शनिवार, 28 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : गुरूवार, 31 ऑगस्ट 2023 (09:51 IST)

श्री क्षेत्र कर्दळीवन जागृत तपस्थान

Shri Kshetra Kardalivan
‘कर्दळीवन’ या स्थानाला दत्त संप्रदायात विशेष महत्त्वाचे स्थान आहे. कर्दळीवन हे श्रीदत्तगुरूंचे गुप्त स्थान आणि श्रीस्वामी समर्थांचे प्रकटस्थान म्हणून विशेष महत्त्व आहे. 
 
कर्दळीवन परिसरात प्रवेश केल्याबरोबरच तेथील दिव्यत्वाची अनुभूती तत्काळ येते. तेथे प्रवेश केल्याबरोबर आपले अष्टसात्त्विक-भाव जागृत होतात. शरीरातील सुप्त आध्यात्मिक शक्ती जागृत होतात. महाराष्ट्रभर 'कर्दळीवन' म्हणून हे ओळखले जाते तर आंध्र-कर्नाटकात 'कदलीवन' किंवा 'काडलीवन' असे म्हटले जाते. कर्दळीवन या नावाचा आणि कर्दळीच्या झाडाचा काहीही संबंध नाही.
 
कर्दळीवन परिक्रमा करण्यासाठी दोन मार्ग आहेत. पहिला मार्ग म्हणजे श्रीशैल्यम येथे जाऊन तेथून होडीने किंवा यांत्रिक बोटीने २४ कि.मी.चा प्रवास करून व्यंकटेश किनारी जाणे आणि तेथून कर्दळीवनात प्रवेश करणे. दुसरा मार्ग म्हणजे हैद्राबाद येथून श्रीशैल्यम येथे येत असताना श्रीशैल्यमच्या अलीकडे साधारण १० ते १२ कि.मी.वर अक्कमहादेवी गुहेकडून जाता येते. कर्दळीवनात जाणाऱ्या सर्व यात्रेकरूंना येथे सर्व प्रकारचे साहाय्य मिळते. गरज असल्यास सामान वाहून नेण्यासाठी 500 रुपयात सेवेकरी मिळतात.
 
श्रीअक्कमहादेवी गुहेपासून पश्चिमेकडे कर्दळीवनातील श्रीदत्तप्रभू आणि श्रीस्वामी समर्थांच्या मूळ स्थानाकडे जायचा रस्ता आहे. हा कर्दळीवनातील दुसरा टप्पा ६ कि.मी. अंतराचा आहे. हा रस्ता बहुधा सरळसोट आहे. मधे थोडाफार चढ-उतार येतो. मात्र, या रस्त्यावर अतिशय घनदाट आणि निबिड अरण्य आहे. श्रीदत्तगुरूंच्या मनात असेल तरच भाविकाला ही दुर्लभ परिक्रमा घडते. या रस्त्याची सुरुवात होतानाच अक्कमहादेवीच्या गुहेजवळ पूर्वेकडे एक विस्तीर्ण पठार आहे. तेथे एक अत्यंत जुने वडाचे झाड आहे. कर्दळीवनाची भूमी ही खरोखरच ध्यान, धारणा, तपश्चर्या, साधना करण्यासाठीच आहे. या ठिकाणी आकर्षण-शक्ती फार जास्त प्रमाणात आहे. कर्दळीवन ही देवभूमी आहे. तिथे जाण्यासाठी तीव्र साधना आणि उच्च योग आपल्या भाग्यात असणे आवश्यक आहे. कलियुगात प्रत्येकाने एकदा तरी कर्दळीवन यात्रा केली पाहिजे.
 
कर्दळीवन परिक्रमेसंबंधी काही नियमावली आहेत. चला, तर मग जाणून घेऊ या...
 
* कर्दळीवनामध्ये जाणकार व्यक्तीबरोबरच जावे.
* कर्दळीवनात गटानेच प्रवेश करावा.
* इथे जाताना गरजेपुरतेच सामान बरोबर घ्यावे. स्वतःचे अंथरूण-पांघरूण, पाण्याच्या बाटल्या बरोबर घेणे आवश्यक आहे. 
* खाद्यपदार्थ बरोबर घ्यावेत. 
* डोंगर चढताना हातात काठी असावी. डोक्यावर टोपी वा पंचा असावा.
* स्वत:ला लागणारी औषधे, जवळ बाळगा.
* शक्यतो इथे गटामध्येच राहावे.
* वाटेत दिसलेल्या प्राण्यांना मारू नये. 
* रात्री प्रवास करताना बॅटरी जवळ बाळगा.  
* प्लास्टिकच्या वस्तूवर बंदी असल्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू वापरू नयेत. 
* कर्दळीवनात परिक्रमा करताना मद्यपानाचे सेवन करू नये. 
* कर्दळीवनात अंगाचा साबण वापरण्यास बंदी असल्यामुळे अंगाचे साबण वापरू नये.