गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: गुरूवार, 21 ऑक्टोबर 2021 (12:21 IST)

शाहरुख खान आर्यनला भेटायला जेलमध्ये आजच पोहोचला कारण..

ड्रग्ज प्रकरणी आर्थर रोड जेलमध्ये अटकेत असलेल्या आर्यन खानला भेटण्यासाठी गुरूवारी सकाळी शाहरूख खान दाखल झालाय. आर्यनला अटक झाल्यानंतर पहिल्यांदाच शाहरुखने मुलाची भेट घेतली आहे.
 
जेलमध्ये कोरोनासंसर्ग पसरण्याच्या भीतीमुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कुटुंबीयांना कैद्यांची भेट/मुलाखत बंद केली होती. कोरोनासंसर्ग नियंत्रणात असल्याने 21 ऑक्टोबरपासून जेल प्रशासनाने कोरोना नियम पाळत कैद्यांना भेटण्यासाठी परवानगी पुन्हा सुरू केलीये.
 
मुलाला भेटण्यासाठी शाहरूख पोहोचला जेलमध्ये गुरूवारी सकाळी 9 वाजता अभिनेता शाहरुख खान मुंबईच्या आर्थररोड जेलमध्ये पोहोचला.
 
ड्रग्ज प्रकरणी अटकेत असलेला शाहरुखचा मुलगा आर्यन खानला आर्थररोड जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आलंय.
 
पोलिसांच्या बंदोबस्ताता शाहरुख मुलाला भेटण्यासाठी जेलमघ्ये दाखल झाला.
 
शाहरुख आर्यनला भेटण्यासाठी आज कसा पोहोचला?
कोरोना संसर्ग पसरण्याचा धोका पहाता आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि कैद्यांच्या कुटुंबीयांना कैद्यांना जेलमध्ये भेटण्यावर बंदी घातली होती. त्यामुळे आर्थररोड जेलमध्ये कैदेत असलेल्या कैद्यांची भेट शक्य नव्हती.
 
महाराष्ट्रात सद्यस्थितीत कोरोना संसर्ग नियंत्रणात आहे. त्यामुळे आर्थररोड जेल प्रशासनाने वकील आणि नातेवाईकांना कैद्यांना भेटण्याची परवानगी दिलीये.
 
आर्थर रोड जेल प्रशासनाने याबाबतची नोटीसही जेलबाहेर लावली आहे. या नोटीसमध्ये असं लिहिण्यात आलंय, "बंदी नातेवाईक आणि वकील प्रत्यक्ष भेट/मुलाखत कोरोनाबाबात सरकारने ठरवून दिलेल्या नियमांचं पालन करून 21 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात येत आहेत."
 
"एकावेळी बंद्याचे जास्तीत जास्त दोन नातेवाईकांनाच भेट घेता येईल."
 
शाहरुख-आर्यन समोर आल्यावर काय घडलं?
मुंबईच्या आर्थर रोड तुरुंगात शाहरूख खान आणि आर्यनची 15-20 मिनिटं भेट झाली. सुरुवातीला टोकन देऊन शाहरुख खानला तुरुंगात प्रवेश देण्यात आला.
 
दोघांच्या भेटीदरम्यान 4 सुरक्षारक्षक त्याठिकाणी उपस्थित होते. शाहरुख खान आणि आर्यन खान यांच्यात ग्लास पार्टिशन लावण्यात आलेलं होतं.
 
तुरुंग प्रशासनाकडून मिळालेला भेटीचा वेळ संपल्यानंतर शाहरुख खान स्वतःहून निघून गेला, अशी माहिती मिळाली आहे.
 
आर्यनच्या अटकेवेळी शाहरूख परदेशी होता
2 ऑक्टोबरला नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने आर्यन खानला ड्रग्जप्रकरणी ताब्यात घेतलं होतं. मिळालेल्या माहितीनुसार शाहरुख खान त्यावेळी दुबईत होता.
 
त्यामुळे त्याला आर्यन खानची भेट घेता आली नव्हती.
 
आर्यन खानचे वकील त्याला NCB कार्यालयात येऊन भेटले होते.
 
आर्यनला अटक झाल्यानंतर शाहरूखने NCB च्या कार्यालयात फोनवर आर्यनशी चर्चा केल्याची माहिती समोर आली होती.
 
आर्यन खानचा जामीन का फेटाळण्यात आला?
न्यायमूर्ती व्ही व्ही पाटील यांनी आर्यन खानची जामीन याचिका का फेटाळण्यात आली याबाबत आपल्या आदेशात खालील मुद्दे नमूद केले आहेत -
 
1. आरोपी नंबर 1 (आर्यन खान ) आणि आरोपी नंबर 2 ( अरबाज मर्चंट) मित्र आहेत. दोघांनी आपल्या जबाबात जवळ ड्रग्ज असल्याचं आणि सेवन केल्याचं मान्य केलंय. त्यामुळे आर्यन खानला अरबाजकडे ड्रग्ज असल्याची माहिती होती.
 
2. कोर्टाला दाखवण्यात आलेल्या Whats App चॅटवरून दिसून येतं की, आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) अज्ञात लोकांसोबत ड्रग्जबाबत चॅट आहेत. जास्त प्रमाणात ड्रग्ज आणि हार्ड ड्रग्जबद्दल बोलण्यात आलंय. प्राथमिक पुराव्यांनुसार आर्यन खानचे ड्रग्जशी संबंधित लोकांसोबत संबंध होते.
 
3. What's App चॅट मधून दिसून येतं की आर्यन खानचे (आरोपी नंबर 1) ड्रग्ज सप्लायर्स आणि पेडलर्ससोबत संबंध आहेत
 
4. आरोपींनी संगनमताने हा गुन्हा केला.
 
5. आरोपी ड्रग्जशी संबंधित मोठ्या नेटवर्कचे भाग आहेत
 
6. आर्यन खानची जामीनावर मुक्तता केली तर तो पुराव्यांशी छेडछाड करू शकतो या सरकारी पक्षाच्या युक्तिवादाशी सहमत आहे.
 
7. What's App चॅटवरून आरोपी नंबर 1 (आर्यन खान) ड्रग्ज कारवायांशी संबंधित आहे असं दिसून येतं. जामीनावर असताना पुन्हा असा गुन्हा करणार नाही असं म्हणता येणार नाही
 
त्यामुळे या आरोपांना जामीन देणं योग्य ठरणार नाही.
 
पुढील सुनावणी 26 ऑक्टोबर रोजी
दरम्यान, आर्यन खान प्रकरणातील जामीन याचिकेवरील आजची सुनावणी स्थगित करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणाची सुनावणी आता मंगळवार, 26 ऑक्टोबर रोजी होईल, अशी माहिती मिळाली आहे.
 
न्यायमूर्ती N W सांबरे यांच्यासमोर आर्यनची जामीन याचिका दाखल आहे.