25 हजार जमा करा; हायकोर्टाचे दीपक तिजोरीला आदेश
Deposit 25 thousand High Court order अभिनेता दीपक तिजोरी व निर्माता मोहन नादर यांनी प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी दिले. या सुनावणीसाठी दीपक तिजोरी न्यायालयात हजर होते.
दीपक तिजोरी यांनी मोहन नादर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंदवला होता. हा गुन्हा रद्द करण्यासाठी नादर यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्या. नितीन साम्बरे व न्या. गौरी गोडसे यांच्या खडंपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. हा गुन्हा रद्द करण्यासाठी माझी काही हरकत नाही, असे तिजोरी यांच्यावतीने न्यायालयात सांगण्यात आले. तुम्ही पोलीस खात्याचा वापर करुन घेतला आहे. त्यामुळे तुम्ही दोघांनीही प्रत्येकी 25 हजार रुपये पोलीस कल्याण निधीत जमा करावेत, असे आदेश देत न्यायालयाने हा गुन्हा रद्द केला.
दीपक तिजोरी यांनी 15 मार्च 2023 रोजी आयपीसी कलम 406 आणि 420 अंतर्गत नादर यांच्याविरोधात आंबोली पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला. दीपक तिजोरी यांना पैस मिळण्यासाठी उशीर झाला. म्हणून त्यांनी हा गुन्हा नोंदवला, असा दावा करत नादर यांनी हा गुन्हा रद्द करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल केली.