रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: बुधवार, 5 एप्रिल 2023 (10:05 IST)

दिव्या भारतीचा मृत्यू कसा झाला? तिच्या मृत्यूनंतर सिनेमाचा पडदा कोसळला होता...

divya bharti
सुमिरनप्रित कौर
दिव्या भारती हे नाव आता फक्त तिच्या सिनेमांमधून आणि तिच्या मृत्यूमागच्या गूढ प्रकरणामुळे आपल्या आठवणीत राहिलं आहे.
 
अत्यंत कमी वयातच दिव्या भारतीला सिनेसृष्टीत मोठं यश मिळालं होतं. तिच्याबरोबर काम करण्यासाठी दिग्दर्शकांची अक्षरशः रांग लागत असे. तिचा जन्म 25 फेब्रुवारी 1974 रोजी तिचा मुंबईत जन्म झाला होता.
 
1992 साली तीन हिट सिनेमे दिल्यानंतर 5 एप्रिल 1993 रोजी तिचं अचानक निधन झालं होतं.
 
त्या रात्री सुमारे 11 वाजता वर्सोव्यातील पाचव्या मजल्यावरील घराच्या बाल्कनीतून दिव्या खाली पडली. तिचा मृत्यू झाल्याचं सकाळपर्यंत सगळ्या चित्रपटसृष्टीला समजलं.
 
तिच्या मृत्यूनंतर 'रंग', 'शतरंज', 'थोली मुद्धू' हे तिचे सिनेमे प्रदर्शित झाले. 'रंग'मध्ये दिव्याने आयेशा झुल्काबरोबर काम केलं होतं.
 
रंग सिनेमाबद्दल आयेशा झुल्काने एक वेगळीच आठवण बीबीसीला सांगितली.
 
ती म्हणाली, " दिव्याच्या मृत्यूनंतर आम्हाला एक विचित्र अनुभव आला. तिच्या मृत्यूनंतर काही महिन्यांनी आम्ही फिल्मसिटीमध्ये 'रंग' चा प्रयोग पाहायला गेलो होतो. दिव्या भारती जशी पडद्यावर आली तेव्हा तो पडदाच खाली आला. आमच्यासाठी ते सगळं विचित्र होतं."
 
दिव्याने ज्या फिल्म प्रोजेक्ट्सला सुरुवात केली होती, त्यामध्ये तिच्यासारख्या दिसणाऱ्या मुलींचा वापर करुन किंवा दुसऱ्या अभिनेत्रींना घेऊन सिनेमे पूर्ण करण्यात आले होते.
 
1994मध्ये लाडला सिनेमात दिव्याची भूमिका श्रीदेवीला मिळाली. खरंतर या सिनेमाचा मोठा भाग दिव्याने शूट केला होता. त्याचं चित्रिकरणही इंटरनेटवर उपलब्ध आहे.
 
काय झालं होतं त्या दिवशी?
तिच्या मृत्यूच्या दिवसाबद्दल दिव्याच्या कुटुंबीयांनी एका मुलाखतीत माहिती दिली होती. ती आपल्या मित्रांबरोबर होती. रात्री 10 वाजता तिनं एका कामासाठी आपल्या फॅशन डिझायनरबरोबर असल्याचं फोनवर सांगितलं. त्यानंतर त्यांचे भाऊ दिव्याला घरी सोडून गेले. काही वेळातच ती बाल्कनीतून पडल्याचं समजलं.
 
आयेशा झुल्का सांगते, "आमचा या बातमीवर बराचवेळ विश्वासच बसला नाही. तिला कदाचित मृत्यूबद्दल माहिती असावं. ती सतत लवकर करा, लवकर करा, आयुष्य लहान आहे असं म्हणायची. तिनं कधी स्पष्ट सांगितलं नव्हतं. पण कदाचित माणसाला आतून समजत असतं. तिला प्रत्येक काम वेगानं पूर्ण करायचं होतं. तिला तिच्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी लवकर मिळत गेल्या. मला काहीच समजत नाहीये असं ती अनेकदा म्हणायची. आमच्यामध्ये फार काळ राहायचं नाहीये हे तिला कदाचित माहिती होतं असं मला वाटतं."
 
एक वर्षभर सिनेमाच मिळाला नाही
 
वयाच्या 14 व्या वर्षीच दिव्या भारतीचं सिनेमाशी नातं जुळलं. एकापाठोपाठ एक सिनेमे तिला मिळत गेले. पण तसे ते हातातून गेलेसुद्धा.
 
तिचा एक रोल दुसऱ्या अभिनेत्रीला मिळाला तर कुठे तिचं दिग्दर्शकाशी भांडण झालं. यात एक वर्ष गेलं. मग तिनं ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला.
 
सुटी संपल्यावर तिला लगेच मुंबईला बोलावून घेण्यात आलं. तिले तेलगू दिग्दर्शक भेटणार होते. त्यांची भेट झाली आणि दुसऱ्या दिवशी हैदराबादेत चित्रिकरण सुरू झालं. हा सिनेमा होता 'बोब्बिली राजा. यामध्ये दिव्या भारतीबरोबर व्यंकटेश यांनी काम केलं होतं.
 
ही गोष्ट आहे 1990 ची. त्यानंतर घटना अत्यंत वेगाने घडत गेल्या. दिव्याला किंवा तिच्या चाहत्यांना कसलाही विचार करायला उसंतच मिळाली नाही.
 
'बोब्बिली राजा' हिट झाल्यावर तिनं तेलगू सिनेमे सुरू केले. तिनं चिरंजीवी, मोहन बाबू यांच्याबरोबर काम केलं. 'राऊडी अल्लडू' आणि 'असेम्ब्ली राऊडी' हे ते सिनेमे होते.
 
एका वर्षात तीन हिट सिनेमे
एका वर्षात तेलगू सिनेसृष्टीत नाव कमावल्यावर तिला हिंदी सिनेमांसाठी ऑफर्स येऊ लागल्या.
 
1992 आणि 1993मध्ये तिनं 14हून अधिक हिंदी सिनेमांत काम केलं. हिंदी सिनेमातलं हे रेकॉर्ड आहे. जानेवारीत तिचा पहिला हिंदी चित्रपट आला. त्याचं नाव 'विश्वात्मा'. या सिनेमातलं 'सात समंदर पार' हे गाणं चांगलंच गाजलं.
 
त्याच्या पुढच्या महिन्यात गोविंदा आणि दिव्याचा 'शोला और शबनम' सिनेमा गाजला. जुलै महिन्यात शाहरुख खान, दिव्या आणि ऋषी कपूर यांचा 'दीवाना' सिनेमा हिट झाला.
 
शाहरुखचा प्रदर्शित झालेला हा पहिला सिनेमा होता. दिव्या भारतीचा एकाच वर्षात हिट झालेला तो तिसरा सिनेमा होता.
 
'शोला और शबनम'च्या चित्रिकरणाच्यावेळेस तिची साजिद नडियादवालाशी ओळख झाली आणि त्यांचं लगेच लग्नही झालं. त्यांच्या लग्नाबद्दल लोकांना फारसं माहिती नव्हतं.
 
तुम्ही तिच्याकडे आपोआप ओढले जाता...
आयेशा झुल्का सांगते, ती एकदम हसतमुख मुलगी होती. तुम्ही तिच्याकडे आपोआप आकर्षिले जाता. ती फारच प्रेमळ होती. सगळ्यांचं प्रेम स्वीकारायचीही. माझी मैत्रिण होती. माझ्यासाठी तिनं शॉपिंगही केलं होतं.
 
1992मध्ये तीन हिट सिनेमे दिल्यावर तिचा 1993मधला 'क्षत्रिय' हा पहिला सिनेमा आला. त्यात दिव्या, रवीना टंडन, सनी देओल आणि संजय दत्त होते.
 
मार्चमध्ये हा सिनेमा आला. एप्रिलमध्ये तिचा मृत्यू झाला. तिच्या आयुष्यात प्रदर्शित झालेला हा शेवटचा सिनेमा होता.
 
रवीना टंडन सांगते, "ती तरुण होती, भावनाप्रधान होती. कोणाचंही ऐकायची नाही. कदाचित हेच कारण ठरलं असावं..."
 
दिव्या भारतीनं एका वर्षात केलेल्या कामानं तिला एकदम उंचीवर नेऊन बसवलं आजही तिला कोणीही विसरू शकत नाही.
 
तिच्यावर चित्रित झालेली 'सात समंदर पार', 'दीवाना तेरा नाम रख दिया' ही गाणी लोक आजही गुणगुणतात.
Published By -Smita Joshi