1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : मंगळवार, 12 ऑगस्ट 2025 (16:57 IST)

सोनेरी इतिहासात उमटलेली: वाघनखं

Novel Vaghankha
मी रोहन बेनोडेकर यांची ही कादंबरी ‘वाघनखं’ तब्बल दिड वर्षांपूर्वी घेतली होती पण अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर त्यावेळी मला ही कादंबरी वाचण्याची इच्छा नव्हती कारण नुकतीच मी रणजित देसाई यांची ‘लक्ष्यवेध’ वाचली होती आणि मला लगेच ही कादंबरी वाचून कुठलीही तुलना करायची नव्हती.
 
काही कथा अजरामर असतात. कित्येकदा वाचूनही नवीन वाटतात. उदाहरणार्थ रामायण! प्राचीन काळापासून कितीतरी साहित्यिकांनी वेगवेगळ्या स्वरूपात रामायण लिहिले आहे. कथा तीच पण सांगायची पद्धत व शैली वेगवेगळी. रामकथा कितीही वेळा वाचली, ऐकली तरी नवीनच वाटते.तसंच मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या गोष्टींसाठी पण वाटतं. प्रत्येक वेळी काही तरी नवीन उमगतं, नवीन समजतं.

‘वाघनखं’ वाचूनही मला हीच प्रचीती आली. एकदा सुरुवात केली आणि वाचतच गेले. तेच जावळी खोरे, प्रतापगड, वाईत उतरलेला धिप्पाड अफजलखान, छत्रपती शिवाजी महाराजांची शक्ती आणि युक्ती…पण तरी खूप काही नवीन होते. लेखकाने इतिहासाचा प्रचंड अभ्यास करून ही कांदबरी लिहीली आहे, हे प्रत्येक पानावर जाणवत होते. 
अफझलखान वधाच्या आधीची राजनैतिक परिस्थिती, त्यापूर्वी घडलेल्या महत्त्वपूर्ण घटना फारच रोचक पद्धतीने मांडल्या आहेत. ‘अफझलखानाचा वध’ ही निव्वळ घटना नाही तर या दरम्यान बरीच राजकीय खलबते शिजत होती. आदिलशाही, निजामशाही आणि मोगलाई या तीनही शक्ती एकमेकांना झुंज देत होत्या. आणि त्यातच सुरू होती स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची चळवळ. 
 
कादंबरीत लेखकाने संपूर्ण इतिहास फारच प्रभावीपणे मांडला आहे.वाचताना घटना जशास तशा डोळ्यासमोर उभ्या राहिल्या पाहिजे, हे एका कादंबरीचे यश असते‌ आणि लेखक हे साध्य करण्यात यशस्वी झाला आहे. संवाद शैली उत्तम आहे. छत्रपती शिवाजी महाराज, अफझलखान, पंतोजी, मातोश्री, सईबाई, जीवा महाला, संभाजी कावजी, प्रतापराव मोरे हे सर्व पात्र आपली छाप सोडून जातात. त्यांचे हावभाव, चालण्या बोलण्याची पद्धत अशी प्रभावी मांडली आहे की ते पात्र डोळ्यापुढे उभे राहतात.शिवाय वाई, जावळी, प्रतापगड, राजगड या क्षेत्रांचे नैसर्गिक व‌ राजनैतिक दृष्टीने वर्णन पण अतिशय सुंदर केले आहे.‌ कादंबरी कुठे ही रेंगाळत नाही, एका प्रवाहात पुढे वाढते त्यामुळे वाचकांना खिळवून ठेवण्याची ताकद या कादंबरीत आहे. 
 
अफझलखान वध ही आपल्या इतिहासातील एक अतिशय महत्त्वपूर्ण व अभिमानास्पद घटना आहे. एका तरुण लेखकाकडून एवढा तगडा अभ्यास करून असे दर्जेदार साहित्य जेव्हा वाचायला मिळते तेव्हा अभिमानाने ऊर भरून येतो. आजच्या नव्या पिढीसाठी रोहन बेनोडेकरने एक आदर्श ठेवला आहे.
पुस्तक स्नेहल प्रकाशन पुणे तर्फे प्रकाशित केले आहे. एमेजॉन, शॉपिजन आणि इतर मंचावर उपलब्ध आहे. वाचकांनी आवर्जून वाचावे आणि संग्रही ठेवावे अशी कादंबरी. लेखक रोहन बेनोडेकर यांच्याकडून सातत्याने असे दर्जेदार साहित्य घडो, मनापासून शुभेच्छा!
जय भवानी जय शिवाजी!