शुक्रवार, 22 नोव्हेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By

नेपाळमधील भटगाव येथील श्री दत्त मंदिर

जगातील एकमेव हिंदूराष्ट्र म्हणून नेपाळ प्रसिद्ध आहे. काठमांडू या राजधानीपासून पूर्वेस नऊ मैलावर आनंदमय या राजाने वसविलेले हे गाव भटगाव. काठमांडूभोवती अनेक हिंदू आणि बौद्ध देवतांचे दर्शन होते. मत्स्येंद्राचे मंदिर, भैरवाचे मंदिर, कृष्ण मंदिर, स्वयंभूनाथ मंदिर येथे आहे. भटगाव म्हणजे भक्तपूर. येथील दत्त मंदिर एका झाडाच्या मुळाशी आहे. येथील दत्तमूर्ती एकमुखी आणि द्विभुज आहे. हे खूप जागृत स्थान आहे. हे दत्त मंदिर 15व्या शतकातील आहे. हे मंदिर एकाच झाडाच्या लाकडाने बांधण्यात आले आहे. 
 
सन 1427मध्ये राजा यक्षमल्ल यांनी या मंदिराचे निर्माण केले. नंतर राजा विश्वमल्ल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला. मध्ययुगीन स्थापत्याचे आणि कलाकुसरीचे दर्शन या मंदिरात होते. या मंदिराजवळच पुजाऱ्यांचा मठ आहे आणि गणपतीचे मंदिर आहे. इथे दलादन ऋषींनी तपश्चर्या केली आहे. अशी आख्यायिका आहे की गोरक्षनाथ येथे आल्यावर इथल्या लोकांनी त्यांचा अनादर केला. त्यावरून ते कोपले आणि त्यांनी अखंड जलवृष्टी केली. सर्वत्र पाणीच पाणी झाले. लोकांनी घाबरून दलदलांना विनवणी केली. ऋषी दलदलांनी श्री गुरुदेव दत्तांना या संकटातून काढण्याची विनंती केली. श्रीदत्तकृपेने जलवृष्टी कमी होऊन पीक चांगले आले. हेच दत्तलहरी नावाने प्रख्यात आहे. दत्तगुरूंचे आशीर्वाद मिळावेत यासाठी भटगाव येथे भगवान श्रीदत्तात्रेयांचे स्थान निर्माण झाले. हे नेपाळमधील अत्यंत जागृत स्थान आहे.