श्री तीर्थ क्षेत्र पिठापूर Shri Tirtha Kshetra Pithapur
भारतामध्ये अनेक शक्तीपीठं आहे. त्यापैकी पीठापूर आंध्र प्रदेशातील पूर्व गोदावरी जिल्ह्यातील सामलकोटहून 12 कि.मी. दूर वसलेले एक अती लहानसे गाव आहे. हे गाव भारतात 51 शक्तिपीठांपैकी मानले जाते. हे जगातील महान पीठ आहे. या स्थानामध्ये एक तलाव असून तेथे रोज हजारो भाविक स्नान करतात. तसेच मृत पावलेल्या व्यक्तीचे पूर्ण श्रद्धापूर्वक पिंडदान केल्यास त्या आत्म्यास मुक्ती मिळते. हे क्षेत्र श्री दत्तात्रेयांचा मनुष्यरूपी पहिला अवतार असलेले श्रीपाद श्रीवल्लभ यांचे जन्मगाव आहे. या क्षेत्रास पादगयासुद्धा म्हणतात. आंध्र प्रदेशमध्ये पूर्व गोदावरी जिल्ह्यात काकिनाड्याजवळ हे क्षेत्र आहे. आपस्तंब शाखेतील आपलराज, आणि सुमती माता या ब्राह्मण दांपत्याच्या उदरी श्रीपादांचा जन्म झाला.
श्रीपाद श्रीवल्लभांचे निवासस्थान अत्यंत पवित्र आणि शांत आहे. येथील दत्त मंदिरात श्री दत्तगुरु आणि श्रीनृसिंहसरस्वती यांच्या मूर्ती आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांच्या मनमोहक आणि आकर्षक अशा काळ्या रंगाच्या पादुका आहेत. बाजूलाच औदुंबराचे झाड आहे. त्याच्या बाजूला श्री दत्तात्रेयांची काळ्या रंगाची मूर्ती आहे. श्रीपादांनी असे सांगितले आहे की, "जेथे माझा जन्म झाला त्याच जागी माझे पादुका मंदिर होणार." त्यांनी सांगितल्याप्रमाणे श्रीपादांच्या जन्मस्थळी त्यांच्या पादुकांची स्थापना झाली.
या मंदिरात श्रीपाद श्रीवल्लभांची, श्री दत्तात्रेयांची आणि श्री नृसिंहसरस्वती यांच्या अप्रतिम व तेजस्वी अशा सुंदर मूर्ती आहेत. इथले वातावरण आनंददायक आणि शांतीदायक आहे. या मंदिराचे पट सकाळी 5 वाजता उघडले जातात. त्यानंतर सकाळी 7 वाजलेपासून पूजाविधीला सुरुवात केली जाते. दुपारी एक ते चार मंदिर बंद असते. संध्याकाळी सात वाजल्यानंतर श्रीपादांच्या पालखीच्या तीन प्रदक्षिणा या मंदिराभोवती घातल्या जातात. पालखी फुलांनी सजवलेली असून पालखीत श्रीपाद श्रीवल्लभांची सुंदर चांदीची मूर्ती विराजमान आहे. या पालखी सोहळ्याचा आनंद घेण्यासाठी भक्त जमा होतात. आरती केल्यानंतर प्रसाद वाटप करून रात्री 9 वाजता मंदिराचे पट बंद होतात.
पीठापूर हे पूर्व काळापासूनच सिद्ध क्षेत्र आहे. मंदिराचे आवारात मागील भागात चार हात, तीन शिरे असलेले आश्चर्यकारक स्वयंभू श्रीदत्त मंदिर आहे. तेथे एक महाशक्ती-पीठ आहे. हा परिसर पुरुहत्तिका म्हणून प्रसिद्ध आहे. गयासुराच्या शरीरावर देवतांनी यज्ञ केला. तेव्हा त्याचे मस्तक गयेला होते तर पाय पिठापूरला होते. म्हणून या क्षेत्रास पादगया असे म्हणतात. दक्ष यज्ञात सती देवीने योगाग्नीने आत्मदहन केले. भगवान शंकर तो देह घेऊन तांडव करू लागले. भगवान विष्णूने सुदर्शन चक्रानं त्या देहाचे खंड खंड केले. ते भाग अन्य ठिकाणी पडले आणि ते शक्तीपीठ झाले. प्रमुख अष्टादश शक्तीपिठातील पुरुहत्तिका हे शक्तीपीठ येथेच आहे. याच परिसरात कालाग्नीशमन दत्त मंदिर आहे. काळ्या पाषाणातील दत्तमूर्ती अत्यंत तेजस्वी आणि जागृत आहे.
श्रीपाद श्रीवल्लभांनी बालपणीचा काळ येथेच व्यतीत केला. कुक्कुटेश्वर कालाग्नीशमन दत्त, पादगया ही ठिकाणे येथील जागृत ठिकाणे आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांचे सर्व चमत्कार आणि लीला याच ठिकाणी घडल्या. श्रीपाद श्रीवल्लभ येथेच औदुंबर वृक्षाखाली विश्रांती घेतात. येथे आलेल्या भक्तांची सर्व पीडा बाधा दूर होते. हे या पवित्र स्थानाची वैशिष्ट्य आहे. पीठापूर येथील श्रीपाद श्रीवल्लभ जन्म-स्थानात आरती, अभिषेक, रात्री पालखी सोहळा होतो. येथे श्रीपाद श्रीवल्लभ स्वामी जयंती, श्री दत्त जयंती, श्री गुरु द्वादशी, श्री कृष्णाष्टमी, श्री पू. वासुदेवानंद सरस्वती जयंती, गुरुपौर्णिमा उत्सव साजरे केले जातात
कसे जावे-
रेलवे मार्गे : मुंबई-भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेसने सामलकोट जंक्शन येथे उतरावे. पीठापूर हे रेलवे स्थानक आहे. जवळचे रेल्वे स्टेशन काकीनाडा आणि तेथून थोडे दूर असलेले विशाखापट्टणम रेल्वे स्टेशन आहे. सामलकोट येथे उतरल्यानंतर ऑटोरिक्षा करावी आणि श्रीपाद श्रीवल्लभ महासंस्थानास जावे. सामलकोट ते पीठापूर फक्त 12 कि.मी. अंतर आहे. वाहन व्यवस्था भरपूर आहेत.
मुंबईहून सुटलेली कोणार्क एक्सप्रेस सायंकाळी 6 वाजता सामलकोट येथे पोहोचते.
भुवनेश्वर येथून सुटलेली कोणार्क एक्सप्रेस सामलकोट येथे रात्री 1 वाजता येते.
राहण्याची सोय : भाविकांसाठी प्रसादाची आणि येथे राहाण्याची उत्तम सोय आहे.