बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Updated : शनिवार, 14 डिसेंबर 2024 (09:21 IST)

श्री क्षेत्र कुरवपूर Shri Kshetra KURAVPUR

Shri Kshetra KURAVPUR
श्री क्षेत्र कुरवपूर हे कर्नाटकातील आणि आंध्र राज्यांच्या सीमा भागात ज्या ठिकाणी कृष्णा-भीमा नद्यांचा संगम झाला त्या रायचूर जिल्ह्यात कृष्णा नदीच्या बेटावर असलेले पाण्याने वेढलेले तीर्थक्षेत्र आहे. या ठिकाणी श्रीपाद वल्लभांनी 14 वर्षे वास्तव्य केले. याच तीर्थक्षेत्री  श्री दत्त अवतारी योगीराज श्री वासुदेवानंद सरस्वती (टेंबे स्वामी) यांना 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा' या मंत्राचा साक्षात्कार झाला. इथे टेंबे स्वामींची गुहा आहे. याच गुहेत श्रीधर स्वामींनी वास्तव्य केले होते.
 
मुंबई-बंगळुरू (व्हाया गुलबर्गा) या रेल्वेमार्गावर रायचूर हे रेल्वे स्टेशन लागते. तिथे उतरून रायचूर बसस्थानका वरून बस मार्गाने 30 कि. मी. अंतरावर अतकूर हे गाव कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले आहे. श्री क्षेत्र कुरवपूर हे एक प्राचीन दत्तक्षेत्र आहे. श्रीपाद श्रीवल्लभ यांना दत्तात्रेयांचा प्रथम अवतार मानले जाते. वयाच्या 16 वर्षानंतर ते पिठापुरातून निघून संपूर्ण भारताचे भ्रमण करत कुरवपूर येथे आले. कुरवपूर हीच त्यांची कर्मभूमी बनली.

कुरुगड्डीच्या जवळ एका अग्रहार नावाच्या खेड्यात श्रीपाद स्वामी राहात होते. स्वामींच्या आशीर्वादाने कुरवपूर येथील एका विद्वान ब्राह्मणाच्या मूर्ख मुलाला ज्ञान प्राप्ती झाली. ‘कुरवपूर’ हे त्यांचे अक्षय निवासस्थान आहे. या ठिकाणी श्रीपाद श्रीवल्लभ यांच्या पादुका आहेत. इथे श्रीपाद श्रीवल्लभ यांनी तपश्चर्या केली. श्रींचे मंदिर ऐसपैस असून  मंदिराच्या दाराच्या बाजूस दोन दगडी कट्टे आहे. महाद्वारावर कमानी आहेत. दाराच्या आत वाकून गेल्यावर दोन देवड्या आहेत. इथे पिंपळ, कडुनिंबाचे वृक्ष आहेत. पाराच्या उत्तरेकडे कोपऱ्यावर दगडी वृंदावने आहेत. या पारावर दक्षिणाभिमुखी दोन मंदिरं आहेत. एका मंदिरात दक्षिणाभिमुख काळ्या शाळिग्राम शिळेची मारुतीची रेखीव मूर्ती आहे आणि दुसऱ्या मंदिरात केशवमूर्ती आणि शिवलिंग पादुका आहेत. कुरवपूर या ठिकाणी नित्य पूजा-अर्चा, अभिषेक आणि अनुष्ठाने इ. विधी केले जातात. पालखी सेवा हे इथले एक वैशिष्ट्य आहे. हे मंदिर अतिशय प्राचीन, पवित्र आणि जागृत स्थान असल्याने, गाभाऱ्यात पुजारीमंडळींशिवाय कोणीच जात नाहीत. ज्यांना दर्शन घ्यायचे आहे त्या पुरुषांनी सोवळे वा लुंगी नेसावीच लागते. मंदिरात काही लोकांनी दान दिलेल्या लुंगी पायरीवर ठेवलेल्या असतात. त्या तात्पुरत्या वापरता येतात.
 
मंदिरात देवाला फक्त रेशमी वस्त्रे वापरली जातात, कॉटनची वस्त्रे उत्सवमूर्तीसाठी वापरतात. या ठिकाणी पारायण, दत्तयाग, होमहवन, शांती, पूजादेखील नियोजन करून केल्या जातात. इथे भाविकांसाठी राहाण्याची आणि भोजनाची उत्तम सोय आहे.