रविवार, 22 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 29 जानेवारी 2024 (09:31 IST)

मुनव्वर फारुकी बिग बॉस-17 चा विजेता, जुनागढपासून ते मुंबईपर्यंत असा होता मुनव्वरचा प्रवास

munavvar farukhi
कॉमेडियन मुनव्वर फारुकी हा बिग बॉस रिअॅलिटी शोच्या 17 व्या सीजनचा विजेता बनला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून सुरू असलेल्या या शोमुळे मुनव्वर फारुकीचे नाव घराघरात पोहचले होते.
विशेष बाब म्हणजे मुनव्वरच्या वाढदिवसालाच तो विजेता ठरल्यामुळे त्याचा आनंद द्विगुणित झाला आहे.
 
तीन महिन्याहून अधिक काळ बिग बॉस शोमध्येच नाही तर मुनव्वरने देशातल्या लोकांच्या मनात देखील घर केले. एक शानदार कार, बिग बॉसची ट्रॉफी आणि 50 लाख रुपये असं या पुरस्काराचे स्वरूप आहे.
 
मुनव्वरसाठी हा प्रवास काही सोपा नव्हता, अनेक चढ-उतार आयुष्यात पाहिल्यानंतर मुनव्वरने हे यश मिळवलं आहे.
 
शोच्या काळात त्याने कधी प्रेक्षकांना हसवले तर कधी भावूक होत तो स्वतः रडला देखील. बिग बॉसचा उपविजेता अभिषेक कुमार ठरला आहे.
मुनव्वरचा 'शायराना अंदाज'
मुनव्वरच्या ओठांवर नेहमी हे शब्द असायचे.
 
कुछ रास्ता लिख देगा, कुछ मैं लिख दूंगा…तुम लिखते जाओ मुश्किल, मैं मंजिल लिख दूंगा. आंखों में समंदर, दिलों में आग लिख दूंगा….तुम तूफान लेकर आना मैं चराग रख दूंगा. मेरे पर काटकर भी तुम्हें कोई फायदा नहीं होगा, मैं जमीन पर भी बैठा ना तो आसमान लिख दूंगा.
 
मुनव्वर अक्षरशः हे शब्द जगला आहे. शोच्या काळात त्याच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील चर्चा झाली. यातून त्याच्या मनावर आघात देखील झाले पण तो या सर्व आव्हानांवर मात करत करत पुढे गेला.
 
त्याच्या याच वागण्यामुळेच तो बिग बॉसच्या अंतिम तीन स्पर्धकांत निवडला गेला आणि शेवटी विजेता बनला.
 
गुजरातच्या दंगलीचे चटके
मुनव्वर फारुकीचं लहानपण अतिशय साध्या वातावरणात गेलं आहे. तो गुजरातच्या जुनागढचा रहिवासी आहे. 2002 मध्ये गुजरातच्या दंगलीत त्याचं घर उद्ध्वस्त झालं होतं. वयाच्या 16 व्या वर्षी त्याच्या डोक्यावरुन आईची सावली बाजूला झाली.
 
मुनव्वरचे वडील त्याला आणि त्याच्या तीन बहिणींना घेऊन मुंबईला आले आणि त्यांनी पुन्हा आयुष्याला नव्याने सुरुवात केली. मुनव्वर त्याच्या कुटुंबीयांसोबत मुंबईच्या डोंगरीत राहू लागला.
 
इथे देखील दुःखाने त्याच्या आयुष्याची पाठ नाही सोडली. मुंबईला आल्यानंतर वडिलांची प्रकृती ढासळू लागली. ते सतत आजारी पडू लागले त्यामुळे मुनव्वरलाच आपले घर चालवण्याची जबाबदारी उचलावी लागली.
 
घर चालवण्यासाठी त्याने भांड्याच्या दुकानात काम करण्यास सुरुवात केली. ते करत असतानाच त्याने कंप्युटर कोर्स करुन ग्राफिक डिजाइनिंगचे काम शिकण्यास सुरुवात केली आणि हळूहळू तो ते काम करू लागला. पोस्टरवर जे वनलाइनर असतात ते त्याने लिहिण्यास सुरुवात केली.
 
हे करत असताना त्याच्या लक्षात आलं की आपण स्टॅंड-अप कॉमेडी करू शकतो आणि त्याने या ठिकाणी नशीब आजमावून पाहिले. जसं तो स्टॅंडअप कॉमेडी करू लागला तसं त्याला प्रसिद्धी मिळू लागली.
 
मुनव्वर युट्युबर झाला पण..
2020 पासून मुनव्वरने युट्युबवर आपले शो अपलोड करण्यास सुरुवात केली. पॉलिटिक्स इन इंडिया या नावाने त्याने आपला स्टॅंडअप व्हीडिओ युट्युबवर अपलोड केला. हा व्हीडिओ हिट झाला आणि त्याचे नाव सगळीकडे पोहचले. त्यानंतर त्याला अनेक स्टेज शो मिळाले.
 
2021 मध्ये तो मध्य प्रदेशात शो करत होता, तेव्हा त्याच्यावर धार्मिक भावनांना दुखावल्याचा आरोप झाला. या प्रकरणात त्याला अटक झाली.
 
तो 35 दिवसांसाठी तुरुंगात राहिली. नंतर त्याला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला. तुरुंगाबाहेर आल्यानंतर पुन्हा मुनव्वर फारुकी प्रसिद्धीच्या झोतात आला.
 
कंगनाच्या लॉकअपचाही विजेता
2022 मध्ये त्याला कंगना रनौतचा रिअॅलिटी शो, 'लॉक अप' मध्ये बोलवण्यात आलं. त्याने केवळ स्पर्धेत सहभागच घेतला नाही तर तो जिंकला देखील. हा शो जिंकल्यानंतर मुनव्वर आणखी प्रसिद्ध झाला.
 
लॉकअप शोमध्ये मुनव्वरने आपल्या खासगी जीवनातील अनेक गोष्टी सर्वांसमोर ठेवल्या. त्याने हे सांगितलं की त्याचं लग्न झालं असून त्याला एक मुलगा देखील आहे. शो नंतर मुनव्वर आणि नाजिला नावाच्या एका मुलीच्या रिलेशनशिपची देखील चर्चा झाली. ती मुलगी मुनव्वरची गर्लफ्रेंड होती.
 
त्याने बिग बॉसमध्ये सांगितलं की त्याचा घटस्फोट झाला असून त्याचा मुलगा त्याच्यासोबतच राहतो. बिग बॉसमध्ये व्हीडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्याच्या मुलाला देखील दाखवण्यात आले होते.
 
आएशाच्या एंट्रीने मनात भीतीचं घर
बिग बॉसमध्ये आएशा नावाच्या मुलीमुळे मुनव्वरवर प्रभाव पडल्याचं दिसून आलं. आएशाची बिग बॉसमध्ये वाइल्ड कार्डने एंट्री झाली. तो आणि आएशा हे दोघे रिलेशनमध्ये होते ही गोष्ट शो मध्ये समोर आली. यामुळे मुनव्वरच्या इमेजला धक्का पोहचला.
 
दोघांचे भांडण देखील सर्वांसमोर आले. मुनव्वरच्या त्या गोष्टीदेखील समोर आल्या ज्या त्याला जनतेसमोर कधी येऊ द्यायच्या नव्हत्या.
 
या गोष्टींमुळे आपले फॅन्स आपल्यावर नाराज होतील अशी भीती मुनव्वरला वाटत होती. पण जेव्हा मुनव्वर अंतिम तीन स्पर्धकात आला तेव्हा त्याच्या आनंदाला पारावर उरला नाही.
 
जनतेनी केवळ त्याला आपले प्रेमच दिले नाही तर त्यांच्यामुळेच तो बिग बॉसचा विजेता ठरला. हा क्षण त्याच्या आयुष्यातील सोनेरी क्षण नक्कीच ठरला.
 
 
Published By- Priya Dixit