शुक्रवार, 15 नोव्हेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. करिअर
  3. करिअर मार्गदर्शन
Written By

काय आहे 'पेमेंट बँक'?

नागरिकांना बचतीची सवय लागावी यासाठी त्यांच्यापर्यंत बँकेची सुविधा पोहोचवणं गरजेचं आहे. मात्र आजही भारताचा साठ टक्के ग्रामीण भाग बँकेच्या सुविधेपासून दूर आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना विद्यार्थ्यांना या विषयाचा अभ्यास करावा लागतो. यूपीएससीच्या सामान्य अध्ययन पेपर नं. 3 मध्ये या संबंधी दहा ते साडेबारा गुणांसाठी प्रश्न विचारले जाऊ शकतात.

'पेमेंट बँक' ही एक एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. या संकल्पनेत बँकिंग क्षेत्राबाहेर असणार्‍या व्यक्ती अथवा संस्थांना बँकांशी जोडण्याचा प्रयत्न होत आहे. 1969 मध्ये बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं तेव्हापासून सर्व नागरिकांना बँकिंग प्रणालीमध्ये समावून घेण्याचं धोरण होतं मात्र, यात फारशी प्रगती झाली नाही. आजही ग्रामीण भागातील निम्नवर्गीय बँकांमार्फत व्यवहार करण्याबाबत अनभिज्ञ दिसतात.

ग्रामीण भागातील घरगुती व्यावसायिकांना, शेती कामगारांना या सुविधेची जाण नसते. ही संकल्पना बँकेची सुविधा गावातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहोचवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवते. हे साधलं तर समाजातील प्रत्येक घटक आपल्या आर्थिक गरजांसाठी बँकांची मदत घेतील. पर्यायाने सावकारांच्या जोखडातून बाहेर पडतील आणि आर्थिक शोषण थांबेल. अर्थात यासाठी पायाभूत सोयी सुविधांची गरज विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. उदा. ग्रामीण भागामध्ये वाहतुकीची समस्या असते. त्याचप्रमाणे वाड्या वस्त्या जवळ नसल्याने बँकेपर्यंत कसं पोहोचायचं हा देखील कळीचा मुद्दा ठरतो. म्हणूनच ग्रामीण भागामध्ये मोबाईल बँकिंगची गरज विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी. ग्रामीण भागामध्ये शेतमजूरांना रोजंदारीवर पैसे मिळतात. हे पैसे वेळीच गुंतवले गेले नाही तर खर्च होऊन जातात. मोबाईल  बँकिंगची सुविधा उपलब्ध झाल्यास हा दोष दूर होईल यावरदेखील विद्यार्थ्यांनी विचार करावा.