ध्वनीचे काही अनुभव येतात हे खरं. पण ते या भुयारांमध्ये येणारा प्रकाश, त्यांची रचना, तिथला अंधार, तसंच आकार, तापमान, हवेतल्या कणांची हालचाल आणि चुंबकीय क्षेत्र या सगळ्यांचा परिपाक असतात.”
 
ते पुढे म्हणतात, “बाहेरच्या प्रकाशातून लोक आतमध्ये एकदम अंधारात येतात. त्यांची ज्ञानेंद्रियं नीट काम करत नसतात आणि मग त्यांना काही भास होतात. अज्ञात ठिकाणी, अंधारात गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात आणि त्या भावनेतून असे अनुभव येत असावेत."
 
भूमिगत कोठड्या
जुन्या एडिंबरा शहराच्या पोटात गुप्त कोठड्या आहेत. त्यांना व्हॉल्ट असं म्हणतात. भुतांच्या आधारकार्डवर यांचा पत्ता आहे. काही भुतं तर इथली कायमची रहिवासी आहेत. त्यांच्याकडे नंतर जाऊच पण आधी या कोठड्या कोणी आणि का बांधल्या ते बघू.
 
या खरं लहान लहान खोल्या आहेत. एडिंबराच्या साऊथ ब्रीजच्या 19 कमानींच्या पायांनी जमिनीच्या पोटात या खोल्या तयार केल्या आहेत.
 
या कोठड्या पण भुताने पछाडलेल्या आहेत असं म्हणतात. पण या भुतांना बहुतेक टुरिस्ट आवडत असावेत कारण या कोठड्यांची खास टूर उपलब्ध आहे. इथे गाईड रात्रीच्या वेळेस तुम्हाला फिरवून आणतात. पण त्याचे चांगले 20-25 पाऊंडही मोजावे लागतात
 
 
त्याच्या टीमकडे अत्याधुनिक रेकॉर्डिंगची साधनं होती. काही अमानवी हालचाली होत आहेत का हे शोधण्याचा त्यांचा प्रयत्न होता.
 
त्यांनी काही स्वयंसेवकांना या भुयारांमध्ये पाठवलं.
 
त्यापैकी ज्या भुयारात भुतं आहेत असं म्हटलं जातं तिथे गेलेल्या 51 टक्के लोकांना काहीतरी अमानवी जाणवलं तर जिथे भुतं नाही असा समज आहे तिथे गेलेल्या 35 टक्के लोकांना अमानवी हालचाली जाणवल्या.
 
वाईसमन म्हणतात की, “लोकांना प्रकाश आणि ध्वनीचे काही अनुभव येतात हे खरं. पण ते या भुयारांमध्ये येणारा प्रकाश, त्यांची रचना, तिथला अंधार, तसंच आकार, तापमान, हवेतल्या कणांची हालचाल आणि चुंबकीय क्षेत्र या सगळ्यांचा परिपाक असतात.”
 
ते पुढे म्हणतात, “बाहेरच्या प्रकाशातून लोक आतमध्ये एकदम अंधारात येतात. त्यांची ज्ञानेंद्रियं नीट काम करत नसतात आणि मग त्यांना काही भास होतात. अज्ञात ठिकाणी, अंधारात गेल्यानंतर लोक अस्वस्थ होतात आणि त्या भावनेतून असे अनुभव येत असावेत."
 
भूमिगत कोठड्या
जुन्या एडिंबरा शहराच्या पोटात गुप्त कोठड्या आहेत. त्यांना व्हॉल्ट असं म्हणतात. भुतांच्या आधारकार्डवर यांचा पत्ता आहे. काही भुतं तर इथली कायमची रहिवासी आहेत. त्यांच्याकडे नंतर जाऊच पण आधी या कोठड्या कोणी आणि का बांधल्या ते बघू.
 
या खरं लहान लहान खोल्या आहेत. एडिंबराच्या साऊथ ब्रीजच्या 19 कमानींच्या पायांनी जमिनीच्या पोटात या खोल्या तयार केल्या आहेत.
 
या कोठड्या पण भुताने पछाडलेल्या आहेत असं म्हणतात. पण या भुतांना बहुतेक टुरिस्ट आवडत असावेत कारण या कोठड्यांची खास टूर उपलब्ध आहे. इथे गाईड रात्रीच्या वेळेस तुम्हाला फिरवून आणतात. पण त्याचे चांगले 20-25 पाऊंडही मोजावे लागतात
 
“मी रात्री काम करत होतो आणि मला अचानक लहान मुलांच्या हसण्याचा आवाज आला. तेव्हा रात्रीचे साडेतीन वाजत होते. एवढ्या रात्री कोणती मुलं इथे असणार असा विचार कर मी कोठडीच्या प्रवेशव्दारापाशी गेलो, मला कोणीही दिसलं नाही. बाहेर रस्त्यावरही कोणी नव्हतं. तेव्हा मात्र मी घाबरलो. माझी शिफ्ट न संपवताच बाहेर आलो, टॅक्सी पकडली आणि सरळ घरी गेलो.”
 
कुठून आली ही भुतं?
या भूमिगत खोल्यांमध्ये ही भुतं कुठून आली हे जाणून घेण्याआधी इथला इतिहास समजला पाहिजे. वरती म्हटलं तसं एडिंबराच्या साऊथ ब्रीजच्या 19 कमानींमुळे या कोठड्या तयार झाल्या आहेत. इथे साधारण 120 कोठडी स्वरूप लहान लहान खोल्या आहेत.
 
एडिंबरा शहर 7 मोठ्या टेकड्यांवर वसलं आहे. एका भागातून दुसऱ्या भागात जाण्यासाठी या टेकड्या चढउतार कराव्या लागायच्या. त्यामुळे शहराचे वेगवेगळे भाग जोडण्यासाठी पूल बांधावेत आणि ते मजबूत असावेत म्हणून त्याच्या कमानी जमिनीत रोवाव्यात असा विचार आला आणि काम सुरू झालं.
 
साऊथ ब्रीजच 1788 च्या सुमारास बांधून पूर्ण झाला. पण तेव्हापासूनच या पुलाबद्दल वेगवेगळ्या दंतकथा पसरायला लागल्या.
 
इथल्या एका न्यायाधीशाच्या पत्नीने हा पूल पहिल्यांदा ओलांडला आणि त्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. तोवर हा पूल पूर्ण झाला नव्हता. ज्या दिवशी या पुलाचं उद्घाटन झालं त्या दिवशी तिची अंत्ययात्राच या पुलावरून गेली.
 
मग काय लोक धास्तावले आणि त्यांनी हा पुल वापरण सोडून दिलं.
 
पण ही जागा मोक्याची होती. मग या पुलाखाली अनेक दुकानदारांनी आपली दुकानं थाटली. इथे तसा अंधार असायचा, आणि पाणीही सतत गळत असायचं. त्यामुळे 30 वर्षांतच ही जागा घाणेरडी झाली आणि इथली दुकानं दुसरीकडे गेली.
 
1800 नंतर इथे उलटसुलट धंदे करणारे लोक येऊन वसले. अंधाराचा त्यांना फायदाच झाला. इथे सट्टेबाजी, वेश्याव्यवसाय चालायला लागला. 1850 च्या सुमारास आर्यलंडमध्ये भयानक दुष्काळ पडला. तिथून अन्नाच्या शोधात अनेक निर्वासित एडिंबराला आले. त्यांना राहायला जागा नव्हती मग त्यांनी या खोल्यांमध्ये बस्तान मांडलं. इथे झोपडपट्टी तयार झाली.
 
जागा अंधारी, खेळती हवा नाही, सतत गळणारं पाणी यामुळे इथे रोगराई पसरली.
 
इथे म्हणे मृतदेहही लपवून ठेवले जायचे. काही लोक पुरलेले मृतदेह उकरून एडिंबरा विद्यापीठाला वैद्यकीय अभ्यासासाठी विकायचे.
 
बर्क आणि हेअर या दोन सीरियल किलर्सनी इथे आपला अड्डा मांडला होता. हे लोक खून करायचे आणि मृतदेह एडिंबरा विद्यापीठाला विकायचे. त्यावेळी वैद्यकीय अभ्यासासाठी मृतदेह मिळत नव्हते त्यामुळे काहीही प्रश्न न विचारता असे मृतदेह विकत घेतले जायचे.
 
या दोघांनी मिळून 16 खून केले असं म्हणतात.
 
या दोघांची मृतदेह लपवण्याची जागाही या टूरमध्ये दाखवतात.
 
इथे मृत्युमुखी पडलेल्या किंवा मारल्या गेलेल्या लोकांची भुतं या व्हॉल्ट्समध्ये फिरतात असं म्हणतात.
 
यातली काही भुतं कायमची रहिवासीही आहेत. म्हटलं ना, यांचे आधार कार्ड निघाले असतील.
 
यात एक आहे मिस्टर बूट. याच्या जड जड बुटांचा आवाज येतो म्हणे. हे आपल्या फोटोत दिसलं आहे असाही अनेकांचा दावा आहे.
 
दुसरं आहे अरिस्टोक्रॅट. हे एका श्रीमंत उमरावाचं भूत आहे. हे भिंतीला टेकून उभं असतं आणि येणाऱ्या जाणाऱ्याकडे बघून स्मितहास्य करतं. हे तसं निरुपद्रवी भूत आहे.
 
अजून एक आहे चप्पल शिवणाऱ्याचं भूत. हे जाडंजुडं भूत आहे आणि त्याने एक मोठा एप्रन बांधलेला आहे.
 
इथे जॅकही आहे. कुरळ्या सोनेरी केसांच्या एका सहा-सात वर्षांच्या मुलाचं भूत. त्याने निळ्या रंगाची पँट घातली आहे. हे भुत लहान मुलं आणि महिलांच्या मागे मागे फिरतं. कधी कधी कोणाचा बोट धरून चालतं असेही दावे केले गेलेत.
 
मला यातलं एकही भूत दिसलं नाही आणि 'श्या ! आपले पैसे वाया गेले' ही भारतीय भावना मनात डोकावलीच.
 
हॉरर टुरिझम
एडिंबराला दरवर्षी 35 लाख पर्यटक भेट देतात. ही संख्या दरवर्षी वाढतच चाललीये. यूकेत लंडननंतर सर्वाधिक पर्यटक या शहरात येतात.
 
इथे असलेल्या भुतांच्या दंतकथा आणि भय अधिक अधिक लोकांना आकर्षित करतात.
 
दुःख आणि वेदना यांचं मार्केटिंग होतं आणि त्याने हॉरर टुरिझमला चालना मिळते असं तज्ज्ञांना वाटतं.
 
ग्लासगो बिझनेस स्कुलचे व्हाईस डीन प्रो लेनन बीबीसीशी बोलताना म्हणतात की, “जिथे वेदना आणि भय विकलं जातं तिथे पर्यटन वाढतं. मानवी मनातल्या काळ्या प्रवृत्तीला हे भावतं. प्रत्येक माणसाने मृत्यू पाहिलेला असतो, अनुभवलेला असतो आणि त्यामुळे मृत्यू त्यानंतरच जग याबद्दल त्याला आकर्षण असतंच.”
 
एडिंबराच्या कॅसलमध्ये जायचं तर तिकिट घेऊन जावं लागतं, व्हॉल्ट्सची टूर करायची तर पैसे खर्च करावे लागतात. त्या जोडीला खाणंपिणं होतंच. त्यामुळे भुतांच्या कथा ऐकता ऐकता आपलं पाकिट कधी हलकं होतं आपल्यालाच कळत नाही.
 
Published By- Priya Dixit