सोमवार, 27 जानेवारी 2025
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : रविवार, 13 जून 2021 (10:35 IST)

सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा तपास कुठपर्यंत? 5 तपास यंत्रणांच्या हाती काय लागलं?

मयांक भागवत
14 जून 2021...बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूला एक वर्ष पूर्ण होईल. पण, अजूनही एक प्रश्न अनुत्तरितच आहे. सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली?
 
मुंबई पोलीस, बिहार पोलीस, सीबीआय (CBI), नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरो (NCB) आणि अंमलबजावणी संचलनालय (ED) या पाच यंत्रणांनी सुशांत मृत्यूप्रकरणाची चौकशी केली. पण, तपासात हाती काय लागलं?
 
मुंबई पोलिसांच्या प्राथमिक तपासात सुशांतने आत्महत्या केल्याचं समोर आलं, तर सीबीआय तपासाबाबत अजूनही मौन बाळगून आहे. NCB चा तपास, बॉलीवूडमधील ड्रग्ज सिंडिकेटच्या दिशेने सुरू आहे. अंमलबजावणी संचलनालयाला आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे मिळालेले नाहीत.
या तपास यंत्रणांनी वर्षभरात कोणत्या दिशेने चौकशी केली? तपास कुठपर्यंत आलाय? आपण जाणून घेऊया.
 
सीबीआयचा तपास कुठपर्यंत आला?
सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? याचा तपास सध्या सीबीआयकडे आहे.
 
सुप्रीम कोर्टाने सुशांत मृत्यू प्रकरण तपासासाठी CBI कडे सुपूर्द करून 10 महिने पूर्ण होतील. पण चौकशीत काय निष्पन्न झालं? सुशांतची हत्या झाली का त्याने आत्महत्या केली? याबाबत सीबीआयने माहिती दिलेली नाही.
 
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी वारंवार सीबीआयने चौकशी अहवाल जाहीर करावा, अशी मागणी केली होती.
सीबीआयने रिया चक्रवर्ती, सुशांतचा मित्र सिद्धार्थ, आचारी नीरज आणि दिपेश सावंत यांचे जबाब नोंदवले. सुशांतची हत्या झाली होती का? हे शोधण्यासाठी ऑल इंडिया इंन्स्टिट्युट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या (AIIMS) फॉरेंन्सिक विभागाचे प्रमुख डॉ. सुधीर गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली.
 
सुशांतच्या घरी 13 आणि 14 जूनच्या दिवसाचं नाट्यरूपांतरण करण्यात आलं. डॉ. गुप्ता यांनी सप्टेंबर 2020 मध्ये रिपोर्ट सीबीआयला सोपवला होता. प्रसारमाध्यमांशी बोलताना डॉ. गुप्ता यांनी, "हे आत्महत्येचं प्रकरण आहे. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम नव्हती," अशी माहिती दिली होती.
 
भाजप खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी सुशांत मृत्यूप्रकरणी चौकशीत पुढे काय झालं, याची माहिती पंतप्रधान कार्यालयाला विचारली होती. त्यावर उत्तर देताना सीबीआयने "चौकशी सुरू आहे. सर्व पैलू तपासून पाहिले जात आहेत, " असं उत्तर दिलं.
 
"अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने तपास सुरू आहे. जप्त करण्यात आलेल्या इलेक्ट्रोनिक वस्तूंमधून डेटा मिळवण्याचं काम सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी विविध ठिकाणी चौकशी केलीये," असं सीबीआयने म्हटलं होतं.
 
CBI कडून सुशांत मृत्यूप्रकरणी अधिकृतरित्या देण्यात आलेली ही पहिली आणि शेवटची माहिती होती. सीबीआयने तपास कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचला याबाबत भाष्य केलेलं नाही. महाराष्ट्राचे माजी पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल आता, CBIचे संचालक आहेत. त्यामुळे सुशांत मृत्यूप्रकरणी पुढचा निर्णय त्यांच्या हातात आहे.
 
अंमलबजावणी संचलनालयाचा तपास
सुशांतच्या कुटुंबीयांनी रिया चक्रवर्तीवर 15 कोटी रूपयांचा फेरफार केल्याचा आरोप केला होता.
ED ने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉंडरींग कायद्यांतर्गत (PMLA) सुशांतच्या पैशांचा अपहार झाला का? याची चौकशी सुरू केली. 7 ऑगस्ट 2020 ला रियाची चौकशी करण्यात आलं. रियाची मॅनेजर, सुशांतचा माजी हाऊस मॅनेजर यांचीदेखील चौकशी झाली.
 
महिनाभरच्या तपासानंतर "रियाविरोधात मनी लॉन्डरिंगचा पुरावा मिळाला नाही. रिया सुशांतच्या पैशांची हेराफेरी करत असल्याचा पुरावा नसल्याची माहिती," ईडीच्या सूत्रांनी दिली होती.
 
सुशांतच्या अकाउंटमधून रिया किंवा तिच्या कुटुंबीयांच्या अकाउंटमध्ये पैशांचा व्यवहार झाला नसल्याचं ईडीच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं होतं.
 
नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचा तपास
रियाच्या मोबाईलचा तपास करत असताना ईडीला तिच्या फोनमध्ये ड्रग्जबाबत चॅट असल्याची माहिती मिळाली. यानंतर सुशांत मृत्यूप्रकरणाची चौकशीमध्ये नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोची एन्ट्री झाली.
8 सप्टेंबरला नार्कोटीक्स कंट्रोल ब्युरोने रिया चक्रवर्तीला ड्रग्ज प्रकरणी अटक केली. "रिया ड्रग्ज विकत घेत होती. सुशांतच्या ड्रग्ज सेवनाची सवय तिने लपवली. व्हॉट्सअप चॅटवरून ती ड्रग्ज व्यवसायाशी संबंधित होती," असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने प्रतिज्ञापत्रात कोर्टाला सांगितलं होतं.
 
ऑक्टोबरमध्ये हायकोर्टाने जामीन दिल्यानंतर रिया जामीनावर बाहेर आली आहे. सुशांत मृत्यूनंतर ड्रग्जप्रकरणी तपास करणाऱ्या NCBने आतापर्यंत 30 पेक्षा जास्त जणांना अटक केली आहे. ज्यात रियाचा भाऊ शौविकही सहभागी आहे.
 
दरम्यान, 26 मे रोजी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने सुशांतचा फ्लॅटमेट सिद्धार्थ पिठानीला अटक केली. NCB चे झोनल हेड समीर वानखेडे म्हणतात, "सिद्धार्थ पिठानी फरार होता. त्याला हैदराबादमधून अटक करण्यात आली. या प्रकरणाची चौकशी सुरू आहे."
 
सिद्धार्थ पिठानीची अटक या प्रकरणी महत्त्वाची मानण्यात येत होती. सुशांतच्या मृत्यूच्या दिवशी सिद्धार्थ सुशांतसोबत घरात उपस्थित होता.
सुशांत मृत्यूनंतर, नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोने ड्रग्जप्रकरणी अभिनेत्री दीपिका पादुकोण, रकुलप्रीत सिंह, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि अर्जुन रामपाल यांची चौकशी केलीये. तर, कॉमेडीकींग म्हणून ओळखली जाणारी भारती सिंहला ड्रग्जसेवन प्रकरणी अटक करण्यात आली होती.
 
मुंबई पोलिसांचा तपास
सुशांतचा मृत्यू हायप्रोफाईल होता. पण, सुसाईड नोट मिळाली नव्हती.
 
पोलीस उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी, "पोस्टमार्टम अहवालानुसार सुशांतचा मृत्यू 'Asphyxia due to hanging' म्हणजेच गळफास लावल्यामुळे गुदमरुन झाला," असल्याची माहिती दिली होती.
 
फॉरेन्सिक लॅबने, 27 जुलै 2020 ला 'ही हत्या नाही. सुशांतच्या व्हिसेरा नमुन्यात ड्रग्ज किंवा हानीकारक केमिकल्स नाहीत,' असा अहवाल मुंबई पोलिसांना दिला होता.
 
सुशांतच्या गळ्याभोवती ज्या कपड्याचे धागे सापडले होते. तो कपडा घरातून पोलिसांनी जप्त केला होता. 'हा कपडा 200 किलोपर्यंत वजन पेलू शकतो' असा रिपोर्ट फॉरेन्सिक अधिकाऱ्यांनी दिला होता.
 
आदित्य ठाकरेंवर आरोप
दरम्यान, भाजपचे खासदार नारायण राणे यांनी सुशांत आणि त्याची माजी मॅनेजर दिशा सालियान प्रकरणी नाव न घेता युवासेनाध्यक्ष आदित्य ठाकरेंवर आरोप केले आणि सुशांत प्रकरणी आदित्य ठाकरेंचं नाव जोडलं जाऊ लागलं.
या प्रकरणाशी माझा काहीही संबंध नसल्याचं सांगत, आदित्य ठाकरेंनी आरोप फेटाळून लावले होते.
 
बिहार पोलिसांच्या चौकशीवरून राजकारण
मुंबई पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सुशांतच्या कुटुंबीयांनी बिहार पोलिसात रियाविरोधात गुन्हा दाखल केला.
 
सुशांत मृत्यूप्रकरणाला आता राजकीय वळण मिळालं होतं. बिहार पोलिसांनी मुंबईत चौकशी सुरू केली. बिहार पोलिसांना चौकशीचा अधिकार काय असा प्रश्न उपस्थित केला. सुशांत चौकशीवरून 'बिहार विरुद्ध महाराष्ट्र' असा सामना रंगला होता.
 
पाच यत्रणांनी तपास करूनही सुशांतने आत्महत्या केली का त्याची हत्या झाली? हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे. हे प्रकरण आता सीबीआयकडे तपासासाठी असल्याने पुढे सीबीआय काय निष्कर्षापर्यंत पोहोचतं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.