Last Modified: नवी दिल्ली , बुधवार, 23 जुलै 2008 (15:22 IST)
आरक्षणाच्या मुद्यावरून राठोड अनुपस्थित
भाजपचे सरकार भटक्या जमातींसाठी आरक्षण देईल किंवा नाही यासंदर्भात संभ्रमात असल्याने आपण काल झालेल्या मतदानात भाग घेतला नाही, असा खुलासा भाजपचे यवतमाळ येथील 'बंडखोर' खासदार हरिभाऊ राठोड यांनी केला आहे. श्री. राठोड काल मतदानावेळी अनुपस्थित राहिल्याने भाजपला मोठा धक्का बसला होता.
श्री. राठोड हे गोपीनाथ मुंडे यांच्या खास मर्जीतील मानले जातात. पण तरीही त्यांनी हे पाऊल का उचलले असावे याविषयी चर्चा होती. त्याविषयी आपली बाजू स्पष्ट करताना राठोड म्हणाले, की देशात भटक्या जमातीच्या लोकांची संख्या १५ कोटी आहे. या जमातीसाठी अनुसूचित जाती व जमातीसारखी घटनेत तिसरी अनुसूची बनवावी अशी आपली गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी आहे. ती अद्याप पूर्ण झालेली नाही. महाराष्ट्राप्रमाणे गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड या राज्यातही या जमातीला आरक्षण मिळायला हवे. पण या राज्यांतील भाजप सरकार काहीही करत नाही, असा त्यांचा आरोप आहे.
'गोपीनाथ मुंडे आपल्यासाठी आदरणीय आहेत. त्यांच्यामुळेच आपण भाजपमध्ये आलो हे सांगताना मुंडे यांनाच पक्षाने बाजूला केले आहे. त्यांच्यावर अन्याय होत आहे. अशा परिस्थितीत आपण प्रतिनिधित्व करतो त्या समाजाला न्याय मिळण्याची शक्यता दिसत नाही, असे श्री. राठोड म्हणाले.
या परिस्थितीत आपल्यावर मोठा तणाव होता. युपीएला मत द्यावे की नाही अशी द्विधा मनस्थिती होती. तणावामुळेच आपली तब्बेत खालावली आणि दवाखान्यात दाखल व्हावे लागले, असे त्यांनी सांगितले.
आपल्या समाजाला भाजपकडून न्याय मिळणार नाही. त्यामुळे युपीए सरकार देशात सत्तेवर रहायला हवे, असे सांगून आपल्याला अनुपस्थित रहाण्यासाठी कोणतेही पैसे देण्यात आलेले नाही, असे ठाम शब्दांत सांगितले. आपण विकावू नाही हे सांगायलाही ते विसरले नाहीत.
आपण आजही भाजपचे सदस्य आहोत. पण पक्षाने आपल्याला काढले तर समाजाला न्याय देणार्या पक्षात जायला तयार आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले. कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दरवाजे आपल्यासाठी खुले आहेत असेही ते म्हणाले.