1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
  4. Sachin Saraf to make his directorial debut

सचिन सराफ यांचा दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण; अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामामधून

चित्रपट निर्माते आणि पटकथालेखक सचिन सराफ आपल्या कारकिर्दीतील एका नव्या टप्प्यावर पदार्पण करण्यासाठी सज्ज झाले आहेत. अमित साध अभिनीत ‘प्रताप’ या अ‍ॅक्शन ड्रामाच्या माध्यमातून ते दिग्दर्शन क्षेत्रात पदार्पण करत आहेत. एन्काउंटर स्पेशालिस्टचे आयुष्य, कायदा, न्यायव्यवस्था आणि मानवी विवेक यांमधील गुंतागुंत यांवर आधारित हा चित्रपट आहे. नागपूरचे असलेले सचिन सराफ यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतील विविध क्षेत्रांमध्ये अनेक वर्षे काम करून अनुभव मिळवला आहे. आता ‘प्रताप’च्या माध्यमातून ते दिग्दर्शक म्हणून आपल्या नव्या प्रवासाला सुरुवात करत आहेत.
 
चित्रपटसृष्टीतील सचिन यांचा प्रवास अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्यांमधून घडला आहे. त्यांनी ‘वीर’ आणि ‘अपने’ यांसारख्या चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केले आहे. तसेच ‘शूटआउट अॅट लोखंडवाला’ या चित्रपटाच्या पटकथा लेखन टीमचाही ते भाग होते. या अनुभवातून त्यांना चित्रपटनिर्मिती आणि कथाकथनाच्या विविध पैलूंची जवळून ओळख झाली.
 
यानंतर त्यांनी बीसीसीएल ग्रुपच्या टाइम्स स्टुडिओमध्ये क्रिएटिव्ह डायरेक्टर म्हणून काम पाहिले. या काळात ते एमएक्स प्लेअरच्या ‘आश्रम’सारख्या लोकप्रिय प्रोजेक्टशीही जोडले गेले होते. या अनुभवामुळे कंटेंट डेव्हलपमेंट आणि वेगाने बदलणाऱ्या डिजिटल मनोरंजन क्षेत्राविषयीची त्यांची समज अधिक व्यापक झाली.
 
‘प्रताप’ या चित्रपटाच्या निमित्ताने सचिन सराफ लेखक आणि दिग्दर्शक अशा दुहेरी भूमिका पार पाडत आहेत. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठावान असलेल्या एका एन्काउंटर स्पेशालिस्टच्या आयुष्यात अचानक अनपेक्षित वळण येते आणि त्याला कायद्याच्या दुसऱ्या बाजूला उभे राहावे लागते, अशी या चित्रपटाची कथा आहे. आयुष्यभर कायद्याचे रक्षण करणाऱ्या व्यक्तीला जेव्हा त्याच व्यवस्थेचा सामना करावा लागतो, तेव्हा काय घडते, याचा वेध हा चित्रपट घेतो. अ‍ॅक्शन आणि थरारासोबतच सत्तेचे परिणाम, न्यायव्यवस्थेतील गुंतागुंत आणि व्यावसायिक ओळख व कौटुंबिक आयुष्य यांच्यातील संघर्ष असे अनेक महत्त्वाचे विषय या चित्रपटातून मांडण्यात आले आहेत. या चित्रपटात ईशा देओल, तिग्मांशू धुलिया, सीमा बिस्वास आणि मिलिंद गुणाजी हे कलाकारही महत्त्वपूर्ण भूमिकांमध्ये दिसणार आहेत.
सचिन सराफ यांच्यासाठी ‘प्रताप’ हा अनेक वर्षांच्या अनुभवाचा आणि शिकण्याच्या प्रक्रियेचा महत्त्वपूर्ण टप्पा आहे. अ‍ॅक्शन, दमदार व्यक्तिरेखा आणि नैतिक संघर्ष यांची सांगड घालणाऱ्या कथेद्वारे ते दिग्दर्शन क्षेत्रात आपली नवी ओळख निर्माण करण्यास सज्ज झाले आहेत. प्रदीप रंगवानी यांच्या UV Films या बॅनरखाली या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. सचिन सराफ यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले असून, ‘प्रताप’ २० नोव्हेंबर २०२६ रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.
पुढील लेख
अभिनेता सैफ अली खानला जीवे मारण्याची धमकी; बाबा सिद्दीकीच्या मारेकऱ्याचे नाव समोर आले