सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Modified: सोमवार, 20 जून 2022 (20:19 IST)

‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ची नवीन दयाबेन कोण असणार?

वर्षानुवर्ष सतत लोकप्रियतेच्या शिखरावर असलेली 'तारक मेहता का उल्टा चश्मा' ही हिंदी मालिका गेल्या 12 वर्षांपासून सुरू आहे.
 
या मालिकेत होणाऱ्या छोट्यातल्या छोटा बदलाचीही प्रेक्षकांना मोठी उत्सुकता असते. गेल्या काही दिवसात ही मालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. या मालिकेच्या निर्मात्यांना मोठा धक्का बसल्याचं बोललं जात आहे. याचं कारण म्हणजे मालिकेतील प्रमुख पात्र असलेले जेठालाल यांचे परम मित्र तारक मेहता ऊर्फ शैलेश लोढा यांनी या मालिकेला रामराम ठोकल्याची चर्चा आहे.
 
निर्मात्यांनी मालिकेत मोठे बदल करण्याची घोषणा केली आहे. दयाबेनच्या पुनरागमनासोबतच मालिकेत काही नवीन चेहऱ्यांचा समावेश करण्यात येईल, असं मालिकेचे निर्माते असित मोदी यांनी सांगितलं आहे. इतकंच नाही तर गोकुलधाम सोसायटीसोबतच गडा इलेक्ट्रॉनिक्स या जेठालाल यांच्या दुकानाचंही रंगरूप पालटणार आहे.
 
गडा इलेक्ट्रॉनिक्स नव्या रुपात
मालिकेत मुख्य पात्र असलेले जेठालाल गडा एक व्यावसायिक आहेत. त्यांचं 'गडा इलेक्ट्रॉनिक्स' नावाचं इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंसेसचं दुकान आहे. नट्टू काका आणि बाघा या दुकानातले कर्मचारी आहेत. जवळपास प्रत्येक एपिसोडमध्ये हे दुकान दिसतं.
 
प्रत्यक्षात हे दुकान मुंबईतल्या खार भागात आहे. खऱ्या आयुष्यात शेखर गडियार यांचं हे दुकान आहे. मात्र, मालिकेच्या येणाऱ्या एपिसोड्समध्ये आता हे दुकान दिसणार नाही. कोरोना काळात अनेकांप्रमाणेच या दुकानालाही अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागला.
 
मालिकेचे निर्मात असित मोदी बीबीसीशी बोलताना म्हणाले, "आम्ही जिथे शूटिंग करायचो तिथे आधी खूप अडचणी यायच्या. कोव्हिडचा काळ होता आणि तो रहिवासी भाग होता."
 
"कोव्हिडच्या अनेक केसेस होत्या. शिवाय, आम्ही शूट करायचो तेव्हा स्थानिक रहिवाशांमध्ये एक प्रकारची भीती असायची. रस्त्यावर शूटिंग करणं शक्य होत नव्हतं. त्यामुळे एक नवा सेट तयार करावा, असा आमचा विचार सुरू होता."
 
"आता आम्ही फिल्म सिटीच्या आत तारक मेहताच्या सेटवरच दुकानाचा सेट उभारला आहे. त्यामुळे आता कुठल्याही अडथळ्यांविना शूटिंग करता येणार आहे. लिखाणातही प्रेक्षकांना रुचेल, आवडेल, असं काहीतरी नवीन देण्याचा आमचा प्रयत्न आहे."
 
दिशा वकानी याच पुन्हा दयाबेनच्या भूमिकेत दिसतील का?, असा प्रश्न प्रेक्षकांना पडला आहे.
 
या प्रश्नावर असित मोदी म्हणतात, "जुन्याच दयाबेन पुन्हा दिसाव्या, अशीच आमचीही इच्छा आहे. पण, आता त्यांचं लग्न झालं आहे. त्यांच्यावर कौटुंबिक जबाबदारी आली आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे त्यांना मुलगा झाला आहे. त्यांना आधी एक मुलगी होती आता मुलगा झाला आहे."
 
"कौटुंबिक जबाबदाऱ्यांमुळे त्यांना मालिकेत पुन्हा काम करणं कदाचित शक्य झालं नाही तर आम्ही नवीन दयाबेन शोधू. मी तुम्हाला आश्वस्त करू इच्छितो की मी आणि माझी टीम ज्यांनाही शोधेल ती तुम्हाला नक्कीच आवडेल. निखळ मनोरंजन देण्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल."
 
शैलेश लोढांचा मालिकेला रामराम
असित मोदी सांगतात, "मालिकेत कुठलाही नवीन चेहरा आला, मग ते सोडीभाई असो, सोनू असो किंवा हाथीभाई सगळे खूप मेहनत करतात. जुन्या लोकांच्या जागी जे नवीन येतात, त्यांनाही भरपूर प्रेम द्या, असं माझं म्हणणं आहे."
 
"जे सोडून गेले त्यांनी परत यावं, अशी आमचीही इच्छा असते. कदाचित त्यांच्या काही मर्यादा असतील, काही अपरिहार्य कारणं असतील. माझं प्रेक्षकांना एवढचं म्हणणं आहे की जो कुणी नवीन येईल त्याला भरपूर प्रेम द्या. ते तुमचं नक्कीच मनोरंजन करतील, इतकं आश्वासन मी देऊ शकतो."
 
नट्टू काका कायम स्मरणात राहतील
मालिकेत नट्टू काका ही एक महत्त्वाची भूमिका साकारणारे कलाकार घनश्याम यांचं काही महिन्यांपूर्वी कॅन्सरने निधन झालं.
 
त्यांच्याविषयी बीबीसीशी बोलताना असित मोदी सांगतात, "आम्हाला नट्टू काकांची खूप आठवण आली. सीन शूट करतानाही आम्ही त्यांना खूप मिस केलं. ते मला कायम म्हणत, 'असित भाई हे दुकान खूप दूर आहे. सेटच्या आसपासच दुकान तयार केलं तर आम्हा सगळ्यांनाच सोयीच होईल.' मात्र, तेव्हा आम्ही असा काही विचार केला नव्हता."
 
"कदाचित या नवीन दुकानात शूट करणं, त्यांच्या नशिबात नसेल, एवढंच बोलून आम्ही एकमेकांचं सांत्वन करत होतो. आज ते आमच्यात नाही. पण, जिथे कुठे असतील तिथून आमचं नवीन दुकान बघून त्यांनाही आनंद झाला असेल आणि ते आम्हाला आशीर्वाद देत असतील. आणि मालिकेत लवकरच नवे नट्टू काकाही प्रेक्षकांच्या भेटीला येतील."
 
एकच पात्र करताना कंटाळा येत नाही का?
दिलीप जोशी यांना जेठालाल गडा ही भूमिका करताना आता 12 वर्षांहून जास्त काळ लोटला आहे. इतकी वर्षं एकच पात्र रंगवताना कंटाळा येत नाही का?
 
यावर दिलीप जोशी म्हणतात, "अजिबात नाही. उलट एक कलाकार म्हणून यातच तर मजा आहे. मला याआधीही हे विचारण्यात आलं होतं की तुम्ही सतत हीच भूमिका करत आहात. इतक्या वर्षात तुम्हाला कंटाळा नाही का आला?"
 
 
"हे रोजच एक नवं आव्हान असतं. तीच भूमिका, तोच सेट, तेच सहकलाकार म्हणजे तीच भूमिका. अशावेळी त्याच भूमिकेत तुम्ही काय नवं करू शकता. ईश्वराच्या कृपेने दरवेळी प्रत्येक सीनमध्ये काही तरी नवं मिळतंच. तेव्हा खूप आनंद होतो."
 
"हे एक आव्हान आहे. तुम्ही जेव्हा काहीतरी नवा विचार करता, काहीतरी नवं करता तेव्हा एक कलाकार म्हणून काहीतरी चांगलं केलं, मजा आली, असं समाधान मिळतं. ईश्वराची कृपा आहे की तो नवनवे विचार देतोय आणि आम्ही रोज ते करतोय. कदाचित त्यामुळेच आमच्या प्रेक्षेकांनाही मालिका अजूनही फ्रेश वाटतेय."
 
गोकुलधाम म्हणजे मिनी इंडिया
 
12 वर्षांपासून मालिका सुरू आहे. या मालिकेत असं काय आहे, ज्यामुळे ती अजूनही प्रेक्षकांना आवडते. यावर दिलीप जोशी म्हणतात, "मला वाटतं यातल्या पात्रांची निरागसता हेच मालिकेच्या लोकप्रियतेचं कारण आहे. आमच्या गुजरातीमधले ह्युमरिस्ट तारक भाई मेहता यांनी अतिशय उत्तम पद्धतीने ही पात्र रंगवली आहेत. प्रत्येक गटातल्या प्रेक्षकांना ती आवडतात. टप्पूसेना लहान होती तेव्हा लहान मुलांना आवडायची. वयोवृद्धांसाठी बाबूजी आहेत आणि मधल्या वयोगटातल्या प्रेक्षकांसाठी जेठालाल आणि इतर पात्रं आहेत."
 
"महिलावर्गासाठी मालिकेतली स्त्री पात्र आहेत. गोकुलधाममध्ये प्रत्येक प्रांतातलं एक कुटुंब आहे. तेसुद्धा एक वेगळेपण आहे. त्याला प्रेमाने मिनी इंडिया म्हणतात. सांगायचा उद्देश हा की ही मालिका प्रत्येक वयोगटातल्या प्रेक्षकासाठी आहे आणि म्हणूनच मालिकेची क्रिएटिव्हिटी बघता ती प्रेक्षकांना आवडते."
 
सूत्रांच्या माहितीनुसार दयाबेनची भूमिका आता एक नवीन कलाकार सादर करेल. 90 च्या दशकातील लोकप्रिय मालिका 'हम पांच'मध्ये स्विटी ही भूमिका साकारणाऱ्या राखी विजन नवीन दयाबेन असू शकतात.