सलमान खानच्या अपार्टमेंट बाहेर कर्तव्यावर असलेल्या पोलिसाचा मृत्यू
बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील निवासस्थान, गॅलेक्सी अपार्टमेंट्सबाहेर सुरक्षेसाठी तैनात असलेल्या एका पोलिसाचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला आहे.
मुंबई पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीची ओळख ४१ वर्षीय कॉन्स्टेबल गणेश अशी पटली आहे. गणेश गेल्या अनेक वर्षांपासून सलमान खानच्या सुरक्षेत तैनात होते आणि त्याच्या घराबाहेर कर्तव्यावर होते.
आयएएनएसच्या वृत्तानुसार, शुक्रवारी कर्तव्यावर असताना गणेश यांची प्रकृती अचानक खालावली. त्यांना चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. घटनास्थळी उपस्थित असलेल्या इतर पोलीस अधिकाऱ्यांनी आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांनी त्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तेथील डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
मुंबई पोलिसांच्या एका अधिकाऱ्याने सांगितले, "डॉक्टरांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, कॉन्स्टेबल गणेश यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. त्यांना रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांची प्रकृती चिंताजनक होती."
घटनेची माहिती मिळताच वांद्रे पोलीस आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येईल. शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे कारण पूर्णपणे निश्चित होईल.
अभिनेता सलमान खानला गेल्या काही काळापासून धमक्या मिळत आहेत . त्यामुळे, त्याच्या घराबाहेर चोवीस तास पोलीस आणि खाजगी सुरक्षा कर्मचारी तैनात आहेत. गणेशदेखील या सुरक्षा पथकाचा एक भाग होता.कुटुंबीयांना सर्वतोपरी मदत आणि नुकसान भरपाई देईल. त्यांच्यावर संपूर्ण शासकीय सन्मानाने अंत्यसंस्कारही केले जातील.
Edited By - Priya Dixit
