1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 27 मे 2024 (09:54 IST)

FTII मध्ये गजेंद्र चौहानांविरोधातील आंदोलनामुळे रद्द झाली होती स्कॉलरशिप, त्याच पायल यांचा कानमध्ये गौरव

Payal Kapdiya
कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात शनिवारचा दिवस भारतासाठी ऐतिहासिक ठरला. तब्बल तीन दशकांनंतर कानच्या मुख्य स्पर्धेत नामांकन मिळवून पुरस्कारही पटकावण्याचा मान भारतीय चित्रपटाला पहिल्यांदाच मिळाला.
 
दिग्दर्शक पायल कपाडिया यांचा ‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ या चित्रपटानं कान चित्रपट महोत्सवात कौतुक तर मिळवलंच पण मुख्य स्पर्धेतील दुसरा सर्वांत मानाचा पुरस्कार जिंकत स्वतःची छापही सोडली.
 
महोत्सवात स्क्रिनिंगनंतर उपस्थित दर्शकांनी तब्बल 8 मिनिटे उभं राहून टाळ्यांच्या गडगडाटात चित्रपटाला मानवंदना दिली.
 
केरळहून मुंबईत आलेल्या परिचारिकांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट द ज्यूरी प्राईज म्हणजेच (Grand Prix) ग्रांपी सन्मानाचा मानकरी ठरलाय.
 
या पुरस्कारानंतर आता 38 वर्षीय पायल कपाडिया यांनी फ्रान्सिस फोर्ड कोपोला, योर्गोस लैंथिमोस, अली अब्बास, जॅक्स ऑडियार्ड आणि जिया झांगके अशा दिग्गज चित्रपट निर्मात्यांच्या पंक्तीत स्थान पटकावलं आहे.
 
‘मी प्रचंड भारावले, त्यामुळे भाषण लिहून आणले’
पुरस्काराची घोषणा झाल्यानंतर भारावलेल्या पायलनं आपल्याला अजूनही यावर विश्वास बसत नसल्याची प्रतिक्रिया दिली.
 
“हे सगळंच इतकं अविश्वसनीय आहे की हे प्रत्यक्षात घडतंय याची खात्री करायला मी अक्षरशः स्वतःचेच चिमटे घेतेय. मी सगळ्यांची आभारी आहे. ही एक विलक्षण भावना आहे. मुळात या पुरस्कारासाठी नामांकन मिळणंच स्वप्नवत होतं. हा पुरस्कार मिळणं तर माझ्यासाठी कल्पनेच्या पलीकडचं आहे,” असं पायल सांगत होती.
 
पुरस्कार स्वीकारल्यानंतर मंचावरून बोलताना या चित्रपट महोत्सवात हजेरी लावून फार आनंद होत असल्याचं पायलनं सांगितलं. सोबतच आता पुढच्या पुरस्कारासाठी भारतीयांना आणखी 30 वर्ष वाट पाहावी लागू नये, अशी आशाही व्यक्त केली.
 
‘ऑल वी इमॅजिन अॅज लाइट’ ही तीन महिला आणि त्यांच्यातील मैत्रीची गोष्ट आहे. तीन अतिशय वेगवेगळा स्वभाव असलेल्या या स्त्रियांचा प्रवास चित्रपटातून दाखवला गेलाय.
 
“बहुतांश वेळा महिलांना एकमेकांंविरोधातच उभा केलं गेलेलं पाहायला मिळतं‌. हे फक्त चित्रपटापुरतंच नव्हे तर आपल्या समाजतही दिसून येतं. आपल्या समाजाची रचनाच स्त्रिया एकमेकांविरोधात असतात असं समजून केली गेलेली आहे, असंही त्या म्हणाल्या.
 
"हे अतिशय दुर्दैवी म्हणावं लागेल. पण माझ्यासाठी मैत्री हे अतिशय सुंदर आणि महत्त्वाचं नातं आहे. एकमेकांप्रती प्रेम, सहानुभूती, सामावेशकता निर्माण करून ही मैत्री स्त्रियांना एकजूट करू शकते,’’ असं मत पायलनं व्यक्त केलं.
 
समारोहात पुरस्कारासाठी घोषणा झाल्यानंतर पायल कपाडिया चित्रपटातील तिन्ही अभिनेत्रींना आग्रहाने आपल्यासोबत मंचावर घेऊन गेल्या.
 
“या अभिनेत्रींशिवाय चित्रपट बनूच शकला नसता. या माझ्या तिन्ही मैत्रिणींनी मला आणि या चित्रपटाला इतकं सगळं दिलंय. त्यामुळं हा आम्हा चौघींचा चित्रपट आहे,” असं मंचावर गेल्यानंतर भावनिक होत पायल म्हणाल्या.
 
“मी अजूनही प्रचंड भारावलेली आहे. त्यामुळे भाषण म्हणून वाचून दाखवायला मी काही लिहून आलंय.”
 
पायलचा प्रवास
मुंबईत जन्मलेल्या पायल कपाडिया ही प्रसिद्ध कलाकार नलिनी मलानी यांची मुलगी आहे.
 
आंध्र प्रदेशातील ऋषी व्हॅली शाळेतून पायलनं आपलं शालेय शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मुंबईतील सेंट झेवियर महाविद्यालयातून अर्थशास्त्राची पदवी घेतली. सोफिया महाविद्यालयातून एक वर्षांचं पदव्युत्तर शिक्षणही त्यांनी पूर्ण केलेलं आहे.
 
चित्रपटाची असणारी प्रचंड आवड त्यांना पुण्यात एफटीआयपर्यंत घेऊन आली. एफटीआयमधून त्यांनी चित्रपट निर्मितीचं रितसर प्रशिक्षण घेतलं.
 
या आधी 2021 साली ‘अ नाईट ऑफ नोईंन नथिंग’ या पायलच्या पहिल्या माहितीपटानं कान चित्रपट महोत्सवात गोल्डन आय पुरस्कार जिंकला होता. हा माहितीपट पुण्यातील एफटीआयमध्येच 2015 साली विद्यार्थ्यांनी केलेल्या विरोध प्रदर्शनावर आधारित होता.
 
याव्यतिरिक्त आफ्टरनून क्लाऊड्स, द लास्ट मंगो, बिफोर द मान्सून आणि व्हॉट इज धिस समर सेईंग हे चित्रपट पायल कपाडियांनी बनवलेले आहेत.
 
2015 च्या विरोध प्रदर्शनाचा चेहरा
फिल्म ॲन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्या विद्यार्थ्यांनी 2015 साली अभिनेते गजेंद्र चौहान यांची FTIIच्या चेअरमनपदी नियुक्ती केल्यानंतर तेथील विद्यार्थ्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन पुकारलं होतं.
 
आंदोलन झालं तेव्हा पायल FTIIमध्ये शिक्षण घेत होत्या. आंदोलनात त्या स्वतः सामील झाल्या होत्या. त्याबद्दल प्रशासनानं त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईसुद्धा केली होती.
 
तब्बल 4 महिने सुरू असलेल्या या विद्यार्थी आंदोलनाचा पायल या प्रमुख चेहरा बनल्या होत्या. संस्थेकडून केलेल्या कारवाई अंतर्गत नंतर पायल यांची शिष्यवृत्तीही थांबवण्यात आली होती.
 
आंदोलनादरम्यान पायल म्हणाल्या होत्या की "या संपासाठी विद्यार्थांनाच जबाबदार धरणं साफ चुकीचं आहे. आम्ही काय मजा मस्ती करण्यासाठी म्हणून संप पुकारलेला नाही. आंदोलन करण्याआधी आंदोलनकर्ते फार त्रासातून गेलेले असतात. आंदोलनासाठी प्रचंड मेहनत आणि तेवढीच मजबूत इच्छाशक्ती सुद्धा लागते.
 
"या सरकारनं एफटीआयचा कारभार हाकताना बऱ्याच चुका केलेल्या आहेत. एकतर जे या क्षेत्रातले तज्ज्ञ आणि होतकरू लोक आहेत त्यांच्याऐवजी सरकारी बाबूंच्या हाती सरकारनं संस्थेचा कारभार सोपवलाय. या सरकारी बाबूंना चित्रपटाचं शून्य ज्ञान आहे. अशा अपात्र लोकांच्या हातात संस्था आल्यामुळं आम्हा विद्यार्थ्यांचं फार नुकसान होत आहे.”
 
विशेष म्हणजे “या संस्थेचे विद्यार्थी पुढे जाऊन असे चित्रपट बनवतात जे आंतरराष्ट्रीय स्तरावर कलाक्षेत्रात ठसा उमटवून भारताचाच नावलौकिक वाढवतात. त्यामुळं न्याय्य मागण्या करणाऱ्या विद्यार्थ्यांवरच केली जाणारी ही कारवाई चुकीची आहे,” असंही स्पष्ट मत त्यावेळी पायलनी नोंदवलं होतं.
 
2022 साली त्यांनी या आंदोलनावरील माहितीपट प्रदर्शित केला होता. त्याची देखील चर्चा झाली होती.
 
बॉलीवूडमधून कौतुकाचा वर्षाव
पायल यांनी कानमध्ये मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाची चर्चा आणि गुणगान बॉलीवूडमध्ये होताना पाहायला मिळतंय.
 
रिचा चढ्ढानं या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव केल्याचं पाहायला मिळालं.
“ऐतिहासिक. ही बातमी ऐकून मला खूप आनंद झालाय. पायल कपाडिया, रणबीर दास, कानी कुसरूती, दिव्या प्रभा, ह्रिदु हारून, छाया कदम आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं मनःपूर्वक अभिनंदन.
 
एकतर स्वतंत्र चित्रपट बनवणं हीच मूळात फार अवघड गोष्ट आहे. त्यात सध्याच्या काळात अशा स्वतंत्र व समांतर चित्रपटांची मुस्कटदाबी आणखी जोरात सुरू आहे. इतक्या सगळ्या अडथळ्यांवर मात करून ग्रांपी पुररस्कार जिंकणं हे खरंच अद्भूत आहे,” अशा शब्दांत अभिनेत्री रिचा चढ्ढानं आपला आनंद व्यक्त केला.
 
हा चित्रपट बनवणं हे मोठं आव्हान होतं, असं पायल म्हणाल्या.
 
"मी आयुष्याची तब्बल पाच वर्ष यात खर्ची घातली आहेत. चित्रपटाचं निर्मितीमूल्य तसं पाहता अगदीच कमी आहे. पण मला मात्र पूर्ण विश्वास होता की, कसाबसा का होईना माझा हा चित्रपट कानला पोहचेल. चित्रपट जेव्हा कानमध्ये पोहोचला आणि त्याला पुरस्कारासाठी नामांकन मिळालं तेव्हा मला फार हायसं वाटलं. कारण कानमध्ये जो चित्रपट पोचतो त्याची चर्चा जगभरात होते,’’ असं पायल चित्रपटाबाबत बोलताना म्हणाल्या.
 
Published By- Priya Dixit