शुक्रवार, 27 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: रविवार, 22 जानेवारी 2023 (10:30 IST)

पठाण : शाहरूखचं चार वर्षांनी कमबॅक; हा सिनेमा त्याच्यासाठी अतिशय महत्त्वाचा आहे, कारण

बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानचा बहुप्रतिक्षित 'पठाण' चित्रपट पुढच्या आठवड्यात रिलीज होणार आहे. मात्र मागच्या अनेक दिवसांपासून हा चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे.
गेली 2 दशकं शाहरुख खानने बॉलिवूड आणि सोबतच चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलंय. मोहक आणि दिलखुलास व्यक्तिमत्त्व असणाऱ्या शाहरुखचा परदेशातही फॅनबेस आहे. त्यामुळे शाहरूखला 'कल्चरल एक्स्पोर्टर' असंही म्हणतात. चित्रपटांपलीकडे ही शाहरूखची अमाप लोकप्रियता आहे त्यामुळेच त्याला त्याचे चाहते 'किंग खान' किंवा 'बॉलिवूडचा बादशाह' म्हणतात. 
 
मागच्या चार वर्षात शाहरुख एकाही चित्रपटात दिसला नव्हता. आता चार वर्षांच्या ब्रेकनंतर तो पठाण या चित्रपटाच्या माध्यमातून मोठ्या पडद्यावर पुनरागमन करण्यास सज्ज झालाय.
 
आज शाहरुखने वयाची 57 वर्षे गाठली. मात्र वैयक्तिक आणि व्यावसायिक आघाड्यांवर त्याला मोठा सेटबॅक बसला होता. अंमली पदार्थ बाळगल्याच्या खोट्या आरोपाखाली त्याच्या मुलाला आर्यन खानला अटक करण्यात आली होती. अखेर या आरोपातून त्याची सुटका झाली.
 
या सगळ्यात चित्रपटाविषयीची उत्कंठा सुद्धा शिगेला पोहोचली आहे. या चित्रपटात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि जॉन अब्राहम देखील आहेत. 
 
पण पठाण चर्चेत यायला कारण ठरलं त्यातलं 'बेशरम रंग' नावाचं गाणं. डिसेंबर महिन्यात पठाण चित्रपटातील एका गाण्याचा प्रमोशनल व्हिडिओ रिलीज करण्यात आला. आणि सोशल मीडियावर या चित्रपटाची चर्चा रंगू लागली.
 
मागच्या आठवड्यात या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून तर चाहत्यांमध्ये या चित्रपटाची उत्सुकता आणखीनच वाढली आहे. 
 
या चित्रपटाच्या ट्रेलरला यूट्यूबवर 49 मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत. शाहरुखने ट्विट केलेल्या ट्रेलरला 3.9 मिलियन व्ह्यूज मिळालेत. तर तेलुगू आणि तमिळ व्हर्जनला हाफ मिलियन व्ह्यूज मिळालेत. अमेरिका, यूएई, जर्मनी आणि ऑस्ट्रेलियामध्ये तिकिटांच्या विक्रीला चांगलाच प्रतिसाद मिळत असल्याचं काही रिपोर्ट्स मध्ये म्हटलंय.
 
या चित्रपटाचा प्लॉट जेम्स बाँड आणि मिशन इम्पॉसिबल सारखाच असून पुढे काय घडणार याचा अंदाज चटकन लावता येत असल्याचं प्रेक्षकांनी म्हटलंय.
आपण विचारही करू शकणार नाही अशा पद्धतीने भारताचा विनाश करण्याची योजना एका दहशतवादी गटाने आखलेली असते. काही अधिकारी या दहशतवाद्यांना शह देण्याचा प्रयत्न करत असतात, पण यात खूप वेळ निघून चालेला असतो. देशाचं भवितव्य पणाला लागलेल असतं. या कामासाठी प्रशासन आपल्या सर्वोत्तम माणसांची निवड करतं."
 
आणि मग डायलॉगबाजी सुरू होते, "पार्टी पठान के घर रखोगे तो मेहमानवाजी के लिए पठान तो आएगा ही. साथ में पटाखे भी लाएगा.' 
 
या डायलॉगसह पठाणची बिग स्क्रीनवर एन्ट्री होते. 
 
विस्कटलेले केस आणि पिळदार बायसेप्स आणि अॅब्स असलेला पठाण हलक्या मुव्ह्ज मध्ये आपल्या शत्रूंना गारद करतो. चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये मोठमोठ्या इमारती, गाड्या, हार्टबीट वाढवणारी गाणी आणि मन मोहून टाकणाऱ्या तरुणींची रेलचेल आहे. 
 
अडीच मिनिटांचा हा ट्रेलर प्रेक्षकांच्या आणि समीक्षकांच्या हृदयाचा ठाव घेताना दिसतोय. या चित्रपटाच्या ट्रेलरखाली 'पैसा वसूल एक्सपिरियन्स' अशा आशयाच्या खूप साऱ्या कमेंट्स दिसतील.  पण सुरुवातीपासूनच 'पठाण' वादात अडकलाय.
 
हे सगळं एकाबाजूला घडत असतानाच दुसरीकडे शाहरुख खानचे जुने व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. यामध्ये तो चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याबाबत बोलताना दिसतोय. त्याने भारतातील वाढत्या धार्मिक असहिष्णुतेबद्दलही भाष्य केलंय. त्यामुळेच 'पठाण' चित्रपट हिंदू उजव्या विचारसरणीच्या गटांच्या गँगच्या निशाण्यावर आला आहे.
 
लेखक आणि चित्रपट समीक्षक सैबल चॅटर्जी सांगतात, "या घटनेला सांप्रदायिक वळण मिळाल्याचं स्पष्टपणे दिसतंय. अभिनेत्याच्या धार्मिक ओळखीभोवती गोष्टी फिरवल्या जात आहेत."
 
ते पुढे सांगतात की, मागच्या काही वर्षांपर्यंत बॉलीवूडने, धार्मिक आणि राजकीय मतभेदांच्या पलीकडे जाऊन आपली ओळख जपली होती. आणि लोकांचं मनोरंजन करणं ही एकमेव गोष्ट इथं महत्वाची होती. पण आता इथं सुद्धा ध्रुवीकरण व्हायला लागलंय. 
 
"बॉलिवूडच्या मागच्या फळीतल्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे शाहरुख खान. काही लोक या फळीतल्या अभिनेत्यांच करिअर संपवू पाहतायत, त्यामुळे त्यांनी शाहरुख खानला सुद्धा टार्गेट केलंय." 
 
चित्रपटाच्या मुस्लिम असलेल्या 'पठाण' या नावावरूनच काही लोक नाराज आहेत. त्यात आणखीन चित्रपटात जे 'बेशरम रंग' गाणं आहे त्याभोवती वादाचं मोहोळ उठलंय. या गाण्यात दीपिकाने भगव्या रंगाची बिकिनी घातली आहे, त्याला कट्टर हिंदुत्ववादी गटांचा विरोध आहे. या गाण्यातून भगव्या रंगाला निर्लज्ज रंग म्हटल्याचं या गटांच म्हणणं आहे. 
त्यामुळे शाहरुख खानच्या या चित्रपटातून हिंदूंचा अपमान होत असल्याचा आरोप या गटांनी केलाय. कारण भगवा हा त्यांच्या धर्माशी संबंधित रंग आहे. मात्र या गाण्यात दीपिका इतरही रंगाच्या कपड्यांमध्ये दिसते आहे.
 
त्यामुळे चित्रपटातील हे गाणं जोपर्यंत काढून टाकलं जात नाही तोपर्यंत चित्रपटावर बंदी घालण्याचं आवाहन काही संघटनांच्या वतीने करण्यात आलंय. आंदोलकांनी चित्रपटाचे पोस्टर्स फाडले आहेत, शाहरुख खानचे पुतळे जाळले आहेत, कलाकारांवर हिंदू समाजाच्या भावना दुखावल्याचा आरोप करणारी याचिका न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.सोबतच नग्नता आणि अश्लीलतेला प्रोत्साहन दिल्याचा आरोपही चित्रपटावर करण्यात आलाय.  
 
चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच 'पठाण' चित्रपटाला बॉयकॉट करण्यात यावं, अशी मागणी केली जात आहे. शिवाय सोशल मीडियावर बॉयकॉटचे हॅशटॅग ट्रेंड व्हायला लागले आहेत.
 
पण पठाणच्या रिलीजचा काऊंटडाऊन मात्र सुरू झालाय. शाहरुख असो वा चित्रपट निर्माते सगळ्यांनाच वादांनी घेरलंय.
 
फिफा वर्ल्डकप सुरू असताना फुटबॉलपटू वेन रुनी शाहरुख सोबत एका छोट्या प्रमोशनल व्हीडिओमध्ये दिसला होता. तो शाहरुखच्या मागेमागे हिंदीत म्हणत होता की, "अपनी कुर्सी की पेटी बांध लो, मौसम बिगडने वाला है"
 
या आठवड्याच्या सुरुवातीला शाहरुख दुबईच्या दौऱ्यावर होता. त्यावेळी दुबईतील सर्वात उंच इमारत असलेल्या बुर्ज खलिफावर पठाणचा ट्रेलर प्रोजेक्ट करण्यात आला होता.  आज शाहरुख खानच्या प्रसिद्धीपासून ते चित्रपटाच्या बजेटपर्यंत (2.5 बिलयन) सगळ्याच गोष्टी धोक्यात आल्याची चर्चा रंगली आहे. चित्रपटाच्या नकारात्मक प्रसिद्धीमुळे गल्ल्यावर परिणाम होऊ शकतो? 
 
यावर चॅटर्जी असहमत असल्याचं दिसतं. 
 
ते म्हणतात, "शाहरुख हा केवळ अभिनेता नाही, तर तो एक ब्रँड आहे. आपल्या देशातला आणि बॉलिवूडमधील सर्वात मोठा ब्रँड आहे."
 
डेस्परेटली सीकिंग शाहरुख खान' पुस्तकाच्या लेखिका श्रयाना भट्टाचार्य सांगतात की, "शाहरूखचे चाहते त्याला धर्म किंवा राजकीय गणितांमध्ये कधीच तोलत नाहीत. त्याचे चाहते पठाणचा 'फर्स्ट डे, फर्स्ट शो' पाहतील, कारण बऱ्याच दिवसांपासून ते त्याला मोठ्या पडद्यावर मिस करतायत."
 
पण चार वर्षांच्या ब्रेकनंतर कमबॅकसाठी स्पाय-थ्रिलर निवडणं योग्य आहे का? असा प्रश्न काहीजणांना पडलाय.
 
शाहरुखला नेहमीच एका रोमँटिक हिरोच्या भूमिकेत पाहण्यात आलंय. महिलांसाठी आणि एका अख्या पिढीला त्याचं अफेक्शन राहिलंय. त्यामुळे कदाचित त्याला अॅक्शन हिरो म्हणून पाहण्यात या लोकांना इंटरेस्ट नसेल.
 
काही दिवसांपूर्वी शाहरुख एकेठिकाणी म्हणाला होता की, त्याला कायमच अॅक्शन हिरो म्हणून काम करायचं होतं, पठाणमुळे त्याचं हे ही स्वप्न पूर्ण होतंय.
 
यावर चॅटर्जी सांगतात की, त्यांना चित्रपटाविषयी काही शंका आहेत. जसं की चित्रपट चांगला आहे की नाही सांगता येत नाही मात्र ती एक धाडसी कल्पना नक्कीच आहे.
 
मागच्या काही वर्षात शाहरुखने माय नेम इज खान, चक दे ​​इंडिया आणि लव्ह यू जिंदगी सारख्या विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. 
 
त्यामुळे 'पठाण'मधूम तो साचेबद्धपणा तोडतोय असं दिसतंय. 
 
चॅटर्जी पुढे सांगतात की, "त्याच्या करिअरच्या या टप्प्यावर, तो ते करू शकतो. आज त्याच्याकडे गमावण्यासारखं काहीच नाहीये त्यामुळे त्याला याची भीती नसावी."
 
त्यामुळे भलेही तो जुगार असेल पण एक गोष्ट निश्चित असते ती म्हणजे, "तुम्ही शाहरुखचा पिक्चर मिस केला नाही पाहिजे."


Published By- Priya Dixit