गुरूवार, 26 डिसेंबर 2024
  1. लाईफस्टाईल
  2. छत्रपती शिवाजी महाराज
  3. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (12:35 IST)

शिवभारत अध्याय एकोणिसावा

कवींद्र म्हणाला :-
हेररूपी आपली दृष्टी सर्वत्र योजून - फेंकून तो शिवाजी परराज्यांतील आणि स्वराष्ट्रांतील सर्व गोष्टी दक्षतेनें पहात असतो. असो. नंतर आपल्याकामामध्यें निष्णात अशा दूतास ( वकिलास ) बोलावून त्या शत्रूला हें उत्तर पाठविलें. ॥१॥२॥
शिवाजी म्हणाला :-
ज्यानें कर्नाटकांतील समस्त राजे युद्धामध्यें नष्ट केले. अशा आपण आज माझ्यावर एवढी तरी दया दाखविली हें फार चांगलें केलें. ॥३॥
आपलें बाहुबल अत्ल आहे. आपला पराक्रम अग्नितुल्य आहे. आपण पृथ्वीतळाला अलंकृत केलें असून आपल्या ठिकाणीं मुळींच कपट नाहीं. ॥४॥
जर हें वनवैभव पाहण्याची आपली इच्छा असेल तर आपण ह्या जावलीला येऊन तें पहावें. ॥५॥
आपण इकडे येणें हेंच सांप्रत योग्य आहे असें मला वाटतें. आणि त्यामुळेंच मला निर्भयता प्राप्त होऊन माझें वैभवही वाढेल. ॥६॥
भयंकर पराक्रमी अशा आपणावांचून उन्मत्त मोंगलांचें सैन्य त्याचप्रमाणें अदिलशहाचें सैन्य कस्पटासमान आहे असें मला वाटतें. ॥७॥
आपण मार्गानें दक्षपणें यावें. आपण मागत आहां ते किल्ले आणि ही जावली देखील मी देतों. ॥८॥
ज्यांच्याकडे दृष्टि फेकणें देखील कठीण अशा आपणास येथें निःशंक मनानें पाहून ही माझ्या हातांतली कट्यार मी आपणापुढें ठेवीन. ॥९॥
हें जुनाट व अफाट अरण्य पहात असतां आपलें सैन्य पातळाच्या छायेचें सुख अनुभवील. ॥१०॥
असा सूत्राप्रमाणें अगदीं संक्षिप्त पण बव्हर्थयुक्त निरोप सांगून आपल्या दूताला ( वकिलास ) शिवाजीनें पाठविलें. ॥११॥
शिवाजीच्या दूतानें ( वकिलानें ) सांगितलेला तो सन्देश ऐकून आपण स्वामिकार्य केलेंच असें त्या दुर्बुद्धि अफजलखानास वाटलें. ॥१२॥
तो यवन वाई येथें असूनहि, तीन योजनें अंतरावर असलेली जावली अगदीं आपल्या हातांत आलीच असें त्याला वाटलें. ॥१३॥
नंतर दरबारांत बसून आपल्या सैनिकांना बोलावून त्या महत्त्वाकांक्षीं अफजलखाननें असें राजनीतियुक्त भाषण केलें. ॥१४॥
अफजलखान म्हणाला :-
तो शिवाजी तह करण्याच्या इच्छेनें मला तेथें बोलावीत आहे, तेव्हां स्वामिकार्य साधूं इच्छिणार्‍या मला एथून तेथें गेलें पाहिजे. ॥१५॥
उमद्या आणि उत्तम रीतीनें सज्ज अशा आपल्या सैनिकांसह सदोदित जागरूक असणार्‍या आपणांस तेथें जाण्यांत भीति नाहीं. ॥१६॥
ज्या ठिकाणीं कांहींना कांहीं कृष्णकारस्थान असणारच अशा त्या चोर अरण्यांत सैन्य घेऊन व त्याची रचना करून आम्ही कांहीं झालें तरी जाऊंच. ॥१७॥
वाघ आणि हत्ती यांचें आश्रयस्थान असलेल्या त्या अरण्यांत विश्रांति घेत असतांना तुम्हाला त्याची क्षणोक्षणीं टेहेळणी केली पाहिजे. ॥१८॥
तेथें पर्वताच्या कडांवरील अत्यंत मोठा वनसमूह ( जलाशय ) पाहून माझे हत्ती वन्य हत्तींप्रमाणें तेथें स्वैरपणें विहार करूं देत. ॥१९॥
जरी आकाश कोसळून पडलें किंवा वीज कडाडली तरी ह्या अफजलखानाचा बेत बदलणार नाहीं. ॥२०॥
माझ्या क्रोधाग्नीनें मी तत्काळ वनें जाळून खाक करीन, पृथ्वी खणून काढीन व पर्वत जमीनदोस्त करीन. ॥२१॥
मूर्खपणानें जर तो माझें योग्य बोलणें कबूल करणार नाहीं तर मी देवता भ्रष्ट करीन आणि प्रतिज्ञा पार पाडीन. ॥२२॥
दरबारामध्यें लकलकीत आसनांवर बसून असें बोलणार्‍या त्या अफजलखानाचा निषेध दुर्दैवानें बुद्धि नष्ट झालेल्या त्या सैनिकांनीं केला नाहीं. ॥२३॥
मग पुढें कूच करण्यास सिद्ध झालेल्या त्या अफजलखानास सर्व मंत्र्यांनीं राजनीतीस अनुसरून नम्रपणें अशी विनंती केली. ॥२४॥
मंत्री म्हणाले :-
खांविद, आपण जें करूं इच्छितां तें आपण अवश्य करावें. जेथें दैवच उभें राहिलें तेथें त्याचा निषेध कोण करूं शकणार ? ॥२५॥
त्यानें जर तुम्हावर शुद्ध अंतःकरणानें विश्वास ठेवला आहे तर त्यानें जावलीच्या वनांतून तत्काल बाहेर यावें. ॥२६॥
तुम्हांला संतुष्ट करण्यासाठीं त्यानें आपलें सर्वस्व अर्पण करावें. तुम्हाला पावलोपावलीं मुजरा करीत त्यानें आपली मान तुम्हांपुढें वांकवावी. ॥२७॥
ज्या धनुर्धार्‍यानें लहानपणापासून शंकरावांचून दुसर्‍या कोणत्याही स्वामीपुढें आपलें डोकें स्वप्नांतसुद्धां नमविलें नाहीं, ज्या महाबलाढ्य पुरुषाचीं अमानुष कृत्यें बाळपणापासून आम्ही प्रायः ऐकत आलों, जो यवनांचें मुखावलोकन करणेंसुद्धां अतिशय निंद्य समजतो आणि जो स्वधर्मधुरीण त्यांचें बोलणें मुळींच ऐकत नाहीं, तो ज्या अर्थी निर्भयपणें आपणास तिकडेच बोलावीत आहे त्या अर्थी त्याच्या हृदयांत कांहींतरी साहस आहे असें आम्हांस वाटतें. ॥२८॥२९॥३०॥३१॥
जागोजाग वेळूच्या दाट बेटांनीं व्याप्त आहे अशी ते दुर्गम पर्वतभूमि घोड्यांना जाण्यास सुखकर नाहीं. ॥३२॥
जिचें तोंड शेकडों वृक्षांनीं व्याप्त आहे व जी चढण्या उतरण्यास अगदीं आकुंचित आहे अशा डोंगरी वाटेनें हत्ती कसे जाऊं शकतील ? ॥३३॥
तूं अल्लीशहाचा प्राण आहेस व दिल्लीच्या बादशहाच्या हृदयांतील शल्य आहेस आणि उत्तम सैन्याचा स्वामी आहेस. तूं या भयंकर रस्त्यांत किंवा खड्यांत शिरूं नकोस. ॥३४॥
ज्यानें योग्याप्रमाणें आपला आहारविहार व आपली बैठक हीं जिंकलीं आहेत व जो झाडून सर्व लोकांचे गुप्त बेत जाणतो, गरुड ज्याप्रमाणें सर्पांचा फन्ना उडवितो त्याप्रमाणें जो किल्ल्याच्या माथ्यावर उडी मारून तटांच्या आंत असलेल्या शत्रूंचा निःपात करतो, जो न कळतां अगणित कोस दूर जातो, जो मित्र कोण व शत्रु कोण हें मनानेंच जाणतो, लोकांना ताप देणार्‍या आपणाकडून अपमान केली गेलेली तुळजा देवी ज्याला सदोदित साह्य करते व जो पुष्कळ सैन्यानें युक्त आहे अशा त्या शत्रूकडून रक्षिलेल्या महा अरण्यांत अभिमानी असलेले आपण कसें जाल ? ॥३५॥३६॥३७॥३८॥३९॥
असें त्यांचें भाषण ऐकून द्वेषानें अंध बनलेला व रागानें डोळे लाल झालेला तो उन्मत्त त्यांचा धिक्कार करून म्हणाला. ॥४०॥
अफजलखान म्हणाला :-
स्वभावतः गर्विष्ठ असा जो शत्रु अपराध करीत आला आहे तो आपणहून आमच्या समीप कसा बरें येईल ? ॥४१॥
‘ अमानुष कृत्यें करणारा ’ अशी जी त्या मनुष्याची तुम्ही प्रशंसा करतां ती माझा पराक्रम न ओळखल्यामुळेंच करतां असें मी समजतें. ॥४२॥
ज्याच्या दौडणार्‍या घोड्यांच्या खुराग्रांनीं कर्नाटकांतील राजांच्या सैन्याचें निर्दाळण केलें, ज्यानें सर्व स्थानें फोडून टाकून सांप्रत सर्व देवांना भ्रष्ट केलें, त्या सर्व श्रेष्ठ व क्रोधाग्नीनें संतप्त अशा मला जवळ आलेला पाहून प्रत्यक्ष यमसुद्धां भीतीनें माझ्याशीं आज तह करील. ॥४३॥
जें विस्तीर्ण, पुष्कळ वृक्षांनीं आच्छादित आणि युद्ध करणार्‍या शत्रुयोद्ध्यांनींहि युक्त असें अरण्य अत्यंत पराक्रमी अशा तुम्हालासुद्धां घाबरवून सोडतें तें हें अत्यंत दुर्गम अरण्य तत्काळ जमीनदोस्त करून टाकीन. असें त्या हितकर्त्यांस बोलून तो दुष्टबुद्धि झपाट्यानें निघालाच. ॥४४॥