गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:39 IST)

शिवभारत अध्याय बाविसावा

कविश्रेष्ठ म्हणाला :-
दूताप्रमाणें वेगानें जाणार्‍या त्या दुंदुभिध्वनीनें शिवरायाच्या सैनिकांना लगेच सूचना दिली. ॥१॥
कमळोजी सोळंखे ( सौलक्षिकः ), येसाजी कंक, तानाजी मालुसरे, कोंडाजी वरखल आणि रामजी पांगारकर ( पांगारिकः ) हे पांच अग्नींप्रमाणें पांच तेजस्वी वीर एकेक हजार पायदळासह, तसाच पराक्रमानें प्रख्यात व पांच हजार पायदळासह असलेला नारायण ब्राह्मण अशा ह्या सर्वच महायोद्ध्यांनीं वेगानें येऊन अरण्याच्या मध्यभागीं असलेल्या, पुष्कळ योद्ध्यांची गर्दी असलेल्या शत्रुसेनेस चोहोंकडून घेरलें. ॥२॥३॥४॥५॥
इतक्यांत शत्रूंनासुद्धां “ अफजलखान मारला गेला ” हीच गोष्ट कडाक्यानें वाजणार्‍या दुंदुभीच्या योगें एकदम कळून ते सज्ज होत असतां त्यांना पर्वताच्या बाजूवरून आलेलें अभिमानी, खवळलेलं व हल्ला करणारें तें पायदळ चोहोंकडे दिसलें. ॥६॥७॥
मदरहित हत्ती, विषरहित सर्प, पगडीरहित मनुष्य, शिखररहित पर्वत, जलरहित मेघ, आणि धनहीन राजे यांप्रमाणें ते यवन अफजलखानाविणें त्यासमयीं शोभेनासे झाले. ॥८॥९॥
आकाश कोसळून पडावें त्याप्रमाणें बाप अफजलखान पडलेला ऐकून त्याचे तिघे पुत्र नष्टबुद्धि होत्साते तेथें गोंधळून गेले. ॥१०॥
प्रतिकूल वार्‍याच्या योगें समुद्रांत नौका फुटल्यामुळें तींतील लोक जसे जीविताची आशा सोडतात, तशी त्यांनीं त्या गहन अरण्यांत त्या समयईं जीविताची आशा सोडली ! ॥११॥
तेव्हां सैन्यामधील आपले सर्व सैनिक संकटांत सांपडल्यामुळें हतगर्व व हतबल होत्साते पळूं लागलेले पाहून, स्वामीच्या ठायीं भक्तिमान व युद्धामध्यें शक्तिमान, अतिशय क्रुद्ध, नाक वर चढलेला व तोंड फुरफुरणारा, विस्तीर्ण पशाप्रमाणें डोळे असलेला, हत्तीच्या सोंडेप्रमाणें भुज व भयंकर स्वर असलेला असा मुसेखान पठाण त्यांस थांबवून स्वतः बोलूं लागला. ॥१२॥१३॥१४॥
मुसेखान म्हणाला :-
स्वामिकार्य करण्याच्या इच्छेनें आपला प्राण कस्पटासमान मानून अफजलखान जरी मेला, तरी आम्ही सर्वच मेलों कीं काय ? ॥१५॥
चोहोंकडून पर्वतावरील मार्ग कोंडलेले आहेत; तेव्हां कोठें जाल ? अरे ! उभे रहा आणि सभोंवतीं असलेल्या शत्रूंस मारा. ॥१६॥
आपल्या धन्यास, मित्रास, किंवा सोबत्यास सोडून पळून जाऊन जे कोणी आपला प्राण वांचवितील त्यांच्या जिण्याला धिक्कार असो ! ॥१७॥
स्वामिकार्य न करितां आपलें रक्षण करणारा माणूस आपलें तोंड आपल्या लोकांस कसें दाखवूं शकेल ? ॥१८॥
अतिभयंकर, प्रलयकारक अशी तरवार हातीं धरून मी हें शत्रूचें सैन्य तडाख्यासरसें भुईस मिळविणार आहें. ॥१९॥
असें बोलून तो महाबाहु ( मुसेखान ) मोठ्या घोड्यावर चढून आपल्या सैन्यासह शिबिरांतून वेगानें बाहेर पडला. ॥२०॥
वायूप्रमाणें वेगवान्, बलवान् हसन व दुसरेहि सेनानायक ( सरदार ) आपआपल्या सैन्यासह त्याच्या मागून गेले. ॥२१॥
मधून मधून खडबडीत अशा अनेक विस्तीर्ण पाषाणांनी व्याप्त, घोड्यांच्या खुरांच्या आघातांनीं उडणार्‍या ठिणग्यांनीं पूर्ण, पाय घसरल्यामुळें किंवा अडखळल्यामुळें पडणार्‍या चपल लोकांची गर्दी असलेली, अशी ती भूमि त्यांच्या हालचालीनें हादरून गेली. ॥२२॥२३॥
तेव्हां शत्रुयोद्ध्यांस पाहून खवळलेल्या घोडेस्वारांनीं आपले घोडे खडकाळ रस्त्यांवरूनसुद्धां वेगानें पुढें धातले. ॥२४॥
नंतर अत्यंत क्रुद्ध व वेगवान मुसेखानानें आपला घोडा पुढें घालून शत्रुसैनिकांवर बानांचा मारा केला. ॥२५॥
हसन इत्यादि दुसर्‍याहि सर्व क्रुद्ध धनुर्धरांनीं समोर असलेल्या शत्रूंस बाणांनीं जर्जर केलें. ॥२६॥
त्यावेळीं त्यांच्या क्रोधयुक्त शब्दांनीं, घोड्यांच्या खिंकाळण्यांनीं, मोठ्या हत्तींनीं युद्धावेशानें केलेल्या मोठ्या प्रचंड चीत्कारांनीं, दांड्यांनीं तडातड वाजविलेल्या नगार्‍यांच्या तीव्र ध्वनींनीं, विविध वाद्यांच्या ऐत्भयंकर आवाजांनीं, त्याचप्रमाणें सभोंवतालून एकदम खवळून दर्‍यांमधून बाहेर पडलेले, तरस, अस्वल, जंगली पक्षी, वाघ, लांडगे, गेंडे, रानडुक्कर यांच्या गगनभेदी असंख्य कोलाहलांनीं अतिशय जोरानें भरून गेलेल्या त्या अति निबिड ( दुर्गम ) अरण्यानें प्रतिध्वनीच्या योगें मत्त शत्रुयोद्ध्यांना पुष्कळ धमकावलें. ॥२७॥२८॥२९॥३०॥३१॥
अत्यंत तीक्ष्ण बाणांनीं विद्ध झालेल्या पायदळांनींहि त्या युद्धांत अविंधांना तरवारींनीं भुईस मिळविलें. ॥३२॥
धावणार्‍या त्या पायदळांनीं घोडेस्वारांच्या घोड्यांचे तुकडे करून त्यांना जणूं काय स्पर्धेनें पायदळच बनविलें. ॥३३॥
शत्रूंच्या शस्त्रांचा प्रहार झाल्यामुळें रक्तानें लाल होत्साता खालीं पडून एकदम सूर्यलोकास गेला ( मृत्यु पावला ). ॥३४॥
कोणाच्या मांड्या भयंकर वीरानें ( वीर भीमानें ) फोडल्यामुळें तो एकदम भूमीवर पडून दुर्योधनाची दशा अनुभविता झाला. ॥३५॥
कोणा वीराचीं बाहुयुद्ध करणार्‍या शत्रूनें दोन शकलें केल्यामुळें तो जरासंधाप्रमाणें उलटापालटा होऊन पडला. ॥३६॥
तोफांतून सुटलेल्या गोळ्य़ांनीं छाती विद्ध झालेले कांहीं वीर धनुष्याची दोरी ( जीवा ) हातांत धरलेली असतांहि गतप्राण ( निर्जीव ) झाले. ॥३७॥
ढाल तरवार धारण करणाआ कोणी वीर नाना प्रकारचें कौशल्य दाखवून पराक्रमी वीरावर प्रहार करीत असतां विलक्षण शोभूं लागला. ॥३८॥
शिवाजीच्या पायदळरूपी मेघांतून भयंकर तरवारीरूपी विजा चोहोंकडून पडल्यामुळें यवन थरथरां कांपूं लागले. ॥३९॥
ज्यानें आपल्या योद्ध्यांच्या समोर स्वमुखानें बढाई मारली होती, त्या मुसेखानाचासुद्धां त्या शूरांनीं युद्धांत पराभव केला. ॥४०॥
मग घोडा नाश पावला, शस्त्रें गळालीं आणि मन घाबरलें अशी स्थिति होऊन त्या गर्विष्ठ मुसेखानानें युद्धांतून पाय काढला; याकुताचासुद्धां उद्धटपणा जिरविण्यांत आला तेव्हां त्यानेंहि पलायन केलें; मोठ्या भीतिमुळें हसन संकटामध्यें मग्न झाला; भयभीत झाल्यामुळें कोमल पायांचा अंकुशखान हा नष्टसामर्थ्य होऊन अनवाणीच पसार झाला; घाबरलेल्या दोघां भावांस सोडून, सैन्य टाकून देऊन अफजलखानाचा वडील मुलगा वेषांतर करून पळून गेला. ॥४१॥४२॥४३॥४४॥
नंतर आदिलशहाचें तें अफाट व नायकहीन सैन्य पळूं लागलें असत त्यास शिवाजीच्या सैनिकांनीं चोहोंकडून कोंडलें. ॥४५॥
“ शहाजीराजाचा भाऊ जो मी भोंसला त्या मजशीं युद्ध करा ” असें मंबाजी म्हणत असतां तो तेथेंच जन्मबंधापासून मुक्त ( ठार ) केला गेला. ॥४६॥
अत्यंत तीव्र पराक्रमामुळें सर्वांनाच अति दुःसह, सहसी, शोणाचा पुत्र ( शोणतनयः ), रागीट, राक्षसाप्रमाणें पराक्रमी, जोखडाप्रमाणें दीर्घ भुज असलेला, मानी, दृढ शरीराचा, जवान असा जो फरादखानाचा नातू रणदुल्ला तो पर्वतशिखरासारखें आपलें शिर नमवितांच शिवराजाच्या सैन्याच्या ताब्यांत जाऊन कैद झाला. ॥४७॥४८॥४९॥
अंबरखानाचा पुत्र, भयभीत अंबर निस्तेज होत्साता जीव वांचविण्याच्या इच्छेनें कवच, खङ्ग, ढाल, शक्ति आणि धनुष्य टाकून देऊन शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यात जाऊन कैद झाला. ॥५०॥५१॥
हत्तीप्रमाणें उन्मत्त अशा राजाची घाटगे हा शिवाजीच्या सैन्याच्या हातीं सांपडून कैद झाला. ॥५२॥
ज्यांना त्यांच्या वडील भावानें टाकलें ते अफजलखानाचे मुलगे शिवाजीच्या सैन्याच्या हातीं सांपडून कैद झाले. ॥५३॥
एकहजारी, दोनहजारी, तीनहजारी, पांचहजारी, सहाहजारी, सातहजारी असे दैत्यांसारखें आदिलशहाचे दुसरेहि पुष्कळ तेजस्वी सरदार ( सेनानायक ) बाण तोडले गेल्यामुळें शिवाजीच्या सैन्याच्या ताब्यांत जाऊन कैद झाले. ॥५४॥५५॥
पाडलेल्या, पडणार्‍या, पाडले जाणार्‍या व पळालेल्या वीरांच्यायोगें अतिभयंकर अशी ती युद्धभूमि वर्णनीय झाली. ॥५६॥
पाश, भाले, तरवारी, पट्टे, फरस ( परशु ), मुद्गर, परिघ, त्रिशूळ, तोमर ( रवीसारखें ), गदा, शक्ति, धनुष्यें, बाणांचे भाते, ढाली, चक्रें, सुर्‍या, कट्यारी, कवचें, शिरस्राणें, सोन्याचे कमरपट्टे, चामड्याचे हातमोजे, चामड्याचे पंजे, तोफा, दुंदुभ्यादि वाद्यें, पताका, ध्वज, बिरुदें, छत्र्या, इतस्ततः पडलेल्या चवर्‍या, छतें, कनाती, अनेक रंगी, अतिविस्तीर्ण अतिमूल्यवान असे अनेक रेशमी तंबू, तिवया, कळशा, हांदे, मद्याचे पेले, पिकदाण्या, चौरंग, चांदीसोन्याचे पलंग, इतस्ततः पडलेलीं नानाप्रकारचीं पुष्कळ वस्त्रें आणि त्या मोठ्या सैन्याचें हुसरेंहि सामान यांनीं व्याप्त अशा त्या रणभूमीस वासलेल्या तोंडांतून दांतांच्या कवळ्या स्पष्ट दिसणार्‍या, निश्चल नेत्राच्या, बोडक्या ( पगडिरहित ) मुंडक्यांच्या योगें - कोठें भीषण स्वरूप प्राप्त झालें होतें; रत्नांच्या आंगठ्या असलेल्या, कोमल बोटांच्या, खांद्यापासून तुटून पडलेल्या हातांच्या योगें, कोठें जणूं काय शृंगारलेली होती; सांध्यापासून तोडलेल्या व मोठ्या खांबाप्रमाणें जाड मांड्या आणि गुडघे व घोटे यांच्या पासून निखळलेले पाय, यांच्या योगें कोठें उंच झाली होती; मेंदूचे तोडलेले लचके खाण्यांत गढलेल्या, तीक्ष्ण चोंचीच्या गिधाडांच्या पंखांच्या योगें तिच्यावरील वाटांवर कोठें सावली पडली होती; धावून येणार्‍या आपल्या म्होरक्यांमुळें अतिशय भिणार्‍या कोल्ह्यांच्या झुंडींनीं कोठें व्याप्त होती आणि कोठें रक्त उडवून खेळणार्‍या डाकिनींचे घोळके होते; ज्यांनीं भयंकर दंताग्रांनीं आंतडीं, मेंदू व मांस तोडून बाहेर काढलीं आहेत व ज्याम्चें अंग वाहणार्‍या रक्तानें माखलेलें आहे अशा पिशाच्यांच्या योगें कोठें नटलेली होती; कोठें शंकराला हार घातल्यानें आनंदित झालेल्या योगिनींनीं युक्त होती; अशी ती जावळीची अरण्यभूमि त्या समयीं जयवल्ली या नांवास पात्र झाली. ॥५७॥५८॥५९॥६०॥६१॥६२॥६३॥६४॥६५॥६६॥६७॥६८॥६९॥७०॥
याप्रमाणें शत्रूचें सैन्य जिंकून ते पायदळाचे सर्व नायक हर्षभरित व अतिशय गर्वयुक्त झाले. मग वेगानें पक्के बद्ध केलेल्या त्या शत्रूसेनापतींना पदोपदीं पुढें ढकलीत त्यांनीं शिवाजीचें दर्शन घेतलें. ॥७१॥
कांहीं युद्धांत लोळविण्यांत आले, तर कांहीं कौतुकानें पिटाळण्यांत आले आणि कांहीं शत्रुयोद्धे रागावलेल्या शिवाजीनें बंदींत टाकले. तीनहि लोकांचें रक्षण करणार्‍या, दुष्टांचा नाश करणार्‍या, पृथ्वीचें भय नाहीसें करणा‍र्‍या व क्षात्रलीला करणार्‍या ( क्षत्रियावतार धारण करणार्‍या ) विश्वंभराला हें आश्चर्यकारक नाहीं. ॥७२॥