मंगळवार, 23 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : सोमवार, 27 फेब्रुवारी 2023 (09:47 IST)

Mahakal Lok : आनंदाची अनुभूती देणारे भव्य दिव्य महाकाल लोक बघण्यासारखे

ज्योतिर्लिंग महाकालेश्वर मंदिराचा नव्याने विस्तारित परिसर श्री महाकाल लोक पाहण्यासाठी लोकांची गर्दी होत आहे. भक्तांच्या मते श्री महाकाल लोक अद्भुत आहे. इथे आल्यावर आनंद आणि उत्साह जाणवतो.
 
महाकाल मंदिरात प्रवेश करण्यासाठी त्रिवेणी संग्रहालयाच्यामागे रुद्रसागराच्या काठावर लाल दगडाने 26 फूट उंच नंदीद्वार तयार केलेले आहे. 920 मीटर लांबीचा महाकाल पथ बांधण्यात आला आहे. ज्याच्या एका बाजूला 25 फूट उंच आणि दुसर्‍या बाजूला 500 ​​मीटर लांबीची लाल दगडाची भिंत बांधण्यात आली आहे. शिव महापुराणात उल्लेखित प्रसंगांची दगडी चित्रे भिंतीवर कोरलेली आहे. त्यासमोरच 108 शिवस्तंभ आहेत. या खांबांवर भगवान शिव आणि त्यांच्या गणांच्या विविध मुद्रा चित्रित आहे.
 
येथे कमळ तलाव तयार करण्यात आला असून मध्यभागी महादेवाची भव्य मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. दुसरीकडे सप्त ऋषींच्या मुरत्या तर नवग्रहांच्या मुरत्या तसेच 25 फूट उंच शिवस्तंभ आणि त्रिपुरासुराच्या वधाचे चित्रण करणारी 70 फूट लांब मूर्ती आहे. भगवान गणेश, कार्तिकेय आणि माता पार्वतीच्या मूर्ती या बाजूला असून वीरभद्र द्वारे दक्ष शिरच्छेद अशी मूर्ती देखील स्थापित आहे.

या बाजूला प्रसाद आणि तिकीट काउंटर आहे. याच ठिकाणी त्रिवेणी मंडप आहे. रुद्रसागराच्या काठावर 111 फूट लांब भिंतीवर शिवविवाह कृती साकारण्यात आली आहे.

आता सुमारे दोन लाख लोकांना श्री महाकाल लोकांमध्ये एकत्र दर्शन घेता येणार आहे. श्री महाकाल लोकात भगवान शिव यांच्यावर आधारित 190 मुरत्या आहेत. यामध्ये 18 फुटांपैकी 8, 15 फुटांपैकी 23, 11 फुटांपैकी 17, 10 फुटांपैकी 8, 9 फुटांपैकी 19 मुरत्यांचा समावेश आहे.
 
एका बाजूला भगवान शिव आणि इतर देवतांच्या 75 भव्य मूर्ती स्थापित आहेत. नंदी द्वारपासून सुमारे 400 मीटर अंतरावर मध्यांचल भवन आहे जिथे दुकाने बांधली गेली आहेत. येथून महाकाल मंदिरात जाण्यासाठी मार्ग आहे. पहिल्या मजल्यावर एक उपहारगृह आहे. पुढे नाईट गार्डन आहे जिथे वासुकी नागाच्या कुंडलीत बसलेली योगी शिव यांची मूर्ती आहे. यापुढे श्री गणेश, श्री शिव, श्री कृष्ण यांच्या मुरत्या आहेत.
 
रुद्रसागरात नर्मदा, शिप्रा, गंभीर नद्यांचे स्वच्छ पवित्र पाणी भरले आहे. याभोवती काळ्या दगडाची भिंत म्हणजेच गॅबियन वॉल बांधण्यात आली आहे.

महाकाल लोक संकुलात चारशे कॅमेरे बसवण्यात आले असून जवळपास तेवढ्याच आरामदायी खुर्च्या आणि अग्निशामक साधने तसेच भगवान शंकराला अर्पण केली जात असलेली फळे, फुले व पानांची 52 हजार रोपे लावण्यात आली आहेत.
 
महाकाल लोकांच्या उद्घाटनानंतर शहरातील पर्यटकांची वार्षिक संख्या दुपटीने वाढण्याची शक्यता आहे. म्हणजे वर्षाला भाविकांची संख्या दीड कोटींवरून तीन कोटींपर्यंत वाढू शकते. कारण सुंदर आणि भव्य श्री महाकाल लोक पाहण्यासाठी जगभरातून लोक नक्कीच जमतील.