सोमवार, 23 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी पुस्तक परिचय
Written By
Last Updated : शनिवार, 11 डिसेंबर 2021 (14:00 IST)

श्रावणधारा प्रातिनिधिक : कथासंग्रह

शाँपिजन कथा स्पर्धेतील निवडक कथांचा संग्रह म्हणजे शाँपिजन प्रकाशन कडून आक्टो. २०२१ या वर्षी प्रकाशित झालेला कथासंग्रह श्रावणधारा प्रातिनिधिक कथासंग्रह आहे. या कथासंग्रहाचे संकलन व संपादन ऋचा कर्पे यांनी केले आहे. कागदी नावा, दोरीवर बसलेले पक्षी असे सुरेख मुखपृष्ठ या संग्रहाचे आहे. शाँपिजन मुळे अनेक नवोदित कवी लेखकांना एक हक्काचे प्रकाशन मंच मिळाले आहे. शाँपिजनच्या मराठी विभाग प्रमुख स्वतः यामध्ये नेहमी सक्रीय सहभाग घेतात हे प्रेरणादायी आहे.
 
कथा म्हणजे मनोवैज्ञानिक ट्रीटमेंट ! लिहिणाऱ्या साठी पण आणि वाचणार्या साठी पण. एखादा कथा लेखक जेव्हा कथा लिहितो तेव्हा त्याच्या मनात दडलेल्या ...क्रोध, प्रेम, किळस, वात्सल्य, द्या इतर भावनांना व्यक्त होण्यासाठी एक वाट मोकळी होते. कथा जरी काल्पनिक असली तरी भावना मात्र खऱ्या असतात. ..!
 
सांगायचं तात्पर्य अस की आधुनिक समजला जाणारा मराठी वर्ग खरोखर विचारांनी पण आधुनिक झाला आहे. त्याची विचारसरणी बदलली आहे. समाजात बदल घडवून आणण्यासाठी तो तयार आहे, हे ह्या कथा वाचून सहज लक्षात आले. असे विचार प्रस्तावनेमध्ये ऋचा कर्पे यांनी मांडले आहे. जया गाडगे यांची कथा कागदी नावा यामध्ये एक मुलगी संयुक्ता, तिची आई आणि वडील तिला पावसापासून दूर ठेवण्यासाठी जीवापाड जपतात. मात्र तीच मुलगी तरुण वयात आल्यानंतर त्यांच्या विचारसरणीत बदल घडवून आणते हा जीवनानुभव खूप सुंदर रेखाटला आहे..
 
स्वतःच विणलेल्या अंधविश्वासा कोषात गुरफटून मी तुलाही जीवनाचा आनंद लुटू दिला नाही. याचे वाईट वाटते. “आई अग ही नैसर्गिक आपत्ती आहे. तुझा संबंध येतोच कुठे ? क्षमा कर मला पण तू पावसात जाऊ नको म्हणून ताकीद देऊनही मी फार्म हौस्वर मनसोक्त भिजले होते. आणि मला काहीही झाले नाही. [पृ.१५]
 
वरील माय लेकीच्या संवादातून पावसाचा, नात्यांचा एक वेगळा रंग बघायला मिळतो. विविध विषयांच्या विविध आशयांच्या कथेने हा संग्रह नटलेला आहे. श्रावण बरसला मनी या स्वाती दांडेकर यांच्या कथेत अन्यायग्रस्त पिडीत मुलीला देखील समाजाने व्यवस्थेने नवीन आयुष्य जगायची संधी दिली पाहिजे या भावनेने प्रेरित होऊन लेखिका भावप्रधान प्रभावी संवाद पात्रांच्या तोंडून वाचकांसमोर सादर करतात.
 
“नियम म्हणजे काय सर ? कोण ठरवतात हे, हा पांढरपेशा समाजच ना ? का नाही मग कंपनी एका स्री अधिकारीला उशीर झाल्यास घरी सुखरूप घरी सोडायची व्यवस्था करत.इथे काही नियम नाही ?” “सर तो तिचा भूतकाळ होता, स्वच्छा नाही दुर्दैवाने हे कोणासोबत ही होऊ शकते मी आपले आप्तेष्ट या तुमची बायको वा मुलगी सुद्धा, तर मग बायकोला सोडून द्याल की विष द्याल मुलीला. सुधारणेच्या गोष्टी करने सोपे आहे पण मदत कठीण. पुरुष स्रीला उपभोगाची वस्तू समजतो हक्काची असो वा बळजबरीची आपण बोंब ठोकतो. भृणहत्या नको मुली लक्ष्मीची रूप आहे, सपशेल खोटे आहे हे फक्त मेनका या अप्सरा हवी आहे सर मला नाही वाटत की मी काही चुकीचे बोलले आहे. अंतिम निर्णय आपलाच आहे माझा नाही.” [पृ.२१]
 
वरील संवादातून अन्यायग्रस्त स्री देखील संधी दिल्यास जगू शकते हा प्रेरणादायी विचार वाचकांसमोर ठेवला आहे. तान्हापोळा या कथेत अनघा जगदळे चिन्या या मुलाचा बैल सजविण्याचा अनुभव व्यक्त केला आहे. श्रावणरंग या कथेत डॉ. श्रीनिवास आठल्ये यांनी गोदाक्का लेकाला कसे घडवितात या विषयी वर्णन केले आहे. श्रावणाचे वेगवेगळे रंग वेगवेगळया कथेतून वाचण्यास मिळतात. नाती या कथेत स्मिता भलमे यांनी एका तृतीयपंथी मुलाच्या आयुष्यातील बदल उत्तम रेखाटला आहे. पूर्वी जो समाज अश्विनीला झिडकारत होता, तोच समाज तिच्यातील गुणवत्तेमुळे तिला मानसन्मान देऊ लागला. हे वैश्विक सत्य या कथेत मांडले आहे.
 
झाले मोकळे आकाश या कथेत लेखिका अक्षता देशपांडे यांनी बाप आणि लेकीचे नाते भावस्पर्शी पणे रेखाटले आहे. कोसंबी या कथेत कथाकार शोभा खानविलकर यांनी तृतीयपंथीय व्यक्ती देखील समाजाचा एक भाग आहे ही मानसिकता स्वीकार करायला हवी हा विचार समोर ठेवतात. 
 
अगदी जवळच्या माणसाशी बोलाव तस ती बोलाव लागली. “ताई तुम्हाला लोकांनाच आजकाल काम धंदा नाही मग आम्हाला कोण देईल ? आमच्या शरीराच्या विकृतीची लोक खिल्ली उडवतात, आणि तरीही त्यांच्या मनोरंजनाला आम्ही लागतो. आम्ही बाई नाही पुरुषही नाही पण एक माणूस म्हणून सुद्धा साध कोणी बघत नाही. पण आम्हाला सुद्धा पोट आहेच ना ! तुम्हाला एक विचारते उद्यापासून मी येऊ का तुमच्या घरी कामाला ? मला येऊ द्याल ?” [पृ.४९]
 
विकृत जीवन जगणारे माणस देखील वेळ प्रसंगी मदतीसाठी धावून येतात याचे वास्तव दर्शक वर्णन कथाकाराने केले आहे. रेनी डेज या कथेत कथाकार प्रांजली लेले कुत्र्याच्या पिल्लासोबत असणारा लळा आणि अस्वस्थ होणारा चिंटू याचे भावस्पर्शी वर्णन केले आहे. श्रावणाचे विविध रंग नात्यात देखील दिसून येतात असे वाचकाला सहज वाटू लागते. मंतरलेली रात्र ही भयकथा कथाकार प्रकाश फासाटे यांनी उत्तम संवादाने कुशल वातावरण निर्मितीचे आशयपूर्ण शब्द घेऊन रेखाटली आहे. नरबळी कायद्याने गुन्हा असून देखील लोक गुन्हेगारी प्रवृत्तीने जगतात हे धक्कादायक वर्णन या कथेमध्ये आहे.
 
गुन्हेगार कितीही हुशार असला तरी पुरावा सोडतोच त्या रात्री जेव्हा पूजा करतांना अगरबत्ती लावण्यासाठी जवळ कागद तेव्हा घाई घाईत आदिनाथाने खिशातील व्हिजीटीग कार्ड चा वापर केला होता आणि तोच पुरावा तांच्या हातातील बेड्या बनला. [पृ.७१]
 
मीनल विद्धांस यांची कथा पाऊस यामध्ये भारत बंदिकालातील चित्र रेखाटले आहे. तो पाऊस या कथेत भारती भाईक यांनी निनाद आणि सावरीची कथा नात्याच्या दुराव्याचे चित्र रेखाटणारी ठरते. नागेश शेवाळकर यांनी माझी हिरकणी ग या कथेत पुराचे वर्णन केले आहे जिद्द आणि साहस या बळावर एक शक्ती शरीरात संचारते हे सत्य तत्व निसर्गाचे वर्णन केले आहे.संजय येरणे यांनी लिहिलेली ग्रामीण बोली भाषेतील कथा इंदा देखील सुरेख आहे. पर्यावरण रक्षणाची सुंदर वास्तव कथा एका वडाची दुसरी गोष्ट यामध्ये डॉ. समृद्धी रायबागकर यांनी उत्तम साकारली आहे. स्वप्न या कथेत चन्द्रशेखर कासार एका वृद्ध माणसाच्या आयुष्याची कथा उत्तम रीतीने दर्शवितात. कथासंग्रह प्रेरणादायी आहे. संपादकाला  अनेक शुभेच्छा आणि मराठी साहियात या सुंदर प्रातिनिधिक कथासंग्रहाचे स्वागत करते.

- प्रज्ञा बागुल