1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (21:33 IST)

1000 कोटींच्या ऑनलाइन पॉन्झी घोटाळ्यात अभिनेता गोविंदाची होणार चौकशी

भारतातील 1,000 कोटी रुपयांच्या ऑनलाइन पोंझी घोटाळ्याच्या चौकशीच्या संदर्भात अभिनेता गोविंदाची चौकशी होणार असून ही ओडिशा आर्थिक गुन्हे शाखेकडून होणार आहे. अनेक देशांमध्ये ऑनलाइन गेमची सेवा देणाऱ्या सोलर टेक्नो अलायन्स (STA-Token) बेकायदेशीरपणे क्रिप्टो गुंतवणुकीच्या नावाखाली लोकांकडून पैसे उकऴले जात होते. या कंपनीच्या जाहीराती आणि प्रमोशनल व्हिडीओसह कंपनीच्या कार्यक्रमाला अभिनेता गोविंदाने उपस्थिती लावल्याने त्याची चौकशी होणार आहे.
 
ओडिशाच्या ईओडब्ल्यूचे या चौकशी एजन्सीचे महानिरीक्षक जे. एन. पंकज यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले कि, “जुलैमध्ये गोव्यात STAच्या भव्य कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अभिनेता गोविंदाही सहभागी झाला होता. तसेच गोविंदाने या कंपनीच्या जाहीरातींमध्ये तसेच काही प्रमोशनल व्हिडिओंमध्ये ही भाग घेतला होता. त्यामुळे या कंपनीची जाहिरात करणाऱ्या फिल्मस्टार गोविंदाची चौकशी करण्यासाठी आम्ही लवकरच एक टीम मुंबईला पाठवू.”असे त्यांनी म्हटले आहे.
 
गोविंदावर अजून कोणताही आरोप सिद्ध झाला नसला तरी त्याची नेमकी भूमिका या तपासानंतरच स्पष्ट होईल. “जर त्यांची भूमिका कंपनीच्या व्यावसायिक करारानुसार केवळ उत्पादनाच्या (STAToken ब्रँड) समर्थनापुरती मर्यादित असेल तर गोविंदाला या खटल्यात साक्षीदार बनवण्यात येईल.” पंकज पुढे म्हणाले.
 
या कंपनीकडून भद्रक, केओंझार, बालासोर, मयूरभंज आणि भुवनेश्वरमधील 10,000 लोकांकडून 30 कोटी रुपयांची माया गोळा केली आहे. पोलिसांच्या अहवालानुसार, या घोटाळ्याअंतर्गत कंपनीने बिहार, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, झारखंड आणि इतर राज्यांतील गुंतवणूकदारांकडून कोट्यावधी पैसे गोळा केले आहेत. EOW ने कंपनीचे देशातील प्रमुखाना अटक केली आहे. तसेच कंपनीचे प्रमुख डेव्हिड गेझ या हंगेरियन नागरिकाविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी करण्यात आले होते.