गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: शुक्रवार, 17 डिसेंबर 2021 (08:12 IST)

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश

करण जोहरने आयोजित केलेल्या पार्टीत आलिया भट्टदेखील सहभागी झाली होती. याच पार्टीतील करिना आणि करिष्मा कपूरसह चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन राहण्याचा सल्ला दिला होता. पण ‘ब्रह्मास्त्र’ सिनेमाचे मोशन पोस्टर प्रदर्शित होण्यापूर्वी आलियाने दिल्लीतील गुरुद्वारला भेट दिली. त्यामुळे होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केल्याने बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट विरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
 
मुंबई महापालिकेच्या आरोग्य समितीने आलिया भट्टविरोधात एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मुबई महापालिकेच्या आरोग्य समितीचे अध्यक्ष राजुल पटेल म्हणाल्या, आलिया भट्ट नियमांचं उल्लंघन करत दिल्लीला गेली. दिल्लीतील फोटोदेखील तिने सोशल मीडियावर पोस्ट केले होते. त्यामुळे आलियाला आता धडा शिकवण्याची गरज आहे. ती एक सेलिब्रिटी असल्याने तिला हे समजले पाहिजे की बरेच लोक तिला फॉलो करतात. एक जबाबदार नागरिक म्हणून आलियाने नियमांचे उल्लंघन करू नये.
 
आलिया भट्ट काल रात्री चार्टड विमानाने मुंबईत दाखल झाली आहे. आलिया भट्ट हाय रिस्क रुग्णांच्या संपर्कात आल्यामुळे मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने तिला सात दिवस होम क्वारंटाईन रहाण्याचा सल्ला दिला होता. त्यानंतर पाच दिवसांतच आलिया दिल्लीत पोहोचली. आलियाने एका दिवसाच्या कामाकरता होम क्वारंटाईनच्या नियमांचं उल्लंघन केले. दरम्यान आपण एका दिवसाच्या कामाकरता दिल्लीला जात असून आपला कोविड रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचे आलियाने पालिकेला कळवले होते.
 
बॉलिवूडमध्ये सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. अभिनेत्री करीना कपूर आणि अमृता अरोरा यांना कोरोनाची लागण झाली आहे. दरम्यान संजय कपूरची पत्नी महीप कपूर आणि सोहेल खानची पत्नी सीमा खानलादेखील कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर सलमान खानचा भाऊ अभिनेता सोहेल खानचा मुलगा योहान खानलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. तसेच अभिनेता संजय कपूरची पत्नी महीप कपूरनंतर आता त्यांची मुलगी शनाया कपूरलादेखील कोरोनाची लागण झाली आहे. शनायाने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून कोरोनाची लागण झाल्याचे सांगितले आहे.