1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified रविवार, 13 फेब्रुवारी 2022 (10:37 IST)

सलमान खानने लता दीदींचं गाणं गात श्रद्धांजली वाहिली, व्हिडीओ व्हायरल

भारतरत्न लतादीदी यांच्या निधनाने देशभरात शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनाच्या दुःखातून त्यांचे चाहते बाहेर आलेले नाही. त्यांचे चाहते आपापल्यापरीने त्यांना श्रद्धांजली देत आहे. बॉलिवूड मध्ये देखील त्यांच्या निधनाने शोककळा पसरली आहे. काही बॉलिवूड स्टार्सने त्यांच्या सोबत घालवलेल्या वेळेची आठवण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. बॉलिवूडचा सुपरस्टार सलमान खानने दिवंगत गायिका लता मंगेशकर यांची आठवण करत लता दीदींचे गाणं गायले आहे. त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये सलमान खान त्याच्या पेंटिंगसमोर बसून लता मंगेशकर यांचे 'लग जा गले' गाणे गाताना दिसत आहे. हा व्हिडिओ आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत सलमान खानने लिहिले की, 'दीदींसारखे कोणी नाही आणि कोणी नसणार.'
 
अल्पावधीतच या व्हिडिओला 13 लाखांहून अधिक व्ह्यूज आले आहेत. कमेंट सेक्शनमध्ये चाहते सलमान खानच्या गाण्याचं कौतुक करत आहेत. काही सोशल मीडिया युजर्सनी त्याला ट्रोल करण्याचाही प्रयत्न केला आहे. मात्र, सलमान खानने ज्या पद्धतीने हे गाणे गायले आहे, ते पाहता सलमानला  लतादीदींची मनापासून आठवण येत असल्याचे दिसते.त्याच्या चेहऱ्यावर दुःख असल्याचे दिसत आहे. 

92 वर्षीय लता मंगेशकर दीर्घकाळ आजारी होत्या, त्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना न्यूमोनिया झाला होता तसेच त्यांची कोविड चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. नंतर त्यांचा कोविड निगेटिव्ह आला, पण असे असूनही त्यांना  खूप अशक्तपणा आला होता आणि वाढत्या वयामुळे किरकोळ समस्या कायम होत्या.
 
लता मंगेशकर यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करणार्‍या डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर लक्ष ठेवले जात होते. मात्र, असे असूनही त्यांना वाचवता आले नाही आणि अखेर त्यांनी या जगाचा निरोप घेतला. लता मंगेशकर यांच्यावर मुंबईतील शिवाजी पार्क येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले ज्यात अनेक दिग्गज सेलिब्रिटी आणि राजकारणी उपस्थित होते.