बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. देश-विदेश
Written By
Last Modified: शनिवार, 14 जुलै 2018 (14:09 IST)

जगातील सर्वात लहान द्वीप

ह्या जगामध्ये निसर्ग सौंदर्याने नटलेली अनेक लहान मोठी द्वीपे आहेत. ह्यातील बहुतेक द्वीपांच्याबद्दल माहिती उपलब्ध असली, तरी अशीही अनेक द्वीपे ह्या जगामध्ये आहेत, ज्यांच्याबद्दल कोणाला फारशी माहिती नाही, जी अज्ञात आहेत. पण जगातील सर्वात लहान द्वीप म्हणून प्रसिद्ध असणारे द्वीप आहे न्यूयॉर्क जवळील अलेक्झांड्रा बे च्या लगत. हे जगातील सर्वात लहान द्वीप म्हणून ओळखले जात असून, ह्याचे नाव 'जस्ट इनफ रूम' , (म्हणजे जेमतेम पुरेल इतकी जागा) असे आहे. ह्या द्वीपाचा आकार एखाद्या टेनिस कोर्ट इतका आहे. विशेष गोष्ट अशी की ह्या द्वीपावर एकच घर आणि एकच झाड आहे.
 
'जस्ट इनफरूम' हे द्वीप इतके लहान आहे की त्यावर असलेल्या घराच्या एका टोकापासून ते दुसर्‍या टोकापर्यंत इतकीच ह्या द्वीपाची लांबी आहे. 3,300स्क्वेअर फूट इतके ह्या द्वीपाचे क्षेत्रफळ आहे. मानवी वस्ती असलेले जगातील सर्वात लहान द्वीप म्हणून ह्या द्वीपाचे नाव गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस्‌मध्ये नोंदलेले आहे. पूर्वीच्या काळी हे द्वीप 'हब आयलंड' ह्या नावाने ओळखले जात असे. पण त्यानंतर एका परिवाराने हे द्वीप खरेदी केले. ह्या परिवाराने येथे घर बांधले आणि एक झाडही लावले व ह्या द्वीपाचे नाकरण 'जस्ट इनफ रूम' असे करण्यात आले. सुरुवातील केवळ सुट्टीच्या दिवसांमध्ये आरामा करण्याकरिता ह्या परिवाराचे सदस्य ह्या द्वीपावरील आपल्या 'व्हेकेशन होम' मध्ये येत असत. पण हळू हळू जसजशी ह्या घराची, ह्या द्वीपाची ख्याती सर्वत्र होऊ लागली, तसतशी येथे पर्यटकांची गर्दी वाढू लागली. आता ह्या द्वीपावरील सुंदर घरामध्ये राहण्यासाठी, हे द्वीप बघण्यासाठी अनेक पर्यटक येथे नेमाने येत असतात.