बुधवार, 25 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 5 एप्रिल 2018 (16:55 IST)

सलमान दोषी, शिक्षा मात्र निर्मात्यांना, ५०० कोटीहून अधिक रुपये पणाला

काळवीट शिकार प्रकरणी अभिनेता सलमान खानला दोषी ठरवण्यात आल्यानंतर आता  सलमानच्या आगामी कार्यक्रम आणि चित्रपट संकटात सापडण्याची शक्यता आहे. सध्या  एकट्या सलमान खानवर विविध प्रोजेक्टच्या माध्यमातून ५०० कोटीहून अधिक रुपये लावण्यात आले आहेत. चित्रपटांव्यतिरिक्त विविध रिअॅलिटी शोचं सूत्रसंचालन तो करत आहे. 
 
‘बिग बॉस ११’च्या एका भागासाठी सलमानला ११ कोटी रुपये इतकं मानधन आकारलं जात होतं. त्याचप्रमाणे ‘दस का दम’च्या २६ भागांसाठी सलमानला एकूण ७८ कोटी रुपये इतकं मानधन देण्यात येणार असल्याचं कळत आहेत. या रकमेची फोड केली असता लक्षात येतंय, की कार्यक्रमाच्या एका भागासाठी सलमानच्या वाट्याला तीन कोटी रुपये येणार आहेत. पण, न्यायालयाची सुनावणी आणि त्यापुढील परिस्थिती पाहता ‘दस का दम’च्या वाटेतील अडचणी आल्या आहेत. यंदाच्याच वर्षी जून महिन्यात ‘दस का दम’ हा कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
 
काही चित्रपट आहेत ते असे ..
 
रेस थ्री - हा चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहे. रेमो डिसूझा दिग्दर्शित या चित्रपटात सलमानसोबत अनिल कपूर, जॅकलिन फर्नांडिस आणि बॉबी देओल मुख्य भूमिकेत आहेत. या सिनेमाचं बजेट 100 कोटींपेक्षा जास्त आहे. चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झालं असलं तरी तो हिट करण्यासाठी निर्माते-दिग्दर्शकांना प्रमोशनसाठी सलमानची गरज भासेल.
 
भारत - हा सलमानचा बिग बजेट आणि महत्त्वाकांक्षी सिनेमा आहे. जवळपास दोनशे कोटी रुपये इतकं 'भारत'चं बजेट आहे. सिनेमाचं शूटिंग जून महिन्यात सुरु करण्याचं प्लॅनिंग आहे.
 
किकचा सिक्वल - साजिद नाडियादवाला यांनी 2014 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'किक' सिनेमाच्या सिक्वलची घोषणा केली होती. या चित्रपटाच्या पटकथेवर अद्याप काम सुरु आहे.
 
दबंग 3 - दबंग चित्रपटातील चुलबुल पांडेच्या व्यक्तिरेखेने चाहत्यांची मनं जिंकली. आता दबंगच्या तिसऱ्या भागाची जुळवाजुळव सुरु आहे. मात्र तारखांबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.