मंगळवार, 28 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 20 ऑगस्ट 2023 (15:19 IST)

Gadar 2 : सनी देओलचा चित्रपट ठरला ब्लॉकबस्टर, या सिनेमाला एवढं यश का मिळतंय?

Gadar 2 : अभिनेता सनी देओलचा बहुप्रतिक्षित गदर 2 चित्रपट गेल्या शुक्रवारी सर्वत्र प्रदर्शित झाला. तेव्हापासून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धमाल केली आहे.11 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झालेल्या गदर 2 चित्रपटाने कमाईच्या बाबतीत अनेक विक्रमांची नोंद केल्याचं दिसून येत आहे.
 
गदर 2 चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर पाचव्या दिवशी स्वातंत्र्य दिनाची सुटी होती. या दिवशी चित्रपटाने प्रचंड गर्दी खेचली आणि एका दिवसात तब्बल 55 कोटी 40 लाखांची कमाई करण्याचा पराक्रम करून दाखवला आहे.
 
चित्रपट समीक्षक तरण आदर्शन यांनी ट्वीट करून सांगितलं, “15 ऑगस्टच्या दिवशी चित्रपटाने कमाईचे सर्व विक्रम मागे टाकून नवा इतिहास रचला आहे. या चित्रपटाने 11 ऑगस्ट रोजी 40.10 कोटी, 12 ऑगस्टला 43.08 कोटी, 13 ऑगस्टला 51.70 कोटी, 14 ऑगस्टला 38.70 कोटी तर 15 ऑगस्टच्या दिवशी 55.40 कोटी रुपयांची कमाई केली."
 
"15 ऑगस्ट रोजी तर ही स्थिती होती की सिंगल स्क्रिनच नव्हे तर मल्टिप्लेक्समध्येही तिकीट उपलब्ध नव्हतं. पुरवठ्याच्या तुलनेत मागणी खूप जास्त आहे, हे स्पष्ट आहे," असंही ते म्हणाले.
 
यानंतर आता आणखी एक विक्रम गदर-2 च्या नावे जमा झाला. तो म्हणजे या शनिवारी (19 ऑगस्ट) चित्रपटाच्या कमाईचा आकडा 300 कोटींच्याही पुढे गेला. यासोबतच गदर 2 हा आता सर्वात वेगवान 300 कोटी कमावणारा पहिला चित्रपट बनला आहे.
 
चित्रपट समीक्षकांच्या मते, या आठवड्याअखेर, गदर 2 चा व्यवसाय 400 कोटींपेक्षाही पुढे जाईल.
 
विक्रमी कामगिरीचं कारण
अनिल शर्मा यांच्या दिग्दर्शनाखाली बनलेला गदर 2 हा चित्रपट 2001 सालच्या ब्लॉकबस्टर गदर चित्रपटाचा पुढचा भाग अर्थात सिक्वेल आहे.
 
दोन दशकांनंतर प्रदर्शित होणाऱ्या एखाद्या सिक्वेलला लोकांचा अशा प्रकारे प्रतिसाद मिळावा, हे खूप कमीवेळा पाहण्यात आलेलं आहे.
 
तरण आदर्श यांनी चित्रपट रिलीज झाल्यानंतर याचा रिव्ह्यू करताना त्याला साडेचार रेटिंग दिलं होतं. तसंच एका शब्दात चित्रपट 'ब्लॉकबस्टर' असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.
 
यापूर्वी आशिकी चित्रपटाचा सिक्वेलही 23 वर्षांनंतर पडद्यावर आला होता. 2013 साली प्रदर्शित झालेल्या त्या चित्रपटाने 100 कोटींची कमाई केली होती.
 
गदर 2 चित्रपटाच्या निर्मात्यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार, पंजाबसारख्या राज्यात हिंदी चित्रपटाच्या कमाईच्या बाबतीत गदर 2 ने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
 
गदर 2 च्या कामगिरीबाबत बीबीसीच्या सहयोगी पत्रकार मधु पाल यांच्याशी केलेल्या चर्चेत भारती दुबे म्हणाल्या, “सनी देओलच्या गदर 2 चित्रपटाच्या यशाचं एक मोठं कारण म्हणजे राष्ट्रवाद हे आहे. सध्याचा काळ हा राष्ट्रवादाचा आहे. तसंच सनी देओलने त्याच्या चित्रपटाचं प्रमोशनही दणक्यात केलं होतं.”
 
“स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हा चित्रपट प्रदर्शित करणं हेसुद्धा यशाचं एक कारण ठरलं. हा चित्रपट राष्ट्रवाद चेतवतो. चित्रपटाची कथा खूपच चांगली आहे, असं काही नाही. पण गदर एक प्रेम कथा या चित्रपटाची जी क्रेझ होती, त्याचा थेट फायदा गदर 2 ला मिळाला. चित्रपटाची टायमिंग, त्यामधील गाणे अगदी जुळून आले आहेत.
 
त्या म्हणतात, “या चित्रपटातून सनी देओलने पुनरागमन केलं आहे. सध्या त्याचं वय 66 वर्षे असून त्याच्यासाठी हे खूपच चांगलं पुनरागमन ठरलं.”
 
चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे यांनीही बीबीसी सहयोगी मधु पाल यांच्याशी याविषयी चर्चा केली. ते म्हणतात, “15 ऑगस्टच्या दिवशी लोक राष्ट्रभक्तीच्या भावनेने भरलेले असतात. चित्रपटात आई-वडील आणि भारत-पाकिस्तान असा मसाला आहे, जो आधीपासूनच लोकांमध्ये हिट फॉर्म्युला आहे. यामुळेच हा चित्रपट चांगला चालला.”
 
त्यांच्या मते, “या चित्रपटाचं भावनिक कनेक्शन भारतीय प्रेक्षकांसोबत आहे. हा भारताचा तो चित्रपट आहे, जो हिंदुस्तानचा चित्रपट असल्याचं सांगतो. कुठे ना कुठे हिंदू हिरोची भावनाही आहे, पण ती खूपच अल्प प्रमाणात आहे. खरं तर या चित्रपटाशी प्रत्येक भारतीयाचं मन जुळलेलं आहे. मग तो हिंदू असो की मुस्लीम. सनी देओल हा धर्मापलिकडे आहे. त्याच्यासारखा दुसरा अभिनेता नाही.”
 
OMG 2 आणि जेलरचं आव्हान
गदर 2 साठी बॉक्स ऑफिसचं आव्हान सोपं नव्हतं. 11 ऑगस्ट रोजीच अक्षय कुमार, पंकज त्रिपाठी यांचा ओह माय गॉड (OMG 2) प्रदर्शित झाला.
 
बॉक्स ऑफिसवर लक्ष ठेवून असणाऱ्या सॅकनिक या वेबसाईटच्या आकडेवारीनुसार, OMG 2 चित्रपटाने आतापर्यंत 100 कोटींपेक्षा जास्त कमाई केली आहे.
 
11 ऑगस्टलाच चिरंजिवी, तमन्ना भाटिया आणि किर्ती सुरेश यांच्यासारख्या तगड्या कलाकारांच्या अभिनयाने नटलेला भोला शंकर चित्रपटही प्रदर्शित झाला.
 
तर त्याच्या एक दिवस आधी 10 ऑगस्टला रजनीकांतचा जेलर चित्रपट प्रदर्शित झाला. त्या चित्रपटानेही मोठी गर्दी खेचण्यात यश मिळवलं आहे.
 
जेलरनेही कमाईच्या बाबतीत अनेक विक्रम आपल्या नावे केले. सध्या या चित्रपटाच्या कमाईने 250 कोटींचा आकडा पार केला आहे. परदेशातील कमाई जोडली तर हा चित्रपटही एक ब्लॉकबस्टर असल्याचं दिसून येतं. जेलरच्या जगभरातील कमाईचे आकडे 450 कोटीच्या पुढे गेले आहेत.
 
वर्ल्ड वाईड कमाईचा विचार केल्यास जेलर चित्रपटाने गदर 2 ला मागे टाकल्याचं दिसून येतं. गदर 2 ची परदेशातील कमाई 35 कोटी इतकी आहे.
 
समीक्षकांच्या मते, उत्तर भारतीय चित्रपटगृहांमध्ये 88 टक्के सीट भरलेल्या होत्या, तर ओह माय गॉड 2 चित्रपटानेही प्रेक्षकांना आपल्याकडे खेचून घेतलं. गदर 2 चित्रपट प्रदर्शत झाला तर त्याची कमाई यापेक्षा कितीतरी पटींनी जास्त असली असती.
 
वानखेडे म्हणतात, “हा चित्रपट ओह माय गॉडसोबत रिलिज झाला. ओपनहायमर, बार्बी यांसारख्या चित्रपटांनी आधीपासूनच एक वातावरण निर्माण केलं होतं. तसंच रॉकी राणी की प्रेम कहानीही चांगली कामगिरी करत आहे. त्यामुळे चित्रपट रिलीज होण्याचं अतिशय गोग्य होतं.
 
“चित्रपटात कर्नलला दाखवतात, तेव्हा वंदे मातरमचं संगीत ऐकू येतं. बॅकग्राऊडला चांगलं संगीत आहे. त्याचा एक भावनिक भाग आहे. बाप-मुलगा यांच्यातील प्रेम आहे. काही प्रमाणात पाकिस्तान विरोधी भावनाही आहेत.”
 
सनी देओलचा पराक्रम
सनी देओलने यापूर्वी सुद्धा अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले. पण त्याच्यासाठी स्पर्धाही तितकीच अवघड राहिली.
 
सनी देओलच्या चित्रपटासोबत आणखी एक मोठा चित्रपट प्रदर्शित होण्याची ही पहिली वेळ नाही.
 
गदर एक प्रेम कथा हा चित्रपट प्रदर्शित झाला त्याच दिवशी आमिर खानचा लगान चित्रपटही आला होता. 15 जून 2001 रोजी प्रदर्शित झालेले हे दोन्ही चित्रपट राष्ट्रवादावर आधारितच होते.
 
लगानने त्यावेळी 60 कोटी रुपयांची कमाई केली, तर गदर चित्रपटाने 130 कोटींचा गल्ला जमवला होता.
 
घायल चित्रपटाने 20 कोटींची कमाई केली आणि दिल चित्रपटाने 17 कोटी कमावले होते. चित्रपट समीक्षकांनी दोन्ही चित्रपट ब्लॉकबस्टर असल्याचं म्हटलं होतं.
 
पण एक गोष्ट पक्की आहे, ती म्हणजे कमाईच्या दृष्टिकोनातून सनी देओलचे चित्रपट उजवे ठरतात.
 
गेल्या 10 वर्षांपासून सनी देओलच्या पदरी निराशा
सनी देओलचा गदर चित्रपट सुपरहिट झाल्यानंतर त्याचे पुढे त्याला फारसं यश मिळालं नाही. त्याचा यमला पगला दिवाना चित्रपट 2011 मध्ये आला होता. त्या चित्रपटाने 90 कोटींची कमाई केली. हा चित्रपट वगळता इतर कोणतेच चित्रपट गेल्या 10 वर्षांत चालले नाहीत.
 
यमला पगला दिवाना 2 हा चित्रपट 2013 मध्ये आला पण तो सरासरी चालला. त्या चित्रपटाने 50 कोटी कमावले. तर 2018 मध्ये यमला पगला रिटर्न्स चित्रपट आला. केवळ 17 कोटींची कमाई करत हा चित्रपट फ्लॉप ठरला.
 
2022 साली सनी देओलच्या चुप चित्रपटाकडून अपेक्षा वाढल्या होत्या. पण हा चित्रपटही फार काही कमाल दाखवू शकला नाही. चित्रपटाने केवळ 19 कोटी कमावले. तर त्यापूर्वी 2019 साली आलेल्या ब्लँक चित्रपटानेही केवळ 8 कोटीच कमावले.
 
गदर 2 चं वैशिष्ट्य
चित्रपट समीक्षक वानखेडे म्हणाले, “गदर 2 हा चित्रपट सर्वात वेगाने 100 कोटी रुपये कमावणाऱ्या चित्रपटांच्या यादीत पठाण आणि आदिपुरुषनंतर तिसरा चित्रपट आहे.”
 
“हा चित्रपट काय फारसा चांगला नाही. त्याचे रिव्ह्यूही चांगले नाहीत. पण राष्ट्रप्रेमाची भावना याच्या उपयोगी आली. सनी देओलचा स्वीकारार्हता, विनम्रता, लोकांप्रति त्यांचं प्रेम हीसुद्धा चित्रपट यशस्वी होण्याची कारणे असल्याचं सांगितलं जातं.”
 
वानखेडे पुढे म्हणाले, “चित्रपट बनवला जात नाही, तर तो बनत असतो. अनिल शर्मा यांनीही विचार केला नसेल की चित्रपट असा हिट होईल. आपण ट्रेलर पाहिला होता. तेव्हाही असं वाटलं नव्हतं. केवळ 60 कोटींमध्ये बनलेल्या चित्रपटाने 350 कोटींच्या दिशेने घोडदौड सुरू केली आहे.”
 
“या चित्रपटाचा आपला एक इतिहास आणि वलय आहे, त्यामुळे इतर चित्रपटांशी त्याची तुलना करणं योग्य ठरणार नाही. खरं तर या चित्रपटात काही सकारात्मक गोष्टी आहेत. त्या म्हणजे देशभक्तिची भावना, पाकिस्तान विरोधी भावनेपेक्षाही मनोरंजनाची जास्त भावना, इतरांवर टीका करण्यापेक्षा आम्ही आधी आपल्या देशाबाबत बोलत आहोत. त्याशिवाय सनी देओलचं अक्शन, चित्रपटाची वैशिष्ट्ये ठरतात,” असंही वानखेडे यांनी सांगितलं.
 








Published by- Priya Dixit