शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. बुद्ध जयंती
Written By
Last Updated : शुक्रवार, 20 मे 2016 (14:39 IST)

मानवमुक्तीदाते गौतमबुध्द

लहानपणापासूनच सिध्दार्थ गौतम बुध्द विचारी होते. एकांतात बसून ते जगातील चांगल्या व वाईट गोष्टींबद्दल विचार करीत असत. ते नेहमी मानवाला होणार्‍या व्याधी, दु:ख, मरण याविषयी विचार करत. 
 
मनुष्य मनुष्याचे शोषण का करतो? समाजामध्ये विषमता का आहे? या विचारातून मनुष्याची दयनीय अवस्था बघून सिध्दार्थाचे मन द्रवीत झाले. वयाच्या 28 व्या वर्षी सर्व ऐश्वर्य सोडून ते मानवाच्या मुक्तीचा मार्ग शोधण्यासाठी घराबाहेर पडले. 
 
निरंजना नदीच्या किनारी एका पिंपळाच्या वृक्षाखाली त्यांनी सतत सहा वर्षे घोर तपश्चर्या केली. इ. स. पूर्व 528 मध्ये वयाच्या 35 व्या   वर्षी वैशाख पौर्णिमेला बौध्द गया येथे पिंपळाच्या वृक्षखाली सिध्दार्थ गौतमाला बुध्दत्व प्राप्त झाले. ते बुध्द झाले. 
 
बुध्दाच्या मते दु:खाचे मूळ कारण तृष्णा हेच आहे. तृष्णा म्हणजे इच्छांचे विकृत स्वरूप. तृष्णेमुळे राग व आसक्ती वाढते. तृष्णेच्या नाशातच खरे सुख दडलेले आहे. भगवान बुध्दाने पंचशील तत्वांच्या आचरणावर भर दिला. हिंसा करू नये, चोरी, कामवासना यापासून दूर रहावे, खोटे न बोलणे, वाईट पदार्थाचे सेवन न करणे हेच सदाचरण आहे. यालाच पंचशील असे म्हटले जाते. पंचशीलाचे आचरण केल्यास  मनुषला दु:खापासून मुक्ती मिळविता येते असे ते सांगत. 
 
बुध्दाने समानतेचा उपदेश दिला आणि तो अमलातही आणला. स्त्रियांना धर्म दीक्षेचा अधिकार देणारा बौध्द धम्म हा मानवी इतिहासातील पहिला धर्म होय. भारतीय स्त्रीमुक्तीची बैठक भगवान बुध्दाच्या समतेच्या तत्वज्ञानाच्या पायावर उभी आहे. 
 
बुध्दाच्या मते निसर्ग भेदभाव करीत नाही. आकाश सर्वासाठी एक आहे. पाणी सर्व तहानलेल्यांची तहान भागवते. पृथ्वी भेदभाव करीत नाही. मग माणसा माणसात भेदभाव कशासाठी? 
 
बुध्दांनी स्वत:ला देवाचा प्रेषित असलचा किंवा देवदूत असलचा कधी दावा केला नाही. असंख्य मनुष्यांपैकी ते एक आहेत, असे ते म्हणत. बुध्दाचा धर्म हा शील आणि सदाचरणाचा धर्म आहे. बुध्दाची शिकवण सर्व जगात वंदनीय आहे. आज जगाला बुध्दाच्या विचारांची गरज आहे. म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा अभ्यास करून बौध्द धर्माची दीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. 
 
तथागत गौतम बुध्द खर्‍या अर्थाने मानव जातीच्या कल्याणाचे मार्गदाते आहेत. जगाला शांतीचा संदेश देणार्‍या भगवान गौतम बुध्दांना जंतीनिमित्त आदरपूर्वक वंदन.
 
अॅड. जयप्रकाश भंडारे