शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. आरोग्य
  3. अडगुलं मडगुलं
Written By
Last Modified: सोमवार, 24 जानेवारी 2022 (10:29 IST)

बाळाच्या आहाराबाबत आईकडून होणाऱ्या 4 चुका कोणत्या? पूरक आहाराचे महत्त्व काय?

- डॉ. श्रिषा
"दोन दिवसांपासून थंडी आहे आणि आता खोकला सुरू झाला आहे. चांगलं औषध लिहून द्या ना मॅडम."
 
मी त्यांच्या कमी वजन असलेल्या बाळाबाबत पूर्णपणे वेगळा विचार करत होते. त्यानुसार मी एक औषध लिहून चिठ्ठी त्यांना दिली.
 
"मॅडम आम्ही फार लांबून आलो आहोत. बाळाला शक्ती यावी म्हणूनही काहीतरी लिहून द्या ना," असं त्या म्हणाल्या. मी केवळ एक साधं सिरप लिहून दिलं ते कदाचित त्यांना त्यांच्या दवाखान्यापर्यंत आल्याच्या प्रयत्नांच्या तुलनेत पुरेसं वाटलं नसावं.
 
पण...
 
दोन दिवसांच्या थंडीसाठी चांगलं औषध? शक्ती वाढण्यासाठी औषध?
 
त्यावरून माझ्या लक्षात आलं की, हे औषध खरंतर बाळासाठी नाही, बाळाच्या आईच्या उपचारासाठी आहे.
 
कारण, अशा प्रकारचे अनेक पालक मी रोज बघत असते.
 
औषधं हा प्रत्येक गोष्टीवरचा पर्याय वाटतो. बालकांच्या पोषणाबाबतची जनजागृती मात्र अगदी कमी आहे. या विषयी असलेल्या दुर्लक्षाचा शिक्षण, प्रांत किंवा उत्पन्न याच्याशीही काही संबंध नाही. सगळ्याठिकाणी तो आढळतो.
 
"आई, भात दे," असं म्हणत मुलं जोपर्यंत स्वतः आईला खाण्यासाठी मागण्याएवढे मोठे होत नाहीत, तोपर्यंत त्यांचं पोषण नेमकं कसं होतं हे अत्यंत महत्त्वाचं आहे.
 
जन्मानंतर एका तासाच्या आत बाळाला आईचं दूध पाजणं गरजेचं असतं. त्यानंतर दर दोन तासांनी बाळाला स्तनपान करायला हवं. सहा महिन्यांपर्यंत बाळाला त्याच पद्धतीनं दूध पाजत राहायला हवं.
 
याबाबत मला पालक अनेकदा एक प्रश्न विचारत असतात -
 
"उन्हाळा आहे, थोडं पाणी देता येईल का?!"
 
"दूध पातळ होणार तर होणार नाही? ग्राईप वॉटर द्यावं का!"
 
"बाळाला जुलाब होत आहेत, आमच्या आजीनं यावेळी आम्हाला दूध दिलं होतं."
 
"दुधामध्ये काजू, बदाम घालून द्यावं का?!"
 
स्तनपान करणाऱ्या मातांनी उन्हाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला भरपूर प्रमाणात (4-5लीटर) पाणी प्यावं. पण, बाळाला पाण्याची अशी वेगळी गरज नसते.
 
काहीवेळा बाळ प्यायलेल्या दुधापैकी काही उल्टीसारखं बाहेर टाकतं, कधी कधी तर संपूर्ण उलटी करतं. आईचं दूध पिताना काही बाळं चुकून हवादेखील पोटात घेत असतं, त्यामुळं अनेकदा बाळाचे ढेकरही पाहायला मिळतात. त्यासाठी ड्रॉप्स किंवा ग्राईप वॉटर वापरू नका.
 
जुलाब होत असताना दूध न पाजणं हीदेखील मोठी चूक आहे. बाळाला व्हायरल किंवा पोटात इन्फेक्शन झाल्यानंतर आधी दोन दिवस उलटी आणि नंतर दोन दिवस जुलाब होणं हे अगदी सामान्य आहे.
 
त्यात बाळाच्या शरीरातील अतिरिक्त पाणी आणि ऊर्जा बाहेर पडत नष्ट होत असते. त्यामुळं आईनं बाळाला दूध पाजायला हवं. डॉक्टरांच्या सल्ल्यानं गरज असल्यास ORS देखील द्यावं. पण दूध अजिबात न पाजणं अधिक धोकादायक ठरू शकतं.
 
बदाम हे पौष्टिक असले तरी लहान बाळांचे पोट ते पचवण्यासाठी सक्षम नसतात. त्यामुळं काही गंभीर इन्फेक्शन होऊ शकतात. दुसऱ्या शब्दांत सांगायचं झाल्यास, आईच्या माध्यमातूनच सर्वकाही सेवन करणं हे आई आणि बाळ दोघांसाठीही अधिक योग्य असतं.
 
सहा महिन्यांनंतर काय?
बाळाला सहा महिन्यांपासून पुढे पूरक आहार द्यावा.
 
यातही दोन प्रकारच्या शंका निर्माण होत असतात.
 
1. याचा अर्थ असा आहे का, की आता आईच्या दुधाची गरज नाही?
 
तर, असं नाही. आईच्या दुधाबरोबरच वरील इतर अन्न द्यावं. आपण त्यालाच पूरक आहार म्हणतो. आईचं दूध बाळाला दोन वर्षांपर्यंत पाजलं तरी चालतं.
 
2. सहा महिन्यांनंतर बाळाला आईच्या दुधाऐवजी दुसरं दूध देऊ शकते?
 
बाळाला दुसरं दूध द्यायचं असेल तर किमान एका वर्षासाठी आईचं दूध बाळाला पाजायला हवं. त्यानंतर प्रमाणानुसार गाईचं किंवा म्हशीचं दूध द्यावं.
 
बाळाच्या पोषणाच्या दृष्टीनं 6 ते 12 महिने यादरम्यानचा कालावधी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात मुलं आईच्या दुधापासून इतर अन्नं खाण्याकडे हळूहळू वळत असतात.
 
यादरम्यान प्रामुख्यानं बाळाच्या आईकडून चार प्रकारच्या चुका होण्याची शक्यता असते.
 
पहिली चूक :- ही चूक प्रामुख्यानं ग्रामीण भागातील महिला करत असतात. सहाव्या महिन्यानंतर अगदी सात, आठ महिन्यानंतरही इतर पूरक आहार सुरू करत नाहीत.
 
दुसरी चूक :- नोकरदार महिला या प्रामुख्यानं शहरी भागात राहत असतात. सहा महिन्यांची सुटी संपल्यानंतर बाळाला बाटलीच्या मदतीनं दूध पाजणं त्या सुरू करतात.
 
तिसरी चूक :- कामावर जात असल्यामुळं मुलांना बाजारात उपलब्ध असलेलं पाकिटबंद अन्न खाऊ घालणं. विदेशातून आयात केलेल्या डबाबंद अशा आहाराचे काहीसे स्वस्तातील डबे वापरणं.
 
चौथी चूक :- बाळाला काही तरी कितीही प्रमाणात खाऊ घालायचं आणि त्याला झोपवायचा निर्णय घ्यायचा त्यासाठी शेवटी त्याच्या हातात दुधाची बाटली द्यायची.
 
सहा महिने आईचं दूधच का?
पहिल्या सहा महिन्यांमध्ये बाळाच्या वाढीसाठी आणि पोषणासाठी जी आवश्यक पोषक तत्वं असतात ती आईच्या दुधाद्वारेच मिळतात. त्याचबरोबर बाळाची प्रतिकार क्षमता मर्यादीत असताना, या दुधाद्वारे बाळाला रोग प्रतिकार क्षमता मिळत असते.
 
बाळाचं पोट हे इतर प्रकारचं वेगवेगळं अन्न पचवण्यासाठी तेवढं सक्षम नसतं. आईच्या दुधातून बाळाला पुरेसं पाणी मिळतं. सुरुवातीला सेवन केलेल्या दुधानं बाळाची तहान भागते आणि नंतर त्याचं पोट भरून बाळ तृप्त होतं. त्यामुळं सहा महिने केवळ आईचं दूधच द्यावं.
 
पूरक आहार आणि त्याचं महत्त्व
सहा महिन्यानंतर बाळाची वाढ वेगानं होतं असते. एवढंच नाही वयानुसार हालचाली वाढतात. बाळ रांगणं, उड्या मारणं अशा गोष्टी करू लागतं. त्यामुळं त्याची ऊर्जा खर्च होऊ लागते. बाळाला स्वाद समजायला लागतो, त्यामुळं वेगवेगळे स्वाद बाळाला समजायला हवे.
 
त्यानंतरही आईचंच दूध पुरेशा प्रमाणात देत राहिलं तर बाळ इतर गोष्टी खाणं टाळतं. त्यामुळं आई पुन्हा त्याला दूध पाजते आणि याचठिकाणी हे दुष्टचक्र सुरू होतं.
 
तोपर्यंत बाळाची टाळू भरत असते. यानंतर बाळाचं वजन एक ते दोन किलोपेक्षा जास्त वाढत नाही आणि वाढ मंदावते. त्यामुळं त्याची भूकही कमी होते. त्यामुळं बाळ कमी खाणं, न खाणं अशा अवस्थेत येत असतं.
 
त्यामुळं फार लवकर किंवा फार उशीर न करता योग्य वेळी आणि योग्य प्रमाणात बाळाला पूरक आहार द्यावा.
 
योग्य आहार
बाळाला खाण्यासाठी सोपा, सहज पचणारा आणि चवदार, असा आहार योग्य असतो. तो नेहमी उपलब्ध असावा आणि अगदीच खरेदी करण्यापलिकेडे नसावा.
 
शिजवण्यास सोपा आणि साठवून ठेवता येणारा आहार असावा. पूरक आहारात चवीमध्ये सारखेपणा नसावा. टीव्हीमध्ये दाखवले जाणारे पदार्थ, आकर्षक पॅकमधील गोष्टी, महागडे पदार्थ याऐवजी बाळासाठी चांगलं आणि आरोग्यदायी काय असेल याचा विचार करावा.
 
उदाहरण द्यायचं झाल्यास दक्षिण भारतात बाळाला त्यांचा सुरुवातीचा पूरक आहार म्हणून मऊ शिजलेल्या तांदळाचे पदार्थ देऊ शकतात. त्याबरोबर चवीसाठी दूध, दही, गूळ, मध, तूप, तेल याचा वापर करता येऊ शकतो.
 
कधी, किती आणि कसा पूरक आहार द्यावा?
सुरुवातीचा किंवा पहिला आहार हा नक्कीच दुधापेक्षा घट्ट असायला हवा आणि किंचित कोमट गरम तसंच काहीसा गोड असावा आणि तो दिवसा द्यावा. बाळ भुकेलं असेल तर ते छान सेवन करतं.
 
मध्यम आकाराच्या चमच्यानं ते खाऊ घालावं आणि पाणी द्यावं. एकावेळी साधारणपणे 50-70 ग्रॅम अन्न द्यावं.
 
बाळाला दिवसातून 5-6 वेळा असं खायला घालावं आणि आईचं दूधही पाजायला हवं. सुरुवातीला एका धान्याच्या आहारापासून सुरुवात करावी आणि नंतर इतर धान्य हळू हळू त्यात समाविष्ट करावी. जवळपास आठवड्यानंतर त्यात डाळीही घालता येतील.
 
बाळ जसं जसं मोठं होत होत जाईल तसं तसं अन्न थोडं घट्ट करून खाऊ घालावं. त्याचं प्रमाण 100 ते 150 ग्रॅम दरम्यान असावं. त्यात भाज्या, हिरव्या पालेभाज्या आणि दही याचा समावेश करावा.
 
जवळपास एका वर्षानंतर वयानुसार आहार वाढवण्यासाठी बाळाता दिवसातून तीन वेळा ताजं शिजवलेलं अन्न द्यावं. तर दोन ते तीन वेळा हलकं काहीतरी नाश्त्यासारखं खायला द्यावं. त्यात हंगामी फळं, केकचा लहान तुकडा, घरी तयार केलेली पेस्ट्री, पुडींग यांचा समावेश आहे.
 
सुरुवातीच्या 6 - 9 महिन्यांच्या काळात बाळाला पूरक आहार हा केवळ स्तनपानानंतर झोपण्याच्या वेळी द्यायला हवा. बाळ दोन वर्षांचं होईपर्यंत स्तनपान करायला हवं. बाळाला बाटलीतून किंवा ग्लासद्वारे दूध देण्याची गरज नाही.
 
पहिल्या वर्षाच्या काळात बाळाला वेगळ्या भांड्यात स्वतंत्र शिजवलेलं अन्न द्यावं. दुसऱ्या वर्षापासून बाळाच्या जेवणात किंचित मिरची टाकायला सुरुवात करावी. तुपामध्ये अन्न शिजवावं. दुसऱ्या वर्षाच्या अखेरीपासून बाळाला स्वतःच्या हाताने खाण्याची सवय लावावी.
 
रोज एकाच वेळी ठरावीक ठिकाणी बसून बाळाबरोबर बोलायची सवय लावणं ही सर्वात चांगली सवय आहे. शक्य झाल्यास संपूर्ण कुटुंबाबरोबर खाण्याची सवय लावा. त्याचा परिणाम म्हणजे मुलांची शिस्त, अन्नावर लक्ष केंद्रीत होणं यादृष्टीनं त्याचा फायदा होतो. तसंच ते लवकरात लवकर स्वतःच्या हाताने खायला शिकतात.
 
मुलांना घरभर फिरत टीव्ही, फोन पाहत खाण्याची सवय लावू नका. मुलांना खाऊ घालण्यासाठी केवळ संयम ठेवणं गरजेचं असतं.
 
बालकांच्या पोषण आणि आहाराच्या बाबतीत ही काळजी घेणं गरजेचं असतं. लहान मुलांना थोडी काळजी घेऊन आहार दिल्यास त्यांचं पोषण अधिक चांगलं होऊ शकतं.
 
जर तुम्ही संयमानं आणि विचारपूर्वक मुलांच्या आहाराची काळजी घेतली नाही तर भविष्यात तुम्हाला त्याला शक्ती, वजन आणि बुद्धीमत्ता वाढवण्यासाठी औषधांचे डोस द्यावे लागतील.
 
त्यामुळंचं योग्य प्रकारे पूरक आहार देणं हे बाळासाठीचं सर्वोत्तम औषध आहे. अशा प्रकारे आहार असलेल्या मुलांना डॉक्टरांचीही फारशी गरज भासत नाही.
 
आपल्या बाळाचं आरोग्य हे तुम्ही त्याला देत असलेल्या आहारावरच अवलंबून असतं.